सौ शालिनी जोशी
विविधा
☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – संत मुक्ताबाई… भाग – १ ☆ सौ शालिनी जोशी ☆
चौदाशे वर्षाच्या चांगदेवाना या बारा तेरा वर्षाच्या मुलीने ‘चांगदेव पासष्टीचा’ अर्थ उलगडून सांगितला. ‘चांगा कोरा तो कोराच’ अशा शब्दात चांगदेवांची थट्टा करणारी मुक्ताई चांगदेवांची गुरु झाली. यांनी तिचे शिष्यत्व पत्करून तिचा गौरवच केला. नामदेव तिच्याविषयी म्हणतात, ‘लहानगी मुक्ताबाई जशी सणकाडी। केले देशोधडी महान संत।’ते योग्यच आहे. हटयोगी, वयोवृद्ध, ज्ञाननिष्ठ चांगदेवांना ज्ञान देणारी मुक्ताई खरोखरच जगावेगळी. चांगदेवानी तिला आपली आई मानलं. बौद्धिक, ज्ञानमय, मनोमय मातृत्व मुक्ताबाईंनी चांगदेवाना दिले. चांगदेवाना उद्देशून रचलेल्या पाळण्यात त्या म्हणतात,
पाळणा लाविला हृदय कमळी। मुक्ताई जवळी सादविते।
वटेश्वर सुत चांगा अवधूत। मुक्ताई शांतवीत ज्ञानदृष्टी।
समाजाभिमुख व अर्थपूर्ण असे ४० अभंग मुक्ताबाईंनी लिहिले. त्यातील एक प्रसिद्ध अभंग,
मुंगी उडाली आकाशी, तिने गेलेले सूर्यासी।
थोर नवलावर झाला, वांझे पुत्र प्रसवला।
विंचू पाताळासी जाय, शेष वंदी त्याचे पाय।
माशी व्याली घार झाली, तेणे मुक्ताई हासली।
समाजातील तीन प्रवृत्तीच्या लोकांचे वर्णन करणारा हा अभंग. विद्वांनानाही विचार करायला लावणारी अशी ही गुढ रचना, लहान वयात मुक्ताबाईंनी केली. यातील पहिली ओळ त्यांचेच वर्णन वाटते.
संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतल्यानंतर सासवडला सोपानदेवानी समाधी घेतली. नंतर निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तिर्थ- यात्रा करत निघाले. १२ मे १२९७ रोजी तापी नदीच्या तीरावर अचानक वीज कडाडली. आदिमाता लुप्त झाली. मेहुण येथे त्यांची समाधी आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे रूप असणाऱ्या भावांची ही बहीण आदिमाया मुक्ताई. तिच्या समाधी प्रसंगाचे वर्णन नामदेवाने केले,
वीज कडाडली निरंजनी जेव्हा। मुक्ताई तेव्हा गुप्त झाली।
अशाप्रकारे अभिमान, अस्मिता, परखडपणा यांचे बरोबर मार्दव व हळूवारपणा यांचे रूप म्हणजे मुक्ताई. जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद तालुक्याला मुक्ताईनगर नाव दिले आहे.
स्त्री-पुरुष भेदाच्या पलीकडे गेलेली, तीन आत्मज्ञानी भावांची बहीण असुनही वेगळे व्यक्तिमत्व असणारी मुक्ताबाई अमर झाली. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील पहिली संत कवियत्री ठरली. नामस्मरणाने विदेही होण्याचा मार्ग त्यांनी स्त्रियांना तसेच सर्व लोकांना दाखवला. सदेह मुक्तीचा अनुभव त्यांनी घेतला होता. स्त्री पुरुष समानतेची त्या प्रचारक ठरतात.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈