सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कृष्णस्पर्श… – लेखक : श्री विवेक घळसासी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

‘कुब्जा’ हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर येते ती मथुरेतील कंसाची दासी. कुरुप, कुबड असलेली एक वृद्धा. कंसासाठी ती चंदन घेऊन जात असते. वाटेत कृष्ण भेटतो. म्हणतो, ‘सुंदरी, मला देशील चंदन?’ 

कुणी तरी तिला प्रथमच ‘सुंदरी’ म्हणाले होते. तिने कृष्णाला चंदनाचा लेप लावला. कृष्ण कुणाकडून तसेच काही कसे घेईल? त्याने कुब्जेच्या हनुवटीला धरून ती वर उचलली आणि कुब्जा खरेच सुंदर झाली.

भक्तांना हे सहजच पटते. चिकित्सकांना ही निव्वळ कल्पित कहाणी वाटते. मला या कथेतून वेगळाच आनंद मिळतो.

कुणी असुंदर असेल तर मान उंचावून कसे वावरेल? त्यात दासी असल्याने तिला ‘तोंड वर करायचा’ अधिकार तरी कसा असेल? कृष्णाने कुब्जेची हनुवटी उंचावली. तिला ताठ व्हायला शिकवले. कुरूप असो की दासी असो; मान वर करूनच जगले पाहिजे, हे भान कृष्णाने तिला दिले.

‘दिसण्या-असण्यातून’ न्यूनगंड निर्माण होऊ न देता आपणही दिमाखात जगू शकतो, हे दाखवण्याची संधी ईश्वराने किती विश्वासाने आपल्याला दिली आहे. कुब्जा सुंदर झाली की नाही हे मला ठाऊक नाही; पण मनातली असुंदरतेची जाणीव कृष्णाने दूर केली, असे मला वाटते.

इकडे आमच्या विठुरायानेही कंबरेवर हात ठेवून, थाटात उभे राहत हे दाखवून दिले की, सौंदर्य नाही तर औदार्य महत्त्वाचे. सौंदर्य येते आणि वयोमानाने ओसरतेही…. औदार्य अठ्ठावीस युगे टवटवीतच राहते.

खूपदा भक्ती करणारेही जेव्हा म्हणतात की, देवा-धर्माचे इतके आम्ही करतो; पण ईश्वराची कृपा काही होत नाही… पण, पारमार्थिक साधना म्हणजे जग बदलणे नाही, तर आपला दृष्टिकोन बदलणे हे समजले की आपल्या वृत्तीच्या कुब्जेला सुंदर व्हायला वेळच लागत नाही.

रखरखत्या उन्हात कुठून कोकीळ कुजन ऐकू आले की मनाला निवलेपण जाणवते ना?

पहिल्या पावसाने आसमंतभर दरवळणाऱ्या मातीच्या गंधाने चित्ताला हरखून जायला होते की नाही?

तान्हे मूल कुणाचेही असो; गर्दी-गोंधळातही आपल्याकडे बघून गोड हसते तेव्हा आपल्याही ओठांवर स्मितरेषा दरवळते की नाही?

…… आपल्याबाबत हे घडते तेव्हा निश्चित मानावे की आपल्याला कृष्णस्पर्श झाला आहे.

…… अंतरीची ही निरपेक्ष संवेदनशीलता हाच कृष्णाचा साक्षात्कार.

…… मनातली असुंदरतेची, अपूर्णतेची जाणीव संपली की सारे सुंदरच आहे. हे जाणवते.

……. माझ्या कृष्णाने निर्माण केलेले काहीही असुंदर असूच शकत नाही, ही श्रद्धा दृढ असली की झाले!

लेखक : श्री विवेक घळसासी

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments