श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ४८ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- “साहेब, माझे काका व्यवसाय म्हणून पत्रिका बघत नाहीत. ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेत. या विषयाचा त्यांचा सखोल अभ्यास आहे आणि मुख्य म्हणजे ते स्वतः दत्तभक्त आहेत. पत्रिका पाहून उत्स्फूर्तपणे ते गरजूंना योग्य तो मार्ग दाखवतात. कुणाकडूनही त्याबद्दल अजिबात पैसे घेत नाहीत. तुम्ही प्लीज या साहेब.”
जोशींच्या बोलण्यातली तळमळ मला जाणवत होती. त्यांना दुखवावं असं मला वाटेना.
“ठीक आहे, मी येईन. पण मी कशासाठी पत्रिका दाखवतोय हे मात्र त्यांना सांगू नका. पत्रिका पाहून जे सांगायचं तेच ते सांगू देत. ” मी म्हंटलं.
कावरेबावरे झाले. काय बोलावं ते त्यांना समजेना.
“साहेब, मी.. त्यांना तुमची लखनौला बदली होणाराय हे आधीच सांगितलंय. पण म्हणून काय झालं? पत्रिका बघून त्यांचं ते ठरवतील ना काय ते. ” अशोक जोशी मनापासून म्हणाले. )
मी जायचं ठरवलं. लखनौला होणाऱ्या बदलीपेक्षा अधिक धक्कादायक माझ्या पत्रिकेत दुसरं कांही असूच शकणार नाही याबद्दल मला खात्रीच होती. त्यामुळे तिथे गेलो तेव्हा मनात ना उत्सुकता होती ना कसलं दडपण. पण मी तिथं गेल्यावर जे घडलं ते मात्र तोवर कधी कल्पनाही केली नव्हती असं मला हलवून जागं करणारं, मला एक वेगळंच भान देणारं होतं.. ! सगळंच स्वप्नवत वाटावं असंच. अतर्क्य तरी सुखद धक्कादायकही !!
आज ते सगळं आठवतानाही माझ्या अंगावर शहारा येतोय. वर्षानुवर्षं मनात तरंगत राहिलेल्या अनेक अनुत्तरीत प्रश्नांना त्या घटितांतून कधी कल्पनाही केलेली नव्हती इतक्या आकस्मिकपणे मिळालेली ती समर्पक उत्तरं जशी माझं औत्सुक्य शमवणारी होती तशीच ते वाढवणारीही. त्या अनुभवाने जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमधील अतूट धाग्यांची अदृश्य अशी घट्ट वीण अतिशय लख्खपणे मला अनुभवता आली. ‘त्या’च्या कृपादृष्टीचा माझ्या अंतर्मनाला झालेला तो अलौकिक स्पर्शच होता जो पुढे वेळोवेळी मला जगण्याचे नवे भान देत आलाय!
अशोक जोशींचे काका म्हणजे एक साधंसुधं, हसतमुख न् प्रसन्न व्यक्तिमत्त्व होतं. मी त्यांना नमस्कार केला. स्वतःची ओळख करुन दिली.
” हो. अशोक बोललाय मला. तुम्ही तुमची जन्मपत्रिका आणलीय ना? द्या बरं. मी ओझरती पाहून घेतो. तोवर चहा येईल. तो घेऊ आणि मग निवांत बोलू. ” ते म्हणाले.
त्यांचं मोजकं तरीही नेमकं बोलणं मला प्रभावित करणारं होतं.
मी माझी पत्रिका त्यांच्याकडे दिली. त्यांनी ती उलगडली. त्यांची एकाग्र नजर त्या पत्रिकेतील माझ्या भविष्यकाळाचा वेध घेऊ लागलीय असं वाटलं तेवढ्यांत चहा आला. त्यांची समाधी भंग पावली. त्यांचे विचार मात्र त्या पत्रिकेमधेच घुटमळत होते. कारण चहाचा कप हातात घेताच त्यांनी अतिशय शांतपणे माझ्याकडे पाहिले. सहज बोलावं तसं म्हणाले,
” तुमच्या पत्रिकेत सध्यातरी घरापासून तोडणारा स्थलांतराचा योग दिसत नाहीय. “
ऐकून खूप बरं वाटलं तरी ते खरं वाटेना. असं कसं असू शकेल?
“हो कां.. ?” मी अविश्वासाने विचारलं.
” हो. ” ते शांतपणे म्हणाले. “पत्रिकेत दिसतंय तरी असंच. पत्रिका बिनचूक बनलीय कीं नाही तेही पडताळून पाहू हवंतर. ” चहाचा रिकामा कप बाजूला ठेवत ते म्हणाले. त्यांनी पत्रिका पुन्हा हातात घेतली. कांहीशा साशंक नजरेने माझ्याकडे पहात त्यांनी विचारलं,
” तुम्हाला.. यापूर्वी कधी पुत्रवियोगाचं दु:ख सहन करावं लागलंय कां? “
मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत उत्सुकता होती आणि माझ्या नजरेसमोर समीरचा केविलवाणा, मलूल चेहरा.. !
” हो… खूप वर्षांपूर्वी.. ” माझा आवाज त्या आठवणीनेही ओलसर झाला होता.
“आणखी एक.. ” ते अंदाज घेत बोलू लागले, ” तुमच्या वडिलांच्या बाबतीत कांही एक अस्वस्थता, कांही एक रुखरुख कधी राहून गेली होती कां तुमच्या मनात? “
मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. त्यांची नजर भूतकाळात हरवल्यासारखी कांहीशी गूढ वाटू लागली!
“हो.. बाबांच्या बाबतीतली अतिशय रुतून बसलेली रुखरुख होती माझ्या मनांत…. ” तो सगळा क्लेशकारक भूतकाळच माझ्या मनात त्या एका क्षणार्धात जिवंत झाला होता !…
‘आयुष्यांत पहिल्यांदाच मु़ंबईला जाण्यासाठी मी घराबाहेर पडताना अडखळलेली माझी पावलं,.. तेव्हा अंथरुणाला खिळून असलेले माझे बाबा.. , त्यांना नमस्कारासाठी वाकताच आशीर्वाद म्हणून त्यांनी दिलेला दत्ताचा तो लहानसा फोटो, ‘ हा कायम जपून ठेव. याचे नित्य दर्शन कधीही चुकवू नको. सगळं ठीक होईल. ‘ हे त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यातून शुभाशीर्वाद दिल्यासारखे उमटलेले शब्द, साध्या साध्या गोष्टीत माझ्या लहानपणापासून सतत मला त्यांच्याकडून मिळालेलं कौतुकाचं झुकतं माप,… मी तिकडं दूर मुंबईत असताना त्यांच्या बळावलेल्या आजारपणांत मी त्यांची सेवा करायला त्यांच्या जवळ नसल्याची माझ्या मनातली सततची खंत, नंतर त्यांना तातडीने पुण्याला ससूनमधे हलवल्याचा निरोप मिळताच त्यांना भेटण्यासाठी माझ्या मोठ्या बहिणीला आणि तान्ह्या भाचाला सोबत घेऊन रात्रीच्या मुंबई-पुणे पॅसेंजरचा संपूर्ण रात्रभराचा प्रवास करीत आम्ही त्यांना भेटण्यासाठी घेतलेली धाव आणि त्यांची रुम शोधत त्यांच्याजवळ जाऊन पोचेपर्यंत त्यांनी सोडलेला त्यांचा अखेरचा श्वास…. !! तो सगळाच भूतकाळ एखाद्या चित्रमालिकेसारखा नजरेसमोरुन क्षणार्धात सरकत गेला आणि तो रेंगाळत राहिला बाबांच्या अंत्यविधी वेळच्या माझ्या मनातील अव्यक्त घालमेलीत.. !’
….. “तुम्ही आयुष्यभर माझे खूप लाड केलेत. कौतुक करतानाही दादाच्या तुलनेत प्रत्येकवेळी झुकतं माप देत आलात ते मलाच. असं असताना तुमची सेवा करायची वेळ आली तेव्हा मात्र मला दूर कां हो लोटलंत? तुमच्या आजारपणात माझी आई आणि दोन्ही भाऊ तुमच्याजवळ होते. त्यासर्वांनी तुमची मनापासून सेवा केली, तुम्हाला फुलासारखं सांभाळलं,.. पण मी.. ? मी मात्र तिकडे दूर मुंबईत अगदी सुरक्षित अंतरावर पण तरीही अस्वस्थ…. ” बाबांशी हीच सगळी खंत मी मूकपणे बोलत रहायचो त्यांच्या अंत्यविधीच्यावेळी! पुढे कितीतरी काळ आपल्या हातून त्यांची सेवा न घडल्याची रुखरुख माझ्या मनात रेंगाळत राहिलेली होती… !!
” मी सहजच विचारलं हो. आठवत नसेल तर राहू दे हवं तर. ” जोशीकाकांच्या आवाजाने मी दचकून भानावर आलो.
” नाही म्हटलं,.. तशी खंत, रुखरुख असं कांही नसेल आठवत तर राहू दे.. “
” मला आठवतंय.. बाबा गेले तेव्हा अखेरच्या क्षणी थोडक्यात चुकामूक झाल्याची, त्यांची साधी दृष्टभेटही न झाल्याची खूप अस्वस्थता होती माझ्या मनांत.. ! हो.. आपल्या हातून त्यांची सेवा न घडल्याची रुखरुख त्यांचा अखेरच्या निरोप घेतानाच्या प्रत्येकक्षणी मला खूप त्रास देत होती आणि पुढेही बरीच वर्षं ती मनात रूतून बसली होती… ” मी म्हणालो. ते ऐकून मनातला तिढा अलगद सुटल्यासारखा त्यांचा चेहरा उल्हसित झाला.
” तुमच्या मनातली ती रुखरुख नाहीशी करण्यासाठीच तुमच्या पहिल्या अपत्याच्या रूपाने ते तुमच्या सहवासात आले होते. फक्त तुमच्याकडून सेवा करुन घेण्यासाठी.. ”
माझ्या गतकाळातल्या त्या सगळ्या घटनाक्रमांमधला कण न् कण अतिशय मोजक्या शब्दांत जोशीसरांनी नेमकेपणाने असा व्यक्त केला आणि मी अंतर्बाह्य शहारलो.. ! पण ते मात्र क्षणार्धात माझ्या भूतकाळातून अलगद बाहेर आल्यासारखे मुख्य विषयाकडे वळले.
” याचा अर्थ तुमची पत्रिका अचूकपणे तयार केलेली आहे. ठीकाय. मग आता चिंता कसली? तुमच्या पत्रिकेत दूरच्या स्थलांतराचे योग नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ! तेव्हा निश्चिंत रहा. दत्तमहाराज तुमच्या पाठीशी आहेत. सगळं विनाविघ्न पार पडेल. “
जोशीकाकांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो तेव्हा खरंतर मी आनंदात तरंगत असायला हवं होतं. पण तसं झालं नव्हतंच. कारण दूर स्थलांतराचा योग नाही याचा अर्थ लखनौची बदली रद्द होईल असंच. पण ते होणं इतकं सहजशक्य नाहीय हेही तेवढंच खरं होतं. शिवाय लखनौच्या बदलीची शक्यता कांहीशी धूसर होत चालल्याचा आनंदही अजून कांही दिवस कां होईना माझ्या पोस्टींगची आॅर्डर येईपर्यंत अधांतरी तरंगतच रहाणार होता !
या मन उदास करणाऱ्या विचारांना छेद देत एक वेगळाच विचार मनाला स्पर्शून गेला. माझ्या लखनौ पोस्टींगची बातमी आल्यापासून भराभर घडत गेलेले हे घटनाक्रम पूर्वनियोजित असावेत असंच वाटू लागलं. जोशीकाकांना भेटण्यास अशोक जोशी आग्रहाने मला प्रवृत्त करतात काय आणि माझ्या स्थलांतराचा योग नसल्याचा दिलासा देत, माझ्या आयुष्यात अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांची कांहीही पूर्वकल्पना नसतानाही जोशीकाका समीरच्या जन्म आणि मृत्यूची सांगड सहजपणे घालत असतानाच त्यातून माझ्या बाबांच्या पुनर्जन्माचं सूचन करून मला विचारप्रवृत्त करतात काय,… सगळंचअघटित, अतर्क्य आणि मनातल्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं देत असतानाच त्यातून मनात नवीन प्रश्न निर्माण करणारंही! हेच विचार मनात असताना हे सगळं मला दिलासा देण्यासाठी ‘त्या’नेच घडवून आणल्याचं लख्खपणे जाणवलं आणि मनातलं मळभ हळूहळू विरू लागलं!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈