श्री सुहास रघुनाथ पंडित
☆ याद ना जाये… – लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
काल संध्याकाळी सोसाट्याचा वारा सुटला होता. नंतर कितीतरी वेळ पाऊस नुसता कोसळत होता. सगळीकडे १५ मिनिटात पाणीच पाणी झाले. घराच्या उंच गॅलरीतून दिसणा-या रस्त्याच्या तुकड्यावर क्षणाधार्त रंगीबेरंगी छत्र्या फिरताना दिसू लागल्या. पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावरील पाण्यात पडल्यावर वेडीवाकडी प्रतिबिंबे लक्ष वेधून घेत होती. कॉलनीच्या कंपाउंडमधील उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि पाने अक्षरश: वेड्यासारखी हलत होती. गुंगीत घर सोडून चाललेल्या एखाद्याला कुणीतरी दंड धरून गदगदा हलवावे तसे! त्यावेळी शेंड्याजवळच्या पानामागे लपलेले एक कावळ्याचे घरटे दिसले. घरटे म्हणजे काय दोन फांद्या फुटत होत्या तिथे काड्याकाटक्यांचे तुकडे कसेबसे गोलगोल रचलेले. आता घरट्यात काहीच नसावे कारण पिल्ले असती तर कावळ्यांनी कोलाहल करून सगळा परिसर डोक्यावर घेतला असता. कावळेही कुठे दिसत नव्हते.
पावसाळ्यात हे ठरलेलेच असल्यासारखे चालू असते. अनेक पक्षांची पिले उडून गेलेली घरटी उध्वस्त होतात. पण त्याचे खुद्द त्या पक्षांनाही फारसे काही वाटत नाही. त्यांचे सगळे आयुष्य निसर्गाने कसे शिस्तीत बसविलेले असते. ठरलेल्या ऋतूतच जन्म, ठरलेल्या वेळीच प्रणयाराधन. ते झाल्यावर दिवसभर मनमुराद शृंगार. मग जेंव्हा दोनतीन नव्या पाहुण्याची चाहूल लागते तेंव्हा त्यांच्यासाठी तात्पुरता निवारा तयार करायची दोघांची लगबग. त्यासाठी दिवसभर आळीपाळीने कुठून कुठून काड्या, कापूस, तारा, काहीही जमा करत राहणे. मग पक्षीण अंडी देवून त्यावर दिवसदिवस बसून राहते. एका दिवशी अंड्यातून एकही पीस अंगावर नसलेले चिमुकले जीव बाहेर आले की काही दिवस डोळ्यात तेल घालून त्यांचे रक्षण. पिलांना मिळेल ते अन्न चोचीने भरवायची जबाबदारी मात्र आई-बाबा अशी दोघांचीही ! आणि पिले काही दिवसातच मोठी होऊन, उडून गेली की स्वत:ही त्या घराचा त्याग करून निघून जायचे. कसा अगदी संन्याशाचा संसार !
कालच्या त्या कावळ्यांच्या घरट्याचे अवशेष पाहताना सहज आठवले. लहानपणी कितीतरी गोष्टी अगदी वेगळ्या होत्या. मोठ्या शहरातील काही प्रशस्त बंगले, मोजकीच दुमजली घरे सोडली तर बहुतांश घरे बैठी आणि कौले किंवा पत्रे असलेली असायची. सिमेंटचे किंवा लोखंडी पत्रे लाकडी बल्ल्यांवर खिळ्यांनी ठोकून बसविलेले असत. सिमेंटचे पत्रे आणि पन्हाळीच्या उंचवटयाखालील एवढ्याश्या जागेत सायंकाळी एकेक चिमणी येऊन बसायची. रात्रभर तिचा मुक्काम घरात किंवा व्हरांड्यात असायचा. खाली जमिनीवर अंथरून टाकून झोपल्यावर आम्ही आज किती चिमण्या मुक्कामाला आहेत ते मोजायचो. रात्रीपुरत्या आमच्या पाहुण्या होणाऱ्या चिमण्या पहाट होताच बसल्या जागीच थोडी थोडी चिवचिव करून भुर्रकन उडून जात. चिमण्याशिवाय कोणताही पक्षी कधी घरात येत नसे.
चिमण्या कधीकधी छताजवळ घरटीही करत. मग अचानक अगदी बारीक आवाजात अधीर असे ‘चिवचिव’ ऐकू येऊ लागले की समजायचे चिमणीला पिल्ले झालीत. मग चिमणा चिमणी त्या पिल्लांना दिवसभर काही ना काही भरवत. पिल्ले अन्नासाठी फार अधीर होत. उतावीळपणे ती कधीकधी चिवचिवाट करून हळूहळू पुढे सरकत आणि त्यातले एखादे उंचावरून खाली पडे. ‘टप्प’ असा पिलू पडल्याचा अभद्र आवाज आला की जीव कळवळत असे. एवढासा जीव इतक्या उंचावरून जमिनीवर पडला की अर्धमेला होऊन जाई. पिकट लाल-पांढुरके लिबलिबीत अंग, पारदर्शक त्वचेतून दिसणा-या त्याच्या लाल निळ्या रक्तवाहिन्या, अंगापेक्षा बोंगा अशी डोनाल्ड डकसारखी पिवळी मोठी पसरट चोच, धपापणारे हृदय असा तो अगदी दयनीय गोळा असे. फार वाईट वाटायचे. लगेच आम्ही मुले दिवाळीतील पणती कुठून तरी शोधून आणायचो. तिच्यात पाणी भरून त्याच्याजवळ ठेवायचो. शेवटच्या घटका मोजत असलेले ते पिल्लू स्वत:ची मानसुद्धा उचलू शकत नसायचे. मात्र आम्हाला भूतदया दाखवायची फार घाई झालेली असल्याने वाटायचे त्याने घटाघटा पाणी प्यावे, ताजेतवाने व्हावे आणि उडून परत आपल्या घरट्यात जावून बसावे. अर्थात असे काही व्हायचे नाही. लहान मुले देवाघरची फुले असतात, म्हणे ! पण देव त्याच्या घरच्या अशा किती निरागस फुलांच्या प्रार्थना नाकारतो ना ! फार राग यायचा तेंव्हा देवाचा ! पिलू मरून जायचे. त्याच्या मृत्यूचे दृश्य मोठे करुण असायचे. सगळेच अवयव अप्रमाणबद्ध असल्याने विचित्र दिसणारे, मान आडवी टाकून मरून पडलेले पिल्लू, त्याच्या अवतीभवती आम्ही टाकलेले काही धान्याचे दाणे आणि आमच्या त्याला पाणी पाजायच्या प्रयत्नात जमा झालेले बिचा-याला भिजवून टाकणारे पाण्याचे थारोळे ! आम्ही अगदी खिन्न होऊन जायचो. मग आईकडून त्याच्या मृत्यूची खात्री करून घेतल्यावर आम्ही बागेत त्याचा दफनविधी पार पडीत असू. माणसाच्या पिलाच्या मनात जिवंत असलेले सा-या सृष्टीबद्दलचे ते निरागस प्रेम नंतर कुठे जाते कोणास ठावूक !
चाळीसमोर अशीच एक कुत्री होती. तिचे नाव चंपी. गडद चॉकलेटी रंगाची चंपी दुपारी बाराच्या सुमारास चाळीतल्या प्रत्येक घरासमोर जाई. घरातील बाई तिला आधल्या रात्रीच्या उरलेल्या भाकरीचा तुकडा टाकीत असे. तो खावून चंपी पुढचे घर गाठी. कधीकधी बायका आतूनच ओरडत, “काही नाहीये ग चंपे, आज. ” चंपी तशीच पुढे सरकत असे. चंपीला कसे कुणास ठावूक मराठी समजायचे. चंपीलाच काय, ३०/४० वर्षापूर्वीच्या त्या साध्यासरळ काळात गाय, बैल, घोडा, कुत्रीमांजरी, पोपट असे सगळ्यांनाच मराठी छान समजायचे. हल्लीसारखे त्यांच्यासाठी मराठी माणसाला इंग्रजी शिकावे लागत नसे.
पावसाळ्यात चंपीला हमखास पिले होत. त्यावर चाळीतील सगळ्या मुलांचा हक्क असे. पहिले काही दिवस पिलांचे डोळे बंद असल्याने चंपी पिलांजवळून हलायचीच नाही. मग चाळीतील बायका चंपी ज्या कुणाच्या बागेत, आडोसा बघून, माहेरपणाला गेली असेल तिथे जावून तिला भाकरी वाढीत. आम्ही मुले लांबूनच पिलांचे निरीक्षण करायचो. त्यातील पिले आम्ही बुकही करून टाकलेली असत. पांढ-याकाळ्या ठिपक्याचे माझे, काळे सत्याचे, चॉकलेटी न-याचे अशी वाटणी होई. पिले मोठी झाल्यावर, आम्ही त्यांचा ताबा घेत असू. अर्थात त्या काळच्या आईवडिलांच्या गळी असल्या फॅन्सी कल्पना लवकर उतरत नसत. तरीही एकदोन मुले त्यात यशस्वी होत. मग त्या पिलाला खाऊ घालणे, त्याच्यासाठी घरासमोरच्या अंगणात सातआठ विटांचे घर तयार करणे. त्यात त्याला जबरदस्तीने घुसवायचा प्रयत्न करणे अशा गोष्टी आम्हाला कराव्या लागत. अनेकदा पिलू रात्रभर रडे मग घरच्या दबावाने आम्हाला त्याची कायमची मुक्तता करावी लागे. आम्ही एकदोन दिवस तरी हिरमुसले होऊन जात असू.
कॉलेजला असताना एक फर्नांडीस नावाचा मित्र शेजारच्या दुस-या गावाहून येत असे. त्याच्या खिशात त्याने पाळलेली एक खार असायची. असा विचित्र प्राणी पाळणारा म्हणून फर्नांडीस आमच्या कॉलेजसाठी एक हिरोच होता. खार त्याचे ऐकून कॉलेजचे सर्व पिरीयडस होईपर्यंत खिशात गपचूप कशी काय बसून राहायची देवच जाणे. एक दिवस ती मेली. पण सगळ्या वर्गाला उदास वाटले.
तान्ह्या मुलांना पाळणाघरात आणि आईवडीलांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा आधुनिक ‘करीयरिस्ट’ काळ हा ! आता या असल्या पक्षी आणि प्राण्यांच्या लळ्याच्या गोष्टी तशा कालबाह्यच म्हणा ! पण जुन्या आठवणी आल्या की महंमद रफीच्या आवाजातले आठवणींबद्दलचे गाणेही आठवत राहते –
“दिन जो पखेरू होते, पिंजरे मे, मैं रख लेता,
पालता उनको जतन से, मोती के दाने देता,
सीने से रहता लगाये,
याद ना जाये, बीते दिनो की |”
*******
लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे
७२०८६ ३३००३
संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈