सुश्री अपर्णा परांजपे
☆ ✍️ सहज सुचलं म्हणून… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆
विश्वास व श्रध्दा यांचा संबंध बुद्धी व हृदय दोघांशीही आहे. बुद्धीला जे पटतं ते व तसंच घडलं की आनंद मिळतो कारण तीच आपली तळमळ असते. मन म्हणतं पहा हे असंच व्हायला हवं होतं पण एक महत्त्वाचा विषय यात दुर्लक्षित रहातो तो म्हणजे हृदयाचा कल ! हृदय या आनंदात आनंदी आहे की नाही हा विचार व्हायलाच हवा. ही गरज आहे पण त्या आवाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही असं बुध्दी मनाला पटवत रहाते. आंतरिक तळमळ व बौद्धिक इच्छा वेगळ्या आहेत हे निश्चित ! अन्यथा जे जे मनासारखे झाले आहे त्यातून संपूर्ण समाधान मिळालेच असते व हुरहूर संपली असती. पण तसे का होत नाही याचा विचार विवेकाने करणे क्रमप्राप्त आहे.
याउलट फक्त हृदयाचा कौल घेतला तर लक्षात येतं की त्याला काहीच नको आहे. त्याला देण्यात सुख आहे. त्याचा स्वभावच प्रेम, भक्ती, समर्पण आहे. व आहे त्यातही तो समाधानी आहे पण मन स्वस्थ बसू देत नाही. वेगवेगळे विकार, तुलना, इर्षा, मीच का? हे शक्य नाही असेच ठसवत जाते व हृदयाकडे दुर्लक्ष होते. ही मानवी अवस्था संत, सज्जन ओळखतात व सत्याचा एक गुरुमंत्र देतात. पण बुद्धी तो ही आपल्या आनंदाच्या कल्पनांवर घासून पहातं व ती वचने खरी नाहीत असं मनाला पटवतं.
हाच भ्रमाचा खेळ सुरू असतो. तो आपण स्वतः स्वतः च्या बुध्दीला पटवणे व तिला हृदयाकडे वळवणे हा स्वधर्म आहे.
हृदयस्थ परमात्मा मग खूष होऊन “सदा सुखी भव” चा आशीर्वाद देतो जो स्वतःचा स्वतः ला जाणवतो.
हेच तर हवंय !!
*
भगवंत हृदयस्थ आहे 🙏
© सुश्री अपर्णा परांजपे
कात्रज, पुणे
मो. 9503045495
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈