सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

☆ श्रवण☆ सौ शालिनी जोशी

तीन मार्च हा श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त लेख:

☆ श्रवण ☆

‘श्रवण’ हे पहिले भाषिक कौशल्य आहे. त्याचे नंतर भाषण, वाचन, लेखन इत्यादी. श्रवण मध्ये मूळ धातू’ श्रु’ ऐकणे. पण ऐकणे आणि श्रवण यात फरक आहे. आपल्या कानावर बरेच आवाज पडत असतात त्यातील विशिष्ट आवाज लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे श्रवण (listening)आणि ऐकणे म्हणजे नुसते आवाज कानावरून जाणे(hearing). वेदांना श्रुती म्हणतात. मग वेद वचन ऐकणारा तो श्रोता. आणि त्याने ऐकलेली वचने म्हणजे श्रुत. यावरून ज्ञानी माणसाला बहुश्रुत म्हणतात. ऐकणारे इंद्रिय कान याला कर्ण, श्रोत्र, श्रवण असे प्रतिशब्द आहेत.

आपल्या वैदिक संस्कृतीत श्रवणाला पूर्वापार महत्त्व आहे. कारण श्रवणाद्वारेच ज्ञानगंगा प्रवाहित राहिली. गुरु शिष्य शिक्षण पद्धतीत गुरुने सांगावे. शिष्याने ते मनापासून ऐकावे, मग कंठस्थ करावे व पुढील पिढीला सांगावे. अशी पद्धत होती. ज्ञानेश्वर म्हणतात ‘वक्ता तो वक्ताची नोहे। श्रोतेविण।’अधिकारी श्रोता नसेल तर वक्त्याचे बोलणे वाया जाते. इतके श्रवणाचे महत्व. विश्वामित्रांनी रामलक्ष्मणाना यज्ञ रक्षणासाठी आपल्याबरोबर नेले. वाटेत चालता चालता त्यानी जो ज्ञानोपदेश केला तो राम-लक्ष्मण यांनी श्रवण केला. चित्तात धारण केला. तेथे लिहून घेण्याची गरज पडली नाही. श्रवण असे एकाग्रतेने करायचे असते. ते जेव्हा परमेश्वराच्या लीला गुणांचे होते. तेव्हा ती ‘श्रवण भक्ती ‘होते नवविधा भक्तीतील ही पहिली भक्ती.

गौतम बुद्ध एकदा झाडाखाली बसले होते. तेव्हा कोणी एक जण येऊन त्यांना अपमान कारक बोलू लागला. पण गौतम बुद्ध शांत होते. त्यांच्या शिष्याला याचे आश्चर्य वाटले. तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले देणाऱ्याने दिले तरी काय घेणे ते आपण ठरवायचे असते. हाच श्रवण विवेक. तो माणूस मुकाट्याने निघून गेला. श्रवण केलेल्या गोष्टीचा माणूस विनियोग कसा करतो हे सांगणारी अकबर बिरबलाची एक गोष्ट आठवते. एकदा अकबराने तीन सारख्या धातूच्या मूर्ती आणल्या आणि बिरबलाला त्यांच्यातील फरक ओळखायला सांगितला. बिरबल चाणाक्ष होता. त्याने एक तार घेतली. एका मूर्तीच्या कानात घातली. ती दुसऱ्या कानातून बाहेर आली. म्हणजे असे काही लोकांचे श्रवण वरवरचे असते. नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, अशा प्रकारचे. दुसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातली, तर तोंडातून बाहेर आली. म्हणजे त्याने ऐकले ते लगेच बोलून टाकले. पण तिसऱ्या मूर्तीच्या कानातील तार पोटात गेली. ती बाहेर आली नाही. म्हणजे त्याने ऐकले त्यावर विचार मनन केले. हे खरे श्रवण. समर्थ रामदास म्हणतात ‘, ऐसे अवघेची ऐकावे। परंतु सार शोधून घ्यावे ।असार ते जाणूनी त्यागावे ।या नाव श्रवण भक्ती । पण सगळेच ऐकले तरी त्यातले सार तेवढेच घ्यावे. म्हणून गणपतीला शुर्पकर्ण म्हणतात. सुपासारखे कान असलेला. सुप जसे फोलपट टाकून स्वच्छ धान्य ठेवते. तसेच गणपतीचे कर्ण. त्याचे श्रवण हा गुण सर्वांनीच घ्यावा.

कान हे श्रवणाचे प्रतीक. तो आपला आपण बंद होत नाही. जसे तोंड व डोळा बंद करता येतो. त्यामुळे त्याला नकार देता येत नाही. डोळा फक्त समोरचेच पाहतो. पण चारी बाजूच्या लहरी कानावरती सहजच पडतात. घरात बसलेले असताना विविध आवाज आपल्या कानावर ती पडतात. पक्षी किलबिलत असतात. रेडिओ सुरू असतो. पंख्याचा आवाज येत असतो. कोणीतरी काही बोलत असते. अशा गडबडीत कोणत्यातरी एका इच्छित आवाजावर लक्ष केंद्रित करणे हेच श्रवण कौशल्य. त्यासाठी गरज मनाच्या एकाग्रतेची. हाच खरा श्रोता. यालाच ज्ञानेश्वर अवधान म्हणतात. श्रोत्यांना वेळोवेळी सांगतात, ‘ आता अवधान ऐकले द्यावे ।मग सर्व सुखाची पात्र होईजे।’

कानावरून आलेले विविध वाक्प्रचार व म्हणी आपल्या मराठी भाषेचे सौंदर्य वाढवतात. उदाहरणार्थ बळी तो कान पिढी, कानामागून आला तिखट झाला, भिंतीला कान असतात, कान व डोळा या चार बोटाचे अंतर, कान टवकारणे इत्यादी

माणूस हा सौंदर्याचा भोक्ता. त्यामुळे कानाला सजविण्यासाठी त्याला दागिन्या घालण्याची पूर्वापार प्रथा आहे. त्याला कुंडल असे म्हणतात. त्यासाठी बारशाच्या दिवशीच कान टोचतात. आपल्या सोळा संस्कारतील हा एक संस्कार. कानाच्या वरच्याभागी पुरुषही भिकबाळी नावाचा दागिना घालतात. ‘मकर कुंडले तळपती श्रवणी’ असे विठ्ठलाच्या कुंडलाचे वर्णन करतात. कुंडलांचा कुंडली जागृतीशी संबंध आहे असे म्हणतात. कान टोचण्यामध्ये शास्त्रीय कारणही आहे त्यामुळे आजारांची शक्यता कमी होते व स्वास्थ्य टिकते. या कुंडलावरून ‘वारियाने कुंडल हाले’ किंवा ‘बुगडी (म्हणजे कानातील दागिना) माझी सांडली ग’ अशी गाणी हे रचली गेली. असो कितीही दागिने घातले तरी

हस्तस्य भूषणानं दानं।सत्यं कंठस्यभूषणम्।

कर्णस्यभूषण शास्त्रं।भूषणैः किं प्रयोजनम्।

शास्त्र श्रवण करणाऱ्याच्या कानाला दुसऱ्या दागिन्यांची गरज नाही.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments