श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “माइंडफुलनेस” – लेखक – डॉ. राजेंद्र बर्वे ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : माइंडफुलनेस
– – वर्तमान क्षणात जगण्यासाठीची ‘पूर्णभान’ संकल्पना
लेखक: डॉ. राजेंद्र बर्वे
पृष्ठ: १३७
मूल्य: २००₹
सोशल मीडिया आणि समाजातील वाढती झुंडशाही, हव्यासांचे इमले, ताणतणावांची चढती भाजणी, यांमुळे मनाच्या एकाग्रतेवर, स्थिरतेवर आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर परिणाम होत आहे. आज प्रत्येकाच्या मनाला गरज आहे ती पूर्णभानाने जगण्याची, अर्थात माइंडफुलनेसची !
पूर्णभान म्हणजे अस्तित्त्वाची वर्तमानातील लख्ख जाणीव… पूर्वग्रह आणि निवाडा छेदून जाणवणारी उत्साही व लक्षपूर्वक जोपासलेली मनोवृत्ती… सभोवतालासकट स्वतःचा केलेला बिनशर्त स्वीकार. अशी जागती जाणीव स्वतःमध्ये निर्माण करायची तर, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि नेटकं मार्गदर्शन घ्यावं लागतं. हे साध्य करण्यासाठी गप्पाटप्पा, व्यक्तिगत समायोजन, प्रश्नोत्तरं, कविता-गाणी आणि अशा आनंदयात्रेतून पूर्णभानाचं प्रशिक्षण देत आहेत सुगत आचार्य डॉ. राजेंद्र बर्वे.
आता आधुनिक काळातील मानसोपचारांना वर्तमानकाळाचे वेध लागले जे काही घडवायचं ते ‘इथेच आणि आताच’ अशा पद्धतीने करायला हवेत असे विचार रुजले.
इंग्रजीत या संकल्पनेला ‘हियर अँड नाऊ’ असं संबोधतात. त्यानंतर १९७९ मध्ये जॉन कब्याट झीन यांनी हे आव्हान स्वीकारलं, मानसिक ताण-तणावाची तीव्रता कमी करण्यासाठी त्यांनी ‘माइंडफुलनेस ‘ प्रणालीचा वापर करून त्यावर शोधनिबंध लिहिला आणि मानसशास्त्रामध्ये त्याला सार्वमत मिळालं. हा बदल ऐतिहासिक ठरला. कारण ‘इथे आणि आता’ या संकल्पनेला समर्पक आयाम लाभला.
झीन स्वतः विपासनेचे विद्वान अभ्यासक, अचूक शब्दांत त्यांनी माइंडफुलनेसच्या संकल्पनेची व्याख्या मांडली. वर्तमानावर हेतुपूर्ण लक्ष्य केंद्रित करून जे मनात आणि आसमंतात घडतं आहे त्याचा विनाअट आणि विना निवाड्याने स्वीकार करणं म्हणजे माइंडफुलनेस !
झीन यांनी वर्तमानकाळाचा असा अचूक वेध घेतला. यावर अत्यंत काटेकोर संशोधन केलं. पुढे त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि इतिहास घडला.
आत्ताचा क्षण आनंदाने आणि समस्यामुक्तपणे जगण्याचा मंत्र देणारं पुस्तक माइंडफुलनेस.
लेखक परिचय
डॉ राजेंद्र बर्वे यांनी एल. टी. एम. मेडिकल कॉलेज, सायन मुंबई येथून पहिल्या क्रमांकासह एम. डी. ची पदवी प्राप्त केलीगोडा मेडिटेशन सेंटर, कोलंबो, श्रीलंका येथून भन्ते ओलाआनंदा यांच्या हस्ते त्यांना ‘माइंडफुलनेस टीचर’ (सुगत आचार्य) ही पदवी प्रदान करण्यात आली. पाश्चात्त्य वैद्यकीय विज्ञान पटक आणि पौर्वात्य तत्त्वज्ञान यांचा सुयोग्य संगम साधून माइंडफुलनेस अर्थात पूर्णभान या विषयावर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली आहेत. गेल्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत देश-विदेशातील विविध कार्यशाळा आणि परिषदांमधून त्यांनी ‘न्यूरो सायन्स’, ‘मानसिक आरोग्य’ आणि ‘समग्र आरोग्य विचार‘ या विषयांवर तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन केलं आहे. कतार इथे एका मोठ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी माइंड लनेस या विषयावर त्यांनी कार्यशाळा घेतली असून, लंडन येथील एका खासगी वाहिनीसाठी माइंडफुलनेस विषयावर मुलाखतही दिली आहे.
प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈