श्री सुनील शिरवाडकर
इंद्रधनुष्य
☆ सुमती देवस्थळे… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
ही कहाणी आहे मागील पिढीतील एक अत्यंत अभ्यासु व्यक्तीमत्व म्हणजे सुमती देवस्थळे यांची. जन्म २७ डिसेंबर १९२७ चा. शालेय शिक्षण पुण्यात. शालेय शिक्षण झाल्यावर त्यांनी एस. पी कॉलेजला बी. ए. ला अँडमिशन घेतली. पहिल्या वर्षाचा रिजल्ट लागला आणि सुमती परांडे हे नाव कॉलेजमध्ये सर्वतोमुखी झाले. कॉलेज मध्ये असताना त्यांनी नाटकात कामे केली आणि अचानकच त्यांचे लग्न ठरले.
सोलापुरच्या देवस्थळे यांचा हा मुलगा. मुंबईत रेल्वेत होता. कायमस्वरूपी नोकरी. लग्न जमण्यासाठी एवढे पुरेसे होते.
पण..
जोडा शोभणारा नव्हता हेही तितकेच खरे. देवस्थळे तसे निरागस.. पापभिरू.. आणि थोडासा न्युनगंड देखील. जोडीला शारिरीक दुर्बलता (असावी).
त्याउलट सुमतीबाईंचे व्यक्तीमत्व आकर्षक.. हुशार.. आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेल्या.
१९४७-४८ चा काळ. इंटरपर्यंत शिकलेली २० वर्षाची ब्राह्मण मुलगी. सर्वसामान्य पणे परीस्थितीला शरण गेली असती. संसारात रमुन गेली असती. पण इथेच सुमतीबाईंचा वेगळापणा जाणवतो.
त्यांनी नोकरी करायचं ठरवलं. जिथे रहात त्याच आवारात एक शाळा होती. समाजातील निम्न स्तरावरील मुलांची. त्या मुलांना त्यांनी शिकवायला सुरुवात केली.
नोकरी सुरू झाली आणि त्यांना पुढची पायरी खुणावू लागली. आहे त्यात समाधान मानणे हा त्यांचा स्वभावच नव्हता. नवर्याला मिळणाऱ्या पैशात निगुतीने संसार करणे हा त्या काळातील रिवाज त्यांनी झुगारला. आपण पदवीधर व्हायला हवे असे त्यांना वाटु लागले. आणि त्यांनी रुईया कॉलेजला प्रवेश घेतला.
दोन वर्षे मन लावून अभ्यास केला आणि मराठी, संस्कृत हे विषय घेऊन त्या विद्यापीठात पहिल्या आल्या.
मग पुढची पायरी.. एम. ए. तिथेही दैदिप्यमान यश.
छोट्या छोट्या विषयांवर लेखन करताना ६०-६१ च्या दरम्यान त्या बी. एड. झाल्या. आणि साधना कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये प्राध्यापिका, शिक्षण तज्ञ म्हणून रुजु झाल्या.
आता घरी सतत विद्यार्थ्यांचा राबता. त्यांना मार्गदर्शन.. कॉलेजची नाटके बसवणं हेही सुरू. सुटीच्या दिवशी तासनतास वाचन.. लेखन.
प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी स्वतःची गुणवत्ता सिध्द केली. त्यांचं व्यक्तिमत्त्व आता झळाळून उठलं. मध्यम उंची.. सुदृढ बांधा.. करारी चेहरा. जे करायचं ते पुर्णत्वानंच.
एकिकडे स्फुट लेखन करताना त्यांनी वैश्विक प्रतिभावंतांची चरित्र लिहिण्यास सुरुवात केली. अल्बर्ट श्वाईटझर, मँक्झिम गॉर्की यांची त्यांनी लिहिलेली चरित्रे गाजली. टॉलस्टॉयचं ‘वॉर अँड पीस’ वाचलं आणि त्या झपाटुन गेल्या. त्याची स्वभाव वैशिष्ट्ये.. तरल संवेदनक्षमता.. आणि शारीरिक बलदंडताही यामुळे त्या आकर्षिल्या गेल्या.
त्यांना आपल्या गुणांची जाणीव होती. बुद्धिमत्तेचं भान होतं. त्यांनी टॉलस्टॉयचं चरित्र लिहिण्यास घेतलं. खरंतर आताशा त्यांना तब्येत साथ देत नव्हती. वारंवार आजारपणाला तोंड देत होत्या त्या. मुलीनं एका दलिताशी लग्न केलंय हा सल मनाला होताच. हे पुस्तक लिहीताना कदाचित त्यांना जाणवलं असणार.. हे आपलं शेवटचं पुस्तक.
स्वाभाविकच आयुष्यभर कमावलेलं भाषावैभव, संवेदना, मानसिक ऊर्जा सगळं सगळं त्यांनी वापरलं.
कौटुंबिक पातळीवर अपयश आलेलं असताना त्यांनी एक गोष्ट ठरवली होती.. आपलं आयुष्य सर्वसामान्यां सारखं नसावं. पण ते नेमकं कसा असावं याचा शोध आयुष्यभर त्या घेत राहील्या.
‘स्वांत सुखाय’ लिहिलेलं ‘टॉलस्टॉय.. एक प्रवास’ हे पुस्तक मराठी साहित्यात एक मानदंड ठरलं. या पुस्तकाला इतके पुरस्कार मिळतील.. आपल्याला मानसन्मान, प्रसिद्धी मिळेल याची त्यांना जाणीवही नसणार.
शालांत परीक्षेनंतर मुलीचे लग्न करुन देण्याचा तो काळ. अश्या काळात लग्नानंतर पतीची कोणतीही साथ नसताना आपली गुणवत्ता सिध्द करणाऱ्या सुमतीबाई देवस्थळी या कर्तबगार स्त्री-रत्नाला आजच्या महिला दिनी वाहिलेली ही एक आदरांजली..!
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈