श्रीमती समीक्षा तैलंग
जीवनरंग
☆ ‘अफलातून अभिनंदन…’ ☆ श्रीमती समीक्षा तैलंग ☆
आज सकाळी-सकाळी गणेशाचे नांव घेऊन घराच्या बाहेर पडले. अहो! पडले म्हणजे पडले नाही बरं का! म्हणजे सकाळी वॉक करायला निघाले. पडून राहणे किंवा पडणे हे दोन्हीच टाळायला ह्या वयात वॉक करणे गरजेचे आहे की नाही!
रस्त्यावर चालताना मागून ओळखीचा आवाज कानाच्या पडद्यावर पडताच जोराने कंपन व्हायला लागले. एवढ्या जोराने हाक मारायला काय झालं? जणू ट्रेनची हॉर्नच मागून सोडली असावी. रेलगाडी पण उगाच हॉर्न वाजवत येते. लोकं घरून उशिरा निघतील पण प्लेटफॉर्म क्रॉस करायला गाडीच्या रुळाचाच वापर करतील. अहो त्यांचा सिद्ध अधिकार आहे! तसेच रुळाच्या कडेला ढुंगण उंच करून बसणारे सुद्धा तसेच राहणार. रेल्वेने कितीही स्वच्छता मोहिमी चालवल्या तरीही त्यांच्या बुद्धीत प्रकाश पडणे शक्यच नाही. तिथे असलेल्या शेणाची सफाई कोण करणार!
“बाब्या काय रे कशाला ओरडून घसा कोरडा करतोयेस! हे पुण आहे. विसरला कां? सायकलीची हवा काढणारे बेशिस्त म्हणायला सोडणार नाही बरं का!”
“काकू तुला बधाई द्यायला आलो. ‘हॅपी हिंदी डे’. ”
“थैंक्यू रे! पण बाब्या तुला कसे माहीत की आज हिंदी दिवस आहेत? तुझा तर काहीच संबंध नाही हिंदीशी. खरं तर गोड तेल खाणाऱ्यांना कडू तेलाचा स्वाद कसा कळणार?”
“काकू सोशल मिडिया झिंदाबाद! जिकडे डोळे फिरवा तिकडे हिंदीच दिसतेय. आता हिंदी नस्ती भाषा राहिली कां? ब्रॅण्ड झालाये काकू! ब्रॅण्ड! माझ्या मित्राने आत्मनिर्भर भारतात नवा धंदा सुरू केला आहे. माहितीये काय नांव ठेवलंय त्याने! ‘जल’ हे त्याच्या कंपनीचे नांव आहे. त्याला कुठे हिंदी विंदी येते. सगळी कामे इंग्रजीत करतो पण ठसका पाहा त्याचा! एकदम बत्तीस कॅरेट सारखा चमकतोय त्याचा ब्रॅण्ड”.
“काय विकतो रे! पाणी?”
“अगं हे असले काम तो काय करणार! चाळीत टोळ्या राहतो न तोच आपल्या खडखड्या डंपर मधे पाणी आणतो. सद्याला हेच सगळं करायचं असतं तर एवढं शिकला कशाला असता? शिक्षणात केवढा पैसा इन्वेष्ट केलाय त्यानं! पाण्या सारखा वेष्ट करणार कां?”
“हो खरंय! मोफत मिळालेल्या वस्तुंना किंमत नसतेच. पाणी वायफळ घालवू शकतो. पैसा कसा घालवणार?”
“अगं काकू! सद्या वॉटर स्पोर्ट्स करवतो. त्या शिवाय शोकीनांना क्रूज, बोटी सगळं भाड्यावर देतो. मोठमोठे फिल्मस्टार पण येतात. हे सगळं ‘जल’ मुळे होतये. नावामुळे कष्टंबर मिळतात. मी पण असेच काही एडवेंचर करायला बघतोयं. पण करणार हिंदीतच. सध्याच्या काळाचा फॅशन आणि डिमांड आहे हिंदी!”
“मग शीक खरं!”
“शिकून काय करणार काकू! कष्टंबर हिंदीत कुठे बोलतात! आणि थोडी फार तर मला पण येतेच. आपल्या बिझनेसचे नांव मी हिंदीतच ठेवणार हे खरंय”.
“खरंय बाब्या! हिंदी गाजणार नाही पण तुम्हाला चमकावणार”.
“काकू तू परदेशात होती. तेथे फराटेदार इंग्रजी चालते न?”
“तेथे इंग्रजी खरच चालते. आपल्याकडे एक्स्प्रेसच्या स्पीडने धावते. किती माणसं तुटक बोलतात पण कोणी खाली पाहायला नाही दाखवत. तेथे अभिमानाची भाषा नाहीये ही. नुस्त ब्रिजचे काम करते. दोन माणसांना जोडते. आपल्या कडे उलट आहे. बाराखडी येत असे नसे पण अल्फाबेटस् सगळ्यांना येतात. नशीब पाहावे की बुलेट ट्रेन नसून आपल्या कडे त्या स्पीडने इंग्रजी धावते. आपलं सोडून पाळत्याच्या माघे धावणं हीच परंपरा आहे आपली. आपल्या कडे इंग्रेजी हाईक्लास आणि हिंदी विदाउट क्लास आहे”.
“काकू पुढं वाढायचं असेल तर इंग्रजी कम्पलसरी आहे”.
“माझा भाचा जपानला गेला तर तेथे त्याला जापानी शिकावी लागली. जेवढे वर्ष तेथे होता इंग्रजी घश्याबाहेर पडली नाही. तिची फास लागली नाही. तेंव्हाच मी समजले की भाषा मुळे आपले विचार आणि संस्कृती बदलते. इंग्रजी बोलता बोलता आपण त्यांचे संस्कार पण घेतलेच न”.
“तू एकदम बरोब्बर म्हणतेयेस काकू! चल आता मी निघतो. इंग्रजीच्या ट्यूशनाला जायची वेळ झाली आहे. बॉय!!”
© श्रीमती समीक्षा तैलंग
(ग्वाल्हेर, सध्या पुणे)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈