श्री मेघःशाम सोनवणे
जीवनरंग
☆ ‘प्रेमळ आदेश…’ – भाग- २ – मूळ हिन्दी लेखक – अनामिक ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆
(आता मला त्यांना चिडवायला आणि छेडायला खूपच मजा येत होती. अशा स्थितीत काकूंनीही हसत हसत मला पूर्ण साथ दिली.) – इथून पुढे —-
आम्ही संध्याकाळी ऑफिसमधून परतलो की काकू चविष्ट नाश्ता बनवून आमची वाट पाहत असायच्या. आता सकाळ संध्याकाळ भाज्या चिरून, कोशिंबीर आणि विविध प्रकारच्या चटण्या तयार करून ठेवतात. त्या अनेकदा पीठही मळून ठेवायच्या. हे सर्व पाहून दिवसभरात त्या क्षणभरही बसत नसतील असे वाटले.
आता घरातील प्रत्येक वस्तू आपापल्या जागी नीटनेटकी ठेवली असते, ज्या आधी वेळेअभावी वापरानंतर इकडे तिकडे पडायच्या.
एका सुट्टीच्या दिवशी आम्ही काकूंना मॉलमध्ये फिरायला घेऊन जात होतो. वाटेत एका ठिकाणी त्यांनी गाडी थांबवायला सांगितल्यावर आम्हाला आश्चर्य वाटले. तरीही राकेशने ताबडतोब गाडी थांबवली तेव्हा काकू लगेच खाली उतरल्या आणि जवळच्या एटीएमच्या दिशेने निघाल्या. अवघ्या दोन मिनिटांत त्या नोटा हातात घेऊन परत आल्या.
आमच्या चेहऱ्यावर आश्चर्य बघून त्या म्हणाल्या, “आश्चर्यचकित होऊ नका. ” माझी परिस्थिती लक्षात घेऊन मी हे कार्ड हॉस्पिटलच्या सामानासोबत ठेवले होते. दवाखान्यात पैशाची गरज तर होतीच ना? पण मला माहित नव्हते की माझी अवस्था इतकी वाईट होईल की मला माझ्या शेजाऱ्याला सांगून फोन करून तुला बोलवावे लागेल. “
“ते ठीक आहे काकू, पण आता आम्ही आहोत ना. पैसे काढण्याची काय गरज होती? खरं तर, माफ करा, तुम्ही येऊन इतके दिवस झाले आहेत, याचा आम्ही विचारही केला नाही. आम्ही तुम्हाला तुमच्या गरजा विचारायला हव्या होत्या, ” राकेश लाजत म्हणाला.
“नाही नाही बेटा, मला पैशाचे काय काम? पण मी माझा मुलगा आणि सुनेसोबत पहिल्यांदाच बाजारात जात आहे, त्यामुळे पैसे माझ्याकडे असले पाहिजेत. चला, उशीर होत आहे, ” काकू उत्साहाने म्हणाल्या.
मॉलमध्ये पोहोचताच काकू तयार कपड्यांच्या दालनात गेल्या. आम्हाला वाटले की त्या आजारपणामुळे इतक्या घाईत दवाखान्यात आल्या आहेत की त्यांना त्यांच्यासोबत अनेक गोष्टी आणता आल्या नसतील. त्यांना कपड्यांविना त्रास होत असावा, म्हणूनच त्या तिथे गेल्या असाव्यात.
पण त्या रेडीमेड शर्ट आणि जीन्सच्या काउंटरवर गेल्या आणि राकेशला कपडे खरेदी करण्यास सांगू लागल्या. राकेशने खूप नकार दिला पण त्यांनी ऐकले नाही.
राकेश जीन्स घालून पहात असताना त्या मला म्हणाल्या, “आजकाल सगळ्या मुली जीन्स घालतात. ते सोयीचे असल्याचे कामावर जाणाऱ्यांचे म्हणणे आहे. सूनबाई, तू जीन्स वापरत नाहीस का?
त्यांचं हे बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटले. जुन्या पिढीतल्या असूनही त्या असं का बोलल्या?
“नाही नाही काकू, मी पण… ” म्हणत मी थांबले. असं बोलत असताना त्या माझी परिक्षा तर घेत नाही ना असं मला वाटत होतं.
“तू घालतोस पण माझ्यामुळे तू रोज साडी आणि सूटच्या बंधनात अडकतेस. पण मी तर कधीच काही बोलले नाही, ” काकू अगदी निरागसपणे म्हणाल्या.
“सून, तू पण तुझ्यासाठी काही जीन्स आणि एक छान टॉप खरेदी कर. माझी सून या कपड्यांमध्ये कशी दिसते ते मलाही पाहू दे, ” असे म्हणत त्यांनी माझ्यासाठी कपडे निवडण्यास सुरुवात केली. मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघत उभी राहिले. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, पण हे सर्व खरे होते आणि स्वप्न नव्हते.
कपडे खरेदी होताच काकू म्हणाल्या, “बेटा, मला खूप भूक लागली आहे. ” असंही मी आजारातून बरी झाल्याबद्दल एखादी मेजवानी तर व्हायलाच हवी. ”
आम्ही नकार देऊनही काकूंनी रेस्टॉरंटमध्ये आईस्क्रीमसह अनेक गोष्टी मागवल्या. नंतर राकेश पैसे द्यायला लागले तेव्हा किकूंनी लगेचच ती नोट त्याच्या हातात दिली आणि म्हणाल्या, “हे घे, हे दिल्याने काय फरक पडतो? ” हे ऐकून आम्ही हसलो, बिल घेऊन आलेल्या वेटरलाही हसू आवरले नाही.
घरी आल्यावर राकेश काकूंना म्हणाले की “तूम्ही इतके पैसे खर्च करायला नको होते”. त्यावर त्या म्हणाल्या, “तुझ्या काकांच्या पश्चात आता मला पेन्शन मिळते. मी एकटी असताना या वयात मी स्वतःवर असा किती खर्च करू? “
त्या बऱ्या झाल्यापासून त्या अनेकदा संध्याकाळी फिरायला जातात. येतांना फळे, भाज्या, दूध, मिठाई आणि इतर अनेक गोष्टी घेऊन येतात. कधीही रिकाम्या हाताने येत नाहीत.
सकाळी आम्ही ऑफिससाठी तयार होत असताना त्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, “राकेश बेटा, मी आता पूर्णपणे बरी झाली आहे. आता मला परतीचे तिकीट काढून दे. “
हे ऐकून आम्ही दोघेही अवाक झालो. “काय झालं काकू, तुम्हाला इथे काही अडचण आहे का?”
“नाही नाही बेटा, काय अडचण असणार आहे तुझ्या घरात? तरीही मला परतले पाहिजे. दोन महिने झाले, मी तुमच्यावर… ”
हे ऐकताच मी अस्वस्थ झाले, “काकू, आम्ही तुम्हाला खूप नको म्हणतो, तरीही तुम्ही दिवसभर स्वतःच्या मर्जीने का होईना कामात मग्न राहता. “
“नाही नाही सीमा, मी कामाबद्दल बोलत नाहीये. हे काय काम आहे का. बटण दाबले आणि कपडे धुतले. बटण दाबलं, चटणी, मसाला तयार झाला. घराची साफसफाई आणि भांडीकुंडी ची कामे मोलकरीण करते. एका दिवसात असं किती काम असतं? पण बेटा, दोन महिने झाले, किती दिवस मी तुमच्यावर ओझे बनून राहणार? “
ओझे हा शब्द ऐकताच माझे डोळे भरून आले. मी त्यांना मिठी मारली. प्रेमाची अशी प्रतिमा ओझे कसं असू शकते? माझ्या सासूबाईंबद्दल किती चुकीचे विचार होते माझे. माझी काकूंच्या येथे रहाण्याबद्दल काहीच तक्रार नाही. आधी जेव्हा राकेश त्यांच्या इथे राहण्याबद्दल बोलला होता तेव्हा मला खूपच काळजी वाटली होती. पण आता मी त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनाच करू शकत नाही. त्यांच्या प्रेम, आशीर्वाद आणि उपस्थितीशिवाय आपण आणि आपलं कुटुंब किती अपूर्ण असेल. रोज संध्याकाळी आमची घरी येण्याची कोण वाट पाहणार? आम्हाला भूक लागली नाही तरी कोण खायला घालणार? एवढ्या बिनशर्त प्रेमाचा वर्षाव कोण आपल्यावर कोणत्याही स्वार्थाशिवाय करेल?
आम्ही दोघांनीही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की त्या आता कुठेही जाणार नाहीत. आता या वयात त्यांनी एकटं राहायचं नाही. आता त्यांनी मथुरेतील घराला कुलूप लावायचे की भाड्याने द्यायचे ही त्यांची मर्जी आहे. त्या आमची जिद्द आणि आमच्या प्रेमाचा अव्हेर करू शकल्या नाहीत.
काकू थोडा विचार करून बोलल्या, ‘‘तुम्ही म्हणता तर तुमच्या जवळच राहीन, पण माझी एक अट आहे. ’’
काकूंना काय म्हणायचं आहे ते मी समजले. मी लगेच म्हणाले, ‘‘तुम्ही एकदा मथुरेला जा, तुमचे काही कपडे, काही आवश्यक सामान घेऊन या. यात अटीची काय गरज आहे. पुढील आठवड्याच्या शेवटी आम्ही दोघं तुम्हाला मथुरेला घेऊन जाऊ. ’’
“ते तर जाईनच, पण तरीही माझी एक अट आहे. “
काकूंनी हे सांगताच मी जरा काळजीत पडले. विचार केला, माहीत नाही त्या काय अट ठेवतील.
मग राकेश म्हणाले, “काकू, अट कशाला, तुम्ही फक्त आदेश करा, तुम्हाला काय हवे आहे?”
आमचे काळजीत पडलेले चेहरे पाहून काकू हसल्या. त्या हसत म्हणाल्या, “हो, ही अट नाहीये, मी इथेच राहावं असं वाटत असेल तर मला लवकर एक नातू द्यावा लागेल, असा माझा आदेश आहे. तुमच्या लग्नाला दोन वर्ष झाली, किती दिवस असेच सडाफटींग रहाणार? “
हे ऐकून आम्हा दोघंही लाजलो. ज्या प्रेमाने आणि अधिकाराने काकूंनी हे सांगितले, त्याबद्दल विचार करावा असे काहीच नाही. काकूंनी आमच्या आयुष्याला नवा अर्थ दिला आहे. मला तर हे कळत नाही की ही ममतेची मूर्ती इतकी वर्षे निपुत्रिक कशी राहिली असेल? आजारपणाच्या निमित्ताने का होईना, ती आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आमच्याकडे आली आहे.
– समाप्त –
मूळ हिंदी कथालेखक : अनामिक
मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈