चित्रकाव्य
खरी धुळवड / जीवनाच्या आनंदात दंग… – चित्र एक काव्ये दोन ☆ श्री प्रमोद वामन वर्तक आणि श्री आशिष बिवलकर ☆
श्री प्रमोद वामन वर्तक
(१) खरी धुळवड…
☆
नाते तुटले जन्माचे
साऱ्या खऱ्या रंगांशी,
नेहमी डोळ्यांसमोर
काळी पोकळी नकोशी !
*
काया दिली धडधाकट
पण डोळ्यांपुढे अंधार,
समान सारे सप्तरंग
मनांतच रंगवतो विचार !
*
तरी खेळतो धुळवड
चेहरा हसरा ठेवुनी,
दोष न देता नजरेला
लपवून आतले पाणी !
लपवून आतले पाणी !
☆
© श्रीप्रमोद वामन वर्तक
मो 9892561086
☆☆☆☆
श्री आशिष बिवलकर
(२) जीवनाच्या आनंदात दंग…
☆
नेत्रहीन जरी असलो
तरी रंगांनी आम्ही रंगतो!
नशिबात जरी अंधार असला,
तरी जीवनाच्या आनंदात दंगतो!
*
कितीही जरी असला
अंधार काळा कुट्ट!
जीवनाशी जोपसतो
नाते आमचे घट्ट!
*
तिमिराकडून तेजाकडे,
जन्मत: आहे आम्हा ध्यास!
प्रेमाच्या ओलाव्याची,
मनाला एकच असते आस!
*
सहानुभूती नको आम्हा,
आजमावू दया पंखातले बळ!
फडफड जरी असली आता,
उडण्याची जिद्द नाही निष्फळ!
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈