सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘चैतराम पवार…’ – लेखक श्री मिलिंद थत्ते ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

चैतराम पवार…       

आपल्या अगदी जवळच्या माणसांचे, मित्रांचे जाहीर कौतुक करण्याचे निमित्त मिळाले की सोडू नये. चैत्राम पवार म्हणजे चैत्रामभाऊंना पद्मश्री जाहीर झाल्याचे काल वर्तमानपत्रात वाचून कळले. तसे त्यांना यापूर्वीही जे जे पुरस्कार मिळाले, ते त्यांच्याकडून कधीच कळले नव्हते. किंबहुना बारीपाड्यात त्यांच्या घरातल्या एका कोनाड्यात ते पुरस्कार गप-गुमान अंग चोरून बसलेले दिसत. मी २००० साली पहिल्यांदा बारीपाड्यात गेलो होतो. नंदुरबारच्या डॉ. गजानन डांग्यांनी साक्रीहून कोणाची तरी दुचाकी उधार घेतली आणि आम्ही दोघे बारीपाड्यात गेलो. गेलो म्हणजे ती दुचाकी अलिकडच्या एका गावात ठेवली आणि मग चिखल तुडवत पाऊस चुकवत बारीपाड्यात पोचलो. भाऊंच्या घरी चुलीजवळ बसून कोरडे झालो आणि घरच्या गुळाचा कोरा चहा प्यायलो. तिथपासून गेली २४ वर्षे मी चैत्रामभाऊंना ओळखतो-पाहतो आहे.

पहिल्या भेटीनंतर मी एका साप्ताहिकात त्यांच्या कामाबद्दल, बारीपाड्याबद्दल लेख लिहीला. तोच पहिला लेख होता, असं डॉ. फाटकांकडून नंतर मला कळलं. त्या वेळी ऑलरेडी बारीपाड्याच्या गावकऱ्यांनी श्रमदानाने शे-दोनशे बांध घातले होते, जंगल राखून पाणी अडवून गाव टँकरमुक्त केला होता, पाच ऐवजी चाळीस विहीरी झाल्या होत्या, स्थलांतर करण्याऐवजी गावातच राहून वर्षाला दोन पिके काढायला सुरूवात झाली होती. पुरूषांनी दोन मुले झाल्यानंतर नसबंदी करून घेतली होती. एकही कुटुंब दारिद्र्यरेषेखाली नव्हते. आणि वनव्यवस्थापनाच्या पुरस्काराच्या रकमेतून गूळ निर्मितीसाठी गुऱ्हाळ सुध्दा गावाने सुरू केले होते. हे सगळे होऊनही बारीपाड्याची कुठेही प्रसिद्धी नव्हती.

पुढच्या २४ वर्षात बारीपाड्याने विकासाचे अनेक पल्ले ओलांडले, नवे मापदंड निर्माण केले. भोवतालच्या ५०हून अधिक गावांना सामुदायिक वन हक्क मिळवून द्यायला मदत केली आणि तिथल्या वनसंवर्धनात मोठ्या भावाची भूमिका घेतली. अनेक पुरस्कार मिळाले. गावाची कीर्ती दुमदुमली. या सर्वांबद्दल आता गूगल वर शोधलंत तरी खूप काही वाचायला, पहायला मिळेल.

मला काही वेगळं या निमित्ताने सांगावंसं वाटतंय्…   बारीपाड्याबद्दल नाही, या चैत्राम नावाच्या माणसाबद्दल.

तुम्ही त्यांच्या तोंडून बारीपाड्याचा विकास प्रवास ऐकलात, तर असं वाटतं की हा माणूस या प्रवासात फक्त साक्षीभावानंच होता. ज्या ज्या लोकांनी थोडीशी का होईना बारीपाड्याला मदत केली असेल, त्या प्रत्येकाचं नाव घेऊन हे श्रेय त्यांचे – असेच चैत्रामभाऊ सांगतात. आणि यात काहीही चतुराई वगैरे नसते, हे अतिशय प्रांजळपणे आणि निर्व्याज मनाने ते सांगत असतात. डॉ. आनंद फाटक, डॉ. श्री. य. दफ्तरदार यांची प्रचंड गुंतवणूक आणि मार्गदर्शन बारीपाड्याच्या प्रयोगांत होते. त्यांचे नाव चैत्रामभाऊ घेतातच, पण त्यापुढेही अशी कित्येक माणसांची नावे येतात, की ज्यांच्या हे गावीही नसेल की आपल्या किरकोळ भूमिकेलाही या माणसाने मोलाचं मानलं आहे. ‘मी तो हमाल भारवाही’ ही भूमिका इतक्या सच्चेपणाने जगताना मी कोणाला पाहिलेलं नाही.

एक उपजिल्हाधिकारी मला म्हणाले होते, हा माणूस इतका निरहंकारी आहे, हा खरंच नेता आहे का? 

दुसरा गुण सांगावा तर असा की, गावातली इतर घरं आणि यांचं घर यात काहीही मोठा फरक नाही. मी अनेक आदर्श गावांचे नेते पाहिलेत, त्यांची घरं आणि त्यांच्याभोवतीचं वलय पाहिलं आहे. इथे असं काही वलय नाही. गावात वावरताना चैत्रामभाऊ आणि गावातले इतर कोणीही सारखेच वावरतात. वयाने वडील माणूस सहज चैत्या म्हणून हाक मारतो.

बारीपाड्यात आमच्या जव्हारच्या गावातल्या कार्यकर्त्यांची सहल घेऊन गेलो होतो. तेव्हाच्या गावात शिरल्यावर पहिल्या प्रतिक्रिया अशा होत्या – अरे यांची घरे तर आपल्यापेक्षा लहान आणि अगदीच साधी दिसतायत. इथे काय बघायला आलो आपण? आणि पुढच्या काही तासांत या प्रतिक्रिया बदलत गेल्या. अरे, यांच्याकडे वर्षभर शेतीला पाणी आहे, जंगलात वारेमाप साग आहे, इथून माणसं बाहेर कामाला जात नाहीत, पिकं तरी किती? 

बारीपाड्याला विकासाची वेगळी दृष्टी आहे. अस्सल भारतीय, स्वतःत समाधान मिळवणारी दृष्टी. स्वयंपूर्ण, स्थिर, शांत जीवनाची दृष्टी. हीच विशेषणं चैत्रामभाऊंची आहेत.

जे अस्तित्वात असतं, ते सत्य – म्हणजे उलटं करून सांगायचं तर – ‘सत्य असतंच!’ ते सांगावं, घडवावं लागत नाही. चैत्रामभाऊंच्या जगण्यात, बारीपाड्याच्या विकासात – ते सत्य आहे.

आताच्या जगातला झगमगाटाचा पडदा दूर सारला, की ते सत्य दिसतं. ईशावास्योपनिषदातली हीच प्रार्थना आहे.

तसं सत्य सहज जगण्यात सापडलेला माणूस ते सांगायला, प्रचारायला धडपडत नाही. चैत्रामभाऊंचं कुठे भाषण ठेवायचं म्हटलं की पंचाईत असायची. कारण यांचं भाषण २-३ मिनिटात संपायचं. त्यामुळे मुलाखत ठेवायची, म्हणजे जितके प्रश्न येतील तितकी उत्तरं यायची. बरं त्यात एकदाही, चुकूनही ‘मी’ येत नाही, ‘आम्ही’ सुद्धा येत नाही, सतत ‘आपण’ असतो. ऐकणाऱ्यांना सुद्धा त्यांनी त्यात घेतलेलं असतं. तुम्ही काही केलं नसलंत, तरी तुमच्या सदिच्छा आम्हाला उपयोगी पडल्याच – अशी सच्ची भावना असते.

यापुढेही मला वाटतं की, एखाद्या जाहीर कार्यक्रमात त्यांच्या नावापुढे पद्मश्री लावून लोक बोलू लागले, की चैत्रामभाऊ बसल्या खूर्चीतच अवघडतील. आणि कधी एकदा मी खाली उतरतो आणि मातीवर पाय टेकतो अशी भावना स्पष्ट दिसेल.

“आपल्याला सगळ्यांना पद्मश्री मिळाली आहे” असं वाटून घेण्याचाच हा क्षण आहे! अभिनंदनाचे लेख-पोस्ट काही लिहीले तरी तो माणूस काही अंगाला लावून घेणार नाही!

लेखक : श्री मिलिंद थत्ते

 Phones: +91. 9421564330 / Office: +91. 253. 2996176

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments