श्री जगदीश काबरे
इंद्रधनुष्य
☆ “पराधीन नाही पुत्र मानवाचा” ☆ श्री जगदीश काबरे ☆
अवैज्ञानिक सिद्धांत लादू पाहणाऱ्या धर्ममार्तंडांच्या विरोधात उभा राहिलेला पहिला वैज्ञानिक गॅलिलिओ यांची ३००वी पुण्यतिथी ठरलेला ८ जानेवारी हा स्टीफन हॉकिंग यांचा जन्मदिवस आणि १४ मार्च हा आधुनिक विज्ञानेश्वर अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्मदिन हाच स्टिफन हॉकिंग यांचा मृत्यूदिन!
हॉकिंग यांना ‘का’ या प्रश्नाने आयुष्यभर पछाडले. खरेतर सामान्यही अनेकदा या ‘का’ प्रश्नास सामोरे गेलेले असतात. परंतु या सर्वसामान्यांना आणि हॉकिंग यांना पडणाऱ्या ‘का’ या प्रश्नाचा फरक असा की, जनसामान्य आयुष्याच्या रेट्यात या ‘का’ प्रश्नाला शरण जातात; तर हॉकिंगसारखा प्रज्ञावंत त्या ‘का’स पुरून उरतो.
पृथ्वीचा जन्म मुळात झालाच का? झाला असेल तर तो कशामुळे झाला? ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ असतो. मग या पृथ्वीलाही मृत्यू आहे का? असल्यास तो कधी असेल? आणि मुख्य म्हणजे तो कशाने असेल? अशा अन्य काही पृथ्वीही आहेत का? त्यांना शोधायचे कसे? या आणि अशा प्रश्नांचा, काळाचा शोध घेणे हे हॉकिंग यांच्या जन्माचे श्रेयस आणि प्रेयसही होते.
स्टीफन हॉकिंग हा जगातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेला, आइन्स्टाइनच्या पंक्तीला बसू शकेल असा माणूस. त्याच्यावर अगदी विशीतच मोटर न्यूरॉन डिसीज झाल्यामुळे त्याला व्हीलचेअरला खिळण्याची पाळी त्याच्यावर आली. या रोगात एकेका अवयवावरचा मेंदूचा ताबा नष्ट होत जातो. शेवटची चाळीसेक वर्ष त्याच्या मानेखालच्या सर्व अवयवांवरचा ताबा गेलेला आणि बोलताही येत नसलेल्या अवस्थेत तो जगला. म्हणजे चालत्याबोलत्या सामान्य मनुष्यापासून ते जवळपास निव्वळ विचार करणारा मेंदू – अशा शारीर ते बौद्धिक अवस्थेपर्यंत त्याचा प्रवास झाला. अशा स्थित्यंतरातही त्याने देवाची करुणा न भाकता आपल्या वैचारिक वैभवाने विश्वरचनाशास्त्रातली, कृष्णविवरांची, काल-अवकाशाची कोडी सोडवली. त्याच्या अनेक नव्या उत्तरांनी नवीनच प्रश्नांची दालनं उघडली.
अत्यंत खडतर आयुष्य जगावे लागत असताना कोणत्याही टप्प्यांवर त्यांची विज्ञाननिष्ठा कमी झाली नाही की अन्य कोणा परमेश्वर नावाच्या ताकदीची आस त्यांना लागली नाही. ‘‘इतकी वर्षे पृथ्वीचा उगम आदीवर संशोधन केल्यावर माझी खात्री झाली आहे की, परमेश्वर अस्तित्वातच नाही. या विश्वाचा, आपला कोणी निर्माता नाही की भाग्यविधाता नाही. म्हणूनच स्वर्ग नाही आणि नरकही नाही. या विश्वाचे अस्तित्व समजून घेण्यासाठी हाती असलेला क्षण तेवढा आपला आहे आणि तो मिळाला यासाठी मी कृतज्ञ आहे,’’ असे हॉकिंग म्हणत. याच अर्थाने ते धर्म या संकल्पनेचे टीकाकार होते. ‘‘धर्म हा अधिकारकेंद्रित आहे, तर विज्ञानाच्या केंद्रस्थानी असतात ते निरीक्षण आणि तर्क. धर्म आणि विज्ञानाच्या या संघर्षांत अंतिम विजय हा विज्ञानाचा असेल, कारण ते जिवंत आणि प्रवाही आहे.’’ हे त्यांचे मत विचारी माणसाला मान्य होण्यासारखेच आहे.
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈