सौ शालिनी जोशी
विविधा
☆ आपले मरण पहिले म्या डोळा… ☆ सौ शालिनी जोशी ☆
☆
आपले मरण पाहिले म्या डोळा l
तो झाला सोहळा अनुपम्य ll
संत तुकारामांचा हा अभंग. आपले मरण आपणच पाहणे आणि मरण हा अनुपम्य सोहळा होणे, सामान्य माणसाच्या दृष्टीने हे सगळेच अतर्क्य, अद्भुत, विचित्र. त्यामुळे हा एक वेगळाच विचार करायला लावणारा अभंग. कारण मरण ही कल्पनाच सामान्य माणसाला भीतीदायक, दु:खद वाटते. लौकिक जगातील सुखोपभोगाना चटावलेला माणूस मरण ही कल्पना सहन करू शकत नाही. पण येथे मरण आहे ते पंचभूतीक देहाचे नव्हे तर देहबुद्धीचे आहे. अहंकाराचे आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या मी माझेपणाचे आहे. मी माझे पणामुळे दोरीला बांधलेल्या माकडासारखे माणसाची स्थिती होते. तो आपल्या संकुचित विश्वाचा मी शहाणा, मी विद्वान, माझे घर, माझे मुले, एवढाच विचार करतो. पण यांतून बाहेर पडणारा जगाचा विचार करतो. मी देह हा मर्यादित विचार जाऊन हे विश्वाच माझे आहे. मी आत्मा आहे. हा भाव निर्माण होतो. म्हणजे देह असून विदेही अशी ही अवस्था, तुकाराम येथे मृत्यूच्या रूपकाने वर्णन करतात.
खरे पाहता तुकाराम सर्वसामान्य माणसांसारखे प्रापंचिक, व्यावसायिक व सुखवस्तू होते. विठ्ठल भक्ती परंपरागत होती. पण घरातील व बाहेरील प्रतिकूल प्रसंगाने त्यांचे चित्त उद्विग्न झाले. संसार तापाने तापलेले मन ईश्वरचिंतनात रमू लागले. गुरुउपदेश आणि ईश्वरचिंतन यामुळे ‘नित्य नवा जागृतीचा दिवस’ अनुभव लागले. देहबुद्धी कमी झाली. मी माझे पणाची जागा ईश्वराने घेतली. दुष्काळ संपला. सुकाळ आला. माया, मत्सर, काम, क्रोध हे देहाची निगडीत विकार, सुखदुःख इत्यादी द्वंद्वे आणि नाम, रूप, कुळ या सर्व उपाधी लोप पावल्या. त्यांची राख झाली. म्हणजे एका दृष्टीने सर्व देहभावाचे मरणच. शरीर आहे पण विकार नाही. असा हा मुक्तीचा सोहळा तुकारामांनी आपल्या डोळ्यांनी जिवंतपणेच पाहिला. त्यांना परमेश्वराच्या ठिकाणी स्थान मिळाले. त्याचाच ध्यास राहिला. ते भगवंतमय झाले. सर्वत्र तोच हा अनुभव आणि मी तोच, मग जन्म मरण कोठून आणि त्याच्याशी निगडित सोयर सुतक व इतर विधीही नाहीत. असा हा अनुपम सोहळा. सच्चिदानंदाची ऐक्य, अखंड आनंद. त्रैलोक्य त्या आत्मानंदाने भरून गेले. ‘ आनंदाचे डोही, आनंद तरंग’ अशी ही अवस्था. अणु रेणु एवढा तुका आकाशाप्रमाणे व्यापक झाला. संकुचित देह बुद्धीतून विश्वव्यापक झाला. हे विश्वचि माझे घर आणि मग त्याच्यासाठीच कार्य, तोच ध्यास. अशा प्रकारे झालेल्या या पुनर्जन्माचे वर्णन ‘मीच मज व्यालो l पोटी आपुलिया आलो’ असे तुकाराम करतात. जिवंतपणे झालेले हे मरण’ जिता मरण आलेl आप पर गेलेl मूळ हे छेदिलेl संसाराचेll’ संसाराचे चिंता संपली. चिंता करितो विश्वाची अशी अवस्था प्राप्त झाली. म्हणून हे मरण अनुपम्य झाले. मी ची जाणीव संपली. ‘आता उरलो उपकारापुरता. ‘ स्वतून विरक्त होऊन स्वकियांसाठी कार्य सुरू ठेवणे, हा अनुभव, हा बदल, हे मरण आणि पुन्हा जन्म तुकारामांनी स्वतः अनुभवले आणि लोकांना सांगितले.’
तुका म्हणे दिले उमटून जगी l
घेतले ते अंगी लावूनिया ll
सर्व जगापुढे आदर्श ठेवला. म्हणूनच महात्मा फुले, अण्णासाहेब कर्वे यांचे सारखे समाज सुधारक निर्माण झाले. स्वतःला विसरून जगाचे झाले. जगाचा प्रपंच केला. त्यामुळे त्यांचे कार्यही मीच्या मरणातून, स्वर्गाची- आनंदाची निर्मिती या स्वरूपाचे झाले. क्रांतिकारकांनी स्वतःच्या घराची, स्वतःची पर्वा कधीच केली नाही. त्याचे मरण पत्करून भारत मातेला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. तो तुकारामांसारख्या संतांच्या पावलावर पाऊल ठेवून. ‘बुडते हे जन देखे डोळा’ यासाठीच हा सगळा अट्टाहास. प्रत्येकाची पद्धत वेगळी. कुणी अभंग ही शस्त्रे आणि बाण केले. तर कुणी (सावरकर, सुभाषचंद्र बोस) खऱ्या शस्त्रांची प्रेरणा दिली. गांधींनी सत्याग्रहाचा तर टिळकांनी लेखणी व वाणीचा मार्ग अनुसरला. पण त्यासाठी आधी देह भावाचे मरण सगळ्यांनीच अनुभवले. अशा प्रकारे संत तुकारामांनी जन्म आणि मरण यांना वेगळा अर्थ दिला, जगद्गुरु झाले.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈