श्रीमती उज्ज्वला केळकर
काव्यानंद
☆ सांज ये गोकुळी… कवी : श्री सुधीर मोघे – रसग्रहण – सुश्री कविता आमोणकर ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
काव्यानंद
सांज ये गोकुळी सावळी सावळी
जेंव्हा दिवस संपून रात्र होण्यास सुरवात होणार असते, त्या वेळी म्हणजेच संध्याकाळी वातावरणात एक गूढता निर्माण होते. उन्हे कलत असतानाच आकाशात रंगीबेरंगी रंगाची उधळण होत असते आणि अशा वेळी अंधारून यायला सुरवात होते… दिवसाच्या प्रकाशात जेंव्हा रात्रीचा अंध:कार मिसळला जात असतो, तेंव्हा निर्माण होणारा सावळा रंग कवी सुधीर मोघे यांना ही मोहवून गेला आणि सांज ये गोकुळी.. सावळी सावळी! .. या सुंदर गाण्यांचे नादमय शब्द त्यांच्या लेखणीतून प्रसवले.
एकच शब्द जेंव्हा दोनदा कवितेत वापरला जातो, तेंव्हा होणारा नाद हा कानाला सुखावतो. या गाण्यात ही सावळी सावळी… या पुन्हा पुन्हा येणार्या शब्दांनी जो नाद निर्माण केला आहे, तो नाद आशा ताई यांनी आपल्या आवाजात इतक्या अप्रतिम पणे सादर केला आहे की, हे गाणे ऐकताना आपण अगदी नकळत या गाण्यावर डोलत राहतो. आणि या गाण्यातील शब्दांचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर अक्षरश: उभे राहते. संगीताच्या सुरांचे बादशाह श्रीधर फडके यांनी पूर्वा कल्याण रागात या गीताला आशा ताई यांचा आवाज देताना गाण्याला उच्च दर्जा प्राप्त करून दिला. आशा ताई यांनी सुरवातीचा जो आलाप घेतला आहे, त्या आलापातच त्यांनी संपूर्ण गाणे जिंकले आहे. हे गाणे “ वजीर ” या चित्रपटामध्ये अश्विनी भावे या अभिनेत्रीवर चित्रीत केले गेले आहे.
सांज ये गोकुळी
सावळी सावळी
सांवळ्याची जणू साउली! ..
या कडव्यात गीतकार सुधीर मोघे यांना संध्याकाळच्या वातावरणात पसरणारी संध्याछाया ही जणू काही सावळ्या कृष्णाचीच सावली भासते! … किती सुंदर उपमा! .. त्या सावळ्या कृष्णाची सावळी छाया.. या सावळ्या वातावरणात अवघे वातावरण हे कृष्णमय होऊन गेले आहे आणि कृष्णाच्या गायी या संध्यासमयी गोधुळ उधळवत निघाल्या आहेत.. ( गायी जेंव्हा संध्याकाळाच्या वेळेस आपल्या घरी जायला निघतात, तेंव्हा त्यांच्या खुरांनी जी धूळ उडते, तिला गोधुळ म्हणतात ) त्या उडणार्या गोधुळी मुळे आधीच सावळ्या झालेल्या वातावरणात पायवाटा ही गोधुळीमय झाल्या.. या रंगाला कवी सुधीर मोघे श्यामरंग असे नाव देत पुढे लिहितात…
धूळ उडवीत गाई निघाल्या
श्यामरंगात वाटा बुडाल्या
परतती त्यांसवे
पाखरांचे थवे
पैल घंटा घुमे राउळी…
गोधुळ उडवत गाई निघाल्या आणि त्यांच्या सोबत पाखरांचे थवे ही आपल्या घरट्याकडे परतू लागले आहेत… अशा सावळ्या संध्याकाळच्या रंगात देवळात वाजणार्या घंटेचा नाद ऐकू येतो आणि सुंदर असे हे वर्णन या गीतात ऐकताना आपल्या डोळ्यासमोर सावळ्या श्रीकृष्णाची हातात मुरली धरलेली सावळी छबी उभी राहते! ..
वातावरणात भरून राहिलेल्या या सावळ्या रंगात दूर दिसणार्या उंचच उंच अशा पर्वतांच्या टोकांवर सावळा रंग हा असा झाकोळला गेलेला आहे की, ती पर्वतांची रांग जणू काही काजळाची रेघ दिसत आहे आणि वातावरणातल्या सावळ्या रंगामुळे समोर असलेल्या डोहात पडलेले पांढरेशुभ्र चांदणे ही सावळे होऊन गेले आहे. आणि हे सर्व कवी आपल्या शब्दांत साकारताना म्हणतात….
पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले
चांदणे सावळे
भोवती सावळ्या चाहुली! ….
कवी सुधीर मोघे यांच्या शब्दांतली गूढता इथे जाणवते. सावळ्या रंगात रंगून जाताना अवघे विश्व सावळे म्हणजे कृष्णमय होऊन गेले आहे ही त्यांची कल्पना कृष्णप्रेमाची ओढ दर्शविते.
माऊली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा..
मंद वार्यावरी
वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी…
सांजेच्या सावळ्या रंगात आता अंधाराला पान्हा फुटत आहे, म्हणजेच आता अंधाराचे साम्राज्य वाढत चालले आहे. आणि सावळ्या रंगाच्या श्रीकृष्णाच्या सावळ्या रंगात अवघे विश्व रंगून ते ही कान्हामय होऊन गेले आहे… संध्याकाळी सुटलेला हा मंद गार वारा हलकेच सुटला आहे आणि झाडापानातून वाहणार्या वार्याचे सूर हे सावळ्या श्रीकृष्णाच्या सावळ्या साउलीच्या वातावरणात त्या सावळ्या श्रीकृष्णाच्याच बासुरीतूनच वहात येताना अमृताच्या ओंजळीत सामावून जात आहेत, अशी सुंदर कल्पना या गीताच्या ओळींत सुरमय केली आहे.
©️ रसास्वाद – सुश्री कविता आमोणकर
प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर
प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈