श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत !” – भाग- १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
नायब सुभेदार संतोष राळे
त्याला त्यांनी एकदा नव्हे, दोनदा नव्हे… नऊवेळा माघारी धाडले! तरीही तो दहाव्यांदा परतून आला. त्याला आयुष्यात दुसरं काहीच प्यारं नव्हतं…. फक्त लढाई करायची होती! छत्रपती शिवरायांच्या जन्माने आणि कर्माने पावन झालेल्या भूमीत एका शेतक-याच्या पोटी जन्मलेल्या या मुलाच्या मनात एक गोष्ट निश्चित होती…. झुंज घ्यायची… परिणाम हा शब्द त्याच्या कोशात नव्हताच तर भीती हा शब्द तरी कसा असेल? दहावी उत्तीर्ण झाल्यावर कनिष्ठ महाविद्यालयासाठी गावातून तालुक्याच्या गावी जावे लागले तर तिथे हुतात्मा बाबू गेनू यांचे स्मारक नजरेस पडायचे…. असे काही तरी हातून घडले पाहिजे… त्याचा विचार पक्का झाला!
त्याने या विचाराला कृतीची जोड खूप आधीपासून द्यायला आरंभ केला होताच. शेतात राबायचं, तालमीत कसायचं. शाळेत जाऊन-येऊन आठ दहा मैल पळतच यायचं… गोटीबंद शरीर तयार होत होतं. शरीराचं वजन उंचीला मागे टाकून पुढे धावत होतं… काही पावलं.
ते वर्ष १९९१-९२ होतं. भारतीय लष्करात वर्षातून अनेक वेळा भरती कार्यक्रम आखले जात. सैनिक म्हणून युवकांना भरती करून घेताना कडक मापदंड असतातच. शारीरिक आणि वैद्यकीय तपासण्या अत्यंत काटेकोर असतात. शैक्षणिक कौशल्यही तपासले जाते.
आपले हे पहिलवान पहिल्या भरतीला पोहोचले आणि सर्व कसोट्या लीलया पार करते झाले… धावणे, उंच उडी, लांब उडी, पुल-अप्स इत्यादी इत्यादी मध्ये पहिला किंवा फार फार तर दुसरा क्रमांक…. पण एक गोष्ट आडवी आली….. उंची आणि वजन यांचा मेळ बसेना. उंची तर कमी किंवा जास्त करता येण्यासारखी नव्हती…. मग वजन कमी करणे गरजेचे झाले. प्रयत्न क्रमांक दोन ते नऊ मध्ये दरवेळी दीड दोन किलो वजन कमी व्हायचे पण तरीही ते भरतीच्या निकषांच्या जवळ जाऊन थांबायचे…. रिजेक्टेड शिक्का ठरलेला!
दहाव्या वेळी मात्र दैव काहीसे प्रसन्न झाले… चिकाटी पाहून! नेहमीप्रमाणे सर्वच कसोट्या पार पडलेल्या… आणि भरती अधिकारी म्हणाले…. नहीं होगा! त्याच वेळी मात्र तेथे उपस्थित असलेल्या जबाबदार वरिष्ठ अधिका-याची नजर या पहिलवान गड्यावर पडली… चेहरा ओळखीचा वाटत होता… नऊ वेळा येऊन गेलेला पोरगा कसा विसरला जाईल? त्या साहेबांनी त्यांच्या अधिकारात या गड्याला लष्करात घेतलं! काहीच महिन्यांत अंगावर लष्कराची वर्दी घालायला मिळणार होती. बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप मध्ये सैनिक असलेले शरीरसौष्ठवपटू चुलते श्री. रमेश बळवंत यांच्या नंतर लष्करात भरती होणारा त्यांच्या परिसरातला हा केवळ दुसराच तरुण ठरणार होता.
बेळगावच्या मराठा लाईट इन्फन्ट्री प्रशिक्षण केंद्रांत पाऊल ठेवले तोच प्रवेशद्वारात छत्रपती शिवरायांचा पुतळा दृष्टीस पडला आणि तिथे प्रशिक्षण घेत असलेल्या जवानांनी केलेला बोल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय! हा घोष कानी पडला…. आणि खात्री पटली की आपली पावले योग्य मार्गावर पडत आहेत. पण इथेही उंची वजन गणित आडवे आले. इतर सर्व बाबी परिपूर्ण असल्या तरी देहाचे वजन काहीसे मर्यादेच्या पलीकडे होते. वैद्यकीय अधिकारी म्हणाले…. नहीं होगा! पण भारतीय लष्कराला एक शूर, निधडा जवान लाभण्याचा योग होता. दहाव्या भरतीच्या वेळी भेटलेले वरिष्ठ अधिकारी येथेही देवदूत म्हणून उभे राहिले….. संतोष तानाजीराव राळे हे आता मराठा लाईट इन्फन्ट्री मध्ये प्रशिक्षण घेऊन देशरक्षणासाठी स्वीकारले गेले! यथासांग प्रशिक्षण पार पडले…. कसम परेड झाली!
त्या साहेबांनी विचारले… कोणत्या बटालियनमध्ये जाणार? याची तर काहीही माहिती नव्हती! संतोष म्हणाले…. जिथे प्रत्यक्ष लढायला मिळेल तिथे पाठवा, साहेब! साहेब मनात हसले असतील… त्यांनी संतोष राळे यांना ७, मराठा मध्ये धाडले! ही पलटण सतत सीमेवर तैनात असते… अर्थात शत्रूच्या अगदी नाकासमोर… मर्दुमकी गाजावण्याची संधी मिळण्याची शक्यता अधिक! संतोष मोठ्या आनंदाने कर्तव्यावर निघाले. पहिली नेमणूक भारत-पाकिस्तान काश्मीर सीमेवरील पूंछ सेक्टर येथे मिळाली… शत्रू तिथून अगदी नजरेच्या टप्प्यात दिसत होता. इथे काही महिने काढले कसे बसे.. पण काहीच घडेना. रात्रभर दबा धरून बसायचे पण शत्रू काही गावत नव्हता… रायफल शांत शांत असायची हातातली! मग देशाच्या काही सीमांवर बदली झाली… भूतान देशात जाऊनही चीन सीमा राखायला मिळाली… पण रायफल अजून शांतच होती… त्यामुळे संतोष यांना अस्वस्थ वाटू लागायचं…. सैनिक आणि लढाई या एका नाण्याच्या दोन बाजू…. हा रुपया बंदा असला तरच खणकतो. काहीच वर्षांत कारगिल घडले. पण याही वेळी पुढे जायला मिळाले नाही. पण कारगिल युद्धविराम झाल्यानंतरही एका पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी गटाने भारताच्या काही चौक्या त्यांच्याच ताब्यात ठेवल्या होत्या. यांपैकी एक चौकी परत मिळवण्याच्या कामगिरीमध्ये मात्र संतोष यांना सहभागी होता आले होते! वाघाला शिकारीची चटक लागली होती! पण पुढे बरीच वर्षे तशी शांततेमध्ये व्यतीत झाली…. संतोषराव पुन्हा अस्वस्थ झाले.. त्यांचे बाहू तर फुरफुरत होतेच.
२००७ वर्ष होते. त्यांच्या जवळच उरी सेक्टर… मच्छिल येथे ५६, आर. आर. अर्थात राष्ट्रीय रायफल्स बटालियन कार्यरत होती. ही बटालियन त्यांच्या अतिरेकीविरोधी यशस्वी अभियानामुळे सतत चर्चेत असायची! मला आर. आर. मध्ये जायचे आहे… घातक कमांडो कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या जवान संतोष यांनी हट्ट धरला… दोनेक वर्षांनी वरीष्ठांनी सांगितले… जाव! आणि मग हा मर्द गडी प्रत्यक्ष लढाईच्या मैदानात उतरला…. आणि रणभूमीने संतोष राळे यांची आर्जवे मान्य केली!
वर्ष २००८. अठरा अतिरेकी भारतात घुसणार आहेत.. अशी पक्की खबर लागली. त्यानुसार त्यांच्यावर चालून जाण्याची योजना तयार झाली. वरिष्ठ अधिका-यांनी दोन तुकड्या तयार केल्या. मागील तुकडीत संतोष साहेब होते. एक तुकडी पुढे दुस-या मार्गाने निघाली होती. त्या अठरा जणांना भारतीय हद्दीत प्रवेश करण्यासाठी जंगलाने वेढलेला एक रस्ता वापरणे अनिवार्य होते. या रस्त्यावर एक नाला होता आणि त्या नाल्यावर एक लाकडी पूल होता. नाल्यातील पाणी प्रचंड थंड असल्याने नाल्यात उतरून नाला पार करणे कोणालाही शक्य नव्हते. त्यानुसार त्या रस्त्याच्या आसपास सापळा लावून संतोष आणि त्यांचे सहकारी सैनिक दबा धरून बसले. पहाटेचे चार वाजले पण अतिरेकी दिसेनात. थंडीमुळे सैनिकांची शरीरे आकडून गेलेली.. तशाही स्थितीत बसल्या बसल्या शारीरिक व्यायाम करून शरीरांत उष्णता आणण्याचे प्रयत्न सुरु होते. पण उजाडले तरी अतिरेकी त्या लाकडी पुलावरून आले नाहीत. ज्या बाजूला आर. आर. ची तुकडी होती त्या बाजूला अचानक गोळीबाराचे आवाज येऊ लागले.. काही समजेना!
जसे आपले खबरी होते तसे अतिरेक्यांचेही खबरी होतेच. किंबहुना आपल्या खबरीने हेतुपुरस्सर चुकीचा दिवस सांगितल्याची दाट शक्यता होती… एक दिवस (किंबहुना एक रात्र) आधीच ही श्वापदं आपल्या घरात घुसली होती! पहिला डाव आपल्या विरुद्ध गेला होता. वरीष्ठांनी संतोष यांना माघारी यायला सांगितले. हे अतिरेकी आपल्या दुस-या संरक्षक फळीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले होते. पहा-यावर असलेल्या जवानांना त्यांची चाहूल लागली…. भयावह धुमश्चक्री झाली. ४५, राष्ट्रीय रायफल्स चे कर्नल जोजन थॉमस साहेबांनी यांतील सहा अतिरेकी टिपले.. २२ ऑगस्ट २००८चा तो दिवस होता… पण यांत जोजन साहेब आणि दोन जवान धारातीर्थी पडले. उर्वरीत अतिरेकी तिथून पाकिस्तानी सीमेकडे पळाल्याचे वृत्त हाती आले! या पळपुट्यांची आणि संतोष यांच्या तुकडीची गाठ पडायची दाट शक्यता होती. आणि तशी ती पडलीही! चार तासांच्या पायापीटीनंतर संतोष साहेब मागे इच्छित स्थळी पोहोचले. लख्ख उजाडले होते… आठ-सव्वा आठ वाजले असावेत. माघारी येण्याच्या मार्गावर असलेल्या संतोष राळे यांच्या पथकाला माघारी न येता तिथून पळून जाणा-या अतिरेक्यांच्या मार्गात दबा धरून बसण्याच्या व त्यांना ठार मारण्याच्या कामगिरीवर नेमण्यात आले. आधीच्या रात्री प्रचंड थंडीत उघड्यावर झालेले जागरण आणि घडलेला उपवास यामुळे थकलेल्या जवानांना संतोष राळे यांनी माघारी पाठवले आणि नवीन कुमक मागवली… त्यात घातक तुकडीचे काही कमांडोज होते. प्रचंड गोळीबारामध्ये आपल्या सैनिकांनी जड युद्ध साहित्य जीवाचा धोका पत्करून पोहोचवण्याची कामगिरी यशस्वी केली.
– क्रमशः भाग पहिला
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈