श्री जगदीश काबरे
इंद्रधनुष्य
☆ “जगणे, अनुभवणे, आणि विचार करणे…” – लेखक : श्री यशवंत सुमंत ☆ श्री जगदीश काबरे ☆
जगण्याशिवाय अनुभवांना सामोरे जाता येत नाही. अनुभवाशिवाय विचार संभवत नाही. आणि विचारांशिवाय जगणे उमगत नाही. जगणे अनुभवणे आणि विचार हे असे अन्योन्याश्रयी आहेत. सोयीसाठी आपण कधी कधी त्यांची फारकत करतो. पण या फारकतीचा अतिरेक झाला की ‘विचारांपेक्षा अनुभव श्रेष्ठ’ किंवा अनुभव व्यक्तिसापेक्ष म्हणून मर्यादित तर विचार सार्वत्रिक म्हणून व्यापक यांसारख्या दर्पोक्ती ऐकू येऊ लागतात. अनुभव व विचार यांच्यातील सहकार्य धूसर होत जाऊन अनुभववादी विरुद्ध विचारवादी असे द्वंद्व सुरू होते. या द्वंद्वयुद्धाची नशा योद्ध्यांना धुंद बनवते.
सामान्य माणूस मात्र या द्वंद्वाला काही काळानंतर कंटाळतो. या कंटाळण्यातून त्याचे तीन प्रतिसाद संभवतात.
1) तो विचारांबाबत ‘सिनिक’ – तुच्छतावादी बनतो
2) तो आपले व्यक्तिगत अनुभवच निव्वळ कवटाळून ते सार्वत्रिक सत्य म्हणून सांगू लागतो व स्वतः बंदिस्त होतो
3) तो स्वतःचे अनुभव नाकारता नाकारता स्वतःलाही नाकारू लागतो. हे व्यक्तित्वाचे खच्चीकरण असते.
आपण बंदिस्त होण्याचे कारण नाही. तुच्छतावादीही असता कामा नये आणि स्वतः च्या अनुभवांचा अकारण धिक्कारही करता कामा नये. स्वतःलाच पुसून टाकण्याइतके किंवा नाकारण्याइतके आपले आणि कोणाचेही आयुष्य कवडीमोलाचे नसते. दुःख, अपमान, संकट, जीवन उद्ध्वस्त करणारे अनुभव प्रत्येकाच्या वाट्याला कमीअधिक प्रमाणात येतातच. त्यांना चिवटपणे सामोरे जायला हवे. हे सामोरे जाण्याचे बळ शेवटी विचारच आपल्याला देतात. कारण विचार हा आपण आपल्याशी केलेला तर्कशुद्ध आणि विश्वसनीय संवाद असतो. इतर विचारांची सोबत व मार्गदर्शन हा संवाद अधिक प्रगल्भ बनवते. म्हणूनच माणसाला विचारदर्शनाची गरज लागते.
एकदा आपण आपली ही गरज ओळखली की मग आपल्याला भेडसाविणारे अनेक स्वतः संबंधीचे व समाजासंबंधीचे प्रश्न समजू लागतात. त्यांच्या नजरेला नजर देण्याची ताकद आपल्याला लाभते. विचारांचा व विचारदर्शनांचा आदरपूर्वक स्वीकार वा त्यांना विधायक नकार देण्याची ऋजुता आपल्यापाशी येते. ही ऋजुता आपल्याला स्वतःच्या व इतरांच्याही जीवनाचा आदर करायला शिकवते. या आदरभावातून आपण विनम्र होतो. ही विनम्रता आपल्याला स्वागतशील बनवते.
स्त्रीवादी काय किंवा अन्य आधुनिक विचारदर्शनांची ओळख का करून घ्यायची, तर आपल्या जगण्याचे संदर्भ आपल्या लक्षात यावेत म्हणून. विचारांचे जगण्याशी असलेले नाते असते ते हेच. हे नाते जे नाकारतात ते एका परीने जीवनच नाकारित असतात. वाढत्या आत्मनिवेदनाच्या व आत्याविष्काराच्या या जमान्यात वास्तविक विचारांचे श्रद्धेने उत्तरोत्तर स्वागत व्हायला हवे. त्यांचा उत्सव साजरा व्हायला हवा. पण असे न होता विचारांबाबतची तुच्छता का वाढावी, विचारांच्या अंताची भाषा का बोलली जावी, माहितीच्या स्फोटाने कर्णबधिरता व संवेदनशून्यता का यावी हे प्रश्न विचारल्याशिवाय आधुनिक विचारदर्शनांशी संवाद होणार नाही.
लेखक : श्री यशवंत सुमंत
प्रस्तुती : श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈