सुश्री वर्षा बालगोपाल
☆ “वेळेचा वेळ…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
नेहमीच माझ्या पुढे पळणाऱ्या वेळेला एकदा खूप खूऽऽप खूऽऽऽप वेगात जाऊन गाठलेच कसेबसे •••आणि काय सांगू तुम्हाला••• अहो हा पकडलेला वेळ, माझ्या मुठीत राहील तर शपथ! मला त्याच्या बद्दल खूप कुतूहल••• खूप कौतुक••• त्याच्या विविध कला पाहून तर मी वेळेच्या प्रेमातच पडले•••पण त्याला निरखे पारखेपर्यंत निघूनच गेला•••
वेळच तो••• कोणीतरी स्वत:हून आपल्या मागे पडतोय म्हणल्यावर; त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा स्वभावच त्याचा••• मला कसलेही महत्व न देता, माझ्या मुठीतून सुटलाच लेकाचा•••
अरे देवा••• काय करू? कसे करू? मला तर वेळ पाहिजेच आहे••• अरे वेळा, •••किती वेळा तुझी आर्जव करू? •••मला फक्त माझ्यासाठी म्हणून तू हवा आहेस••• तू माझ्या जवळ असला तरी, घरच्यांसाठी••• ऑफिस साठी••• इतर कामासाठी••• मी तुझी विभागणी करते •••आणि मग शेवटी, माझ्यासाठी तू राहातच नाहीस••• माझ्यासाठीही तू रहावस म्हणून, मी खूप आटापिटा करते••• काहीही करून माझ्यासाठी तुझा वेळ घ्यायचाच म्हणते••• पण खूप धावपळ, दमछाक करूनही, माझ्यासाठी म्हणून तू गवसतच नाहीस•••
अरे, बघ जरा इतर प्रियकराकडे••• आपल्या प्रेयसीचा शब्द कसे झेलतात••• त्यांच्यासाठी काय काय करतात••• आणि तू •••? मी तुझ्या प्रेमात ईतकी व्याकूळ होऊनही तुझ्यापर्यंत माझे प्रेम कसे पोहोचत नाही? मागून मागून काय मागते तुझ्याकडे? फक्त तुझा थोडा वेळ ना •••पण अरे वेळा, तुझ्याकडे मला वेळ भेट द्यायला वेळच नाही••• तुझे हेच वैशिष्ट्य आहे ना••• ते मला आकर्षित करते तुझ्याकडे •••आणि मग मी तुझ्याच प्रेमात अधिकाधिक पडते•••
तू माझ्यासाठी रहावास, •••मी तुझ्याबरोबर वेळ घालवावा••• म्हणून माझी सगळी कामे अगदी भराभर उरकते••• माझ्याकडे असलेला वेळ अपुरा पडू नये म्हणून, घरात इतर कामासाठी बाई लावून, तो वेळही वाचवण्याचा प्रयत्न करते •••पण काय जादू करतोस तू? कळतच नाही••• एक काम संपवावे, तर दुसरे काम दत्त म्हणून हजर असते •••मग त्यासाठी नाईलाज म्हणून वेळ द्यावाच लागतो••• तरी ते काम उरकून, मग मी तुझ्या सोबत राहीन••• असे वाटून ते काम उरकते••• तर मुलांना काहीतरी खायची हुक्की येते••• त्यांचा गृहपाठ •••कोणीतरी पाहुणे येण्याचा फोन •••किंवा इतर काहीतरी••• मग ती वेळ, साजरी करण्यासाठी, त्या वेळेत त्या वेळे प्रमाणे नाचणे •••माझे माझ्या प्रियकराला, वेळेला भेटायचे राहूनच जाते••• मग काहीही झाले तरी उद्या आपण आपल्या वेळेला भेटू••• अशी स्वतःची समजूत घालून, स्वप्नातच वेळेला भेटून घेते •••पण तेथेही माझी मुले शिकून मोठी होतील••• चांगली साहेब होतील•••त्यांचे सगळे खूप छान छान चालले आहे••• मला कसलीच काळजी नाही •••असलीच स्वप्ने दाखवून माझ्यासाठी वेळ मला मिळतच नाही•••
काय मी करू? कसा तुझ्याशी संवाद साधू? मला माझे काही छंद जोपासायचे आहेत••• त्यासाठी तुझी मदत मला पाहिजे आहे •••काय म्हणतोस? मग तू इतरांकडे माग वेळ••• तुला काय वाटतं? मी हे केलं नसेल? पण अरे, आजकालच्या जगात, दुसऱ्यांना देण्यासाठी म्हणून कोणाकडेच वेळ नाही रे••• म्हणून तर तुझ्याच मागे लागायचे••• तुझीच आर्जव करायची•••
हल्ली मोबाईल रुपी यंत्र, मंत्र, का मित्र आला आहे ना •••त्यामुळे खरंच लोकांचा खूप वेळ वाचत आहे••• त्यांची बरीच धावपळ कमी झाली आहे••• पण••• मग काय? त्यातच असणाऱ्या गेम्स मध्ये, वेगवेगळ्या ॲप्स मध्ये, ते इतके गुरफटून जातात••• का स्वतःला गुरफटून घेतात••• माहीत नाही •••पण त्यांच्याकडे दुसऱ्यांना द्यायला वेळ नाही••• स्वतःला साठी असलेला वेळ, मस्त टाईमपास करण्यात घालवतात •••पण दुसऱ्यासाठी त्याचा उपयोग करावा असा विचारही मनात येत नाही••• अशी वेळ ••• ••• तूचतर त्यांच्यावर आणली नाहीस ना?
प्रियकरावर नि:संशयपणे प्रेम करावे••• असे असताना सुद्धा, माझ्या वेळेच्या प्रियकरावर मला संशय येऊ लागलाय••• पण••• विश्वासाने सगळे काही मिळते••• यावरही माझा विश्वास असल्याने, मला माझा असा वेळ मिळेलच••• अशी खात्री करून घेते••• आणि तुझ्यावर प्रेम करणे, अखंड चालूच ठेवते•••
पण पुढे असणारा वेळ मी पकडू शकत नाही••• मागे पडलेला वेळ मला सोडावाच लागतो••• आताच्या परिस्थितीतच तू मला पाहिजे आहेस••• माझी व्याकुळता जाणून घेनारे जरा••• मी एवढी काकुळतीला आली आहे म्हटल्यावर, तुला माझी दया आली •••काल खरच माझ्या स्वप्नात, माझ्यासाठी असलेला वेळ होऊन आलास••• मला भेटलास ••• मला म्हणालास, मी तुझे दुःख जाणले••• मग माझे पण दुःख तुला सांगावेसे वाटते••• ऐकशील?
अहाहा••• माझा प्रियकर••• माझ्यासाठी आला आहे••• मग त्याच्यावर प्रेम करायचे तर, त्याच्या ही व्यथा जाणून घ्यायलाच हव्यात ना? •••मग मी अगदी कान टवकारून, जीव एकाग्र करून, त्याचा हात माझ्या हातात घेऊन, म्हटले••• सांग ना••• मला आवडेल ऐकायला•••
तसा वेळ सांगू लागला ••• देवाने जसे तुला जन्माला घातले ना••• तसेच मलाही जन्माला घातले••• तुला बुद्धी तरी दिली आहे••• एक अभिव्यक्ती दिली आहे •••वेगवेगळे अवयव दिले आहेत••• पण माझे काय? जगातील इतके चराचर आहेत••• त्या सगळ्यां साठी चोवीस तास! ••••••• त्यात मला ना आकार••• ना मला काही करण्याचे स्वातंत्र्य••• कोणासाठी काय करायचे •••काय नाही •••हे मी ठरवत नाही •••तरी माझ्याकडूनच सगळ्या अपेक्षा ठेवून अक्षरश: जो-तो माझे लचके तोडत आहे ••• माझे असे लचके तोडणे आता सहन होत नाही••• म्हणून सगळ्यांच्याच पुढे मी धावत राहतो••• मला धावावे लागते••• कारण कोणाच्या हाताला लागलो, की लगेच लचका तोडला जातो •••काय करू मी तरी? जाऊ दे मला••• नाही तर अजून किती जण एकदम तुटून पडतील माझ्यावर •••काही सांगता येत नाही•••
हांऽऽऽऽ पण तुझे माझ्यावरचे प्रेम पाहून, मी खूप सुखावलो आहे••• म्हणूनच माझा वेळ तुझ्यासाठी देण्यासाठी, मी तुला एक कानमंत्र देतो••• बघ तू••• तुलाही वेळ मिळेल••• बघ •••आपल्या वेळेचे नाही, तर कामाचे विभाजन योग्य पद्धतीने कर••• आणि आपली कामे, पूर्ण जबाबदारीने करताना, ठामपणे इतरांनाही सांग••• मी माझी जबाबदारी, माझे कर्तव्य, पूर्ण केले आहे •••आता चोवीस तासांपैकी काही वेळ तरी, मी माझा म्हणून व्यतीत करणार आहे •••एक स्त्री असलीस तरी••• तो तुझा अधिकार आहे••• हक्क आहे••• आणि तो प्रत्येकाने मिळवला पाहिजे••• बघ तू मग••• तुझ्या हातात हात घालून, तू ठरवलेल्या वेळेत, हा वेळ फक्त तुला वेळ देईल•••
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈