श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- जोशीकाकांना भेटण्यासाठी अशोक जोशी आग्रहाने मला प्रवृत्त करतात काय आणि स्थलांतराचा योग नसल्याचा दिलासा देत, माझ्या आयुष्यात अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांची काहीही पूर्वकल्पना नसतानाही

जोशीकाका समीरच्या जन्म आणि मृत्यूची सांगड सहजपणे घालत असतानाच त्यातून माझ्या बाबांच्या पुनर्जन्माचे सूचन करुन मला विचारप्रवृत्त करतात काय,… सगळंच अघटित, अतर्क्य आणि मनातल्या अनुत्तरीत प्रश्नांची नकळत उत्तर देतादेताच मनात नवीन प्रश्न निर्माण करणारंही! हे सगळं मला दिलासा देण्यासाठी ‘त्या’नेच घडवून आणल्याचं मला लख्खपणे जाणवलं आणि मनातलं मळभ हळूहळू विरु लागलं!!)

जोशी काकांकडून परतल्यानंतर त्या रविवारी घरी अर्थातच चर्चेला विषय होता तो हाच. पण तिथं काय घडलं, ते काय म्हणाले या सगळ्याची मला सविस्तर चर्चा करणं नकोसंच वाटलं. कारण ते जुन्या जखमांवरची खपली काढल्यासारखंच झालं असतं. पण कांही न सांगणं, गप्प बसणं योग्यही वाटेना आणि शक्यही. कारण पत्रिका आणि ज्योतिष यावर आरतीचा कितीही विश्वास नाही असं म्हंटलं तरी तिथं नेमकं काय झालं याबद्दल तरी तिला उत्सुकता असणं स्वाभाविकच होतं.

“आपलं रुटीन फारसं डिस्टर्ब होणार नाही असं त्यांचं रिडिंग आहे” असं मोघम सांगून मी विषय सुरु होताच संपवायचा प्रयत्न केला खरा पण तो संपला नव्हताच.

” तुम्हाला खरंच पटतंय हे? खरंच वाटतंय असं होईल?”

“माझ्यापुरतं म्हणशील तर केव्हा काय होईल ते सांगता येणार नाही हेच खरं. ” मी हसत म्हंटलं. या संदर्भातील सगळ्याच चर्चांना पूर्णविराम देऊ शकेल असं हेच एकमेव समर्पक उत्तर माझ्याजवळ होतं!

खरं सांगायचं तर जोशीकाकांनी जे सांगितलं त्यात माझ्यापुरतं तरी न पटण्यासारखं कांही नव्हतंच. याचं कारण म्हणजे माझ्या आयुष्यातल्या भूतकाळातल्या घटनांचे त्यांनी अंदाज घेत कां असेना पण दिलेले अचूक संदर्भ! माझ्या अंतर्मनाने ते केव्हाच स्विकारले होते खरे, पण त्यावरही खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब होणार होतं ते माझी प्रमोशन पोस्टींगची आॅर्डर आल्यानंतरच!

पण त्यासाठी फार काळ वाट पहावी लागलीच नाही. सगळ्याच रहस्याचा भेद चार दिवसांत लगोलग झालाच. त्या दिवशीच्या इनवर्ड मेलच्या गठ्ठयांत सेंट्रल आॅफीसकडून आलेलं एक एन्व्हलप माझ्या नावावर होतं! मनात चलबिचल नव्हती, साशंकता नव्हती, जे होईल ते चांगलंच होईल हा विश्वास होता आणि जोशी काकांकडून मिळालेले संकेतही या सगळ्याला पूरकच होते.. आणि तरीही.. ते बंद एन्व्हलप हातात घेताच माझे हात थरथरू लागले… ! ती थरथर भीतीची होती कि उत्सुकतेची हे त्या क्षणी जाणवलंच नाही लगेच कारण मन त्या क्षणांत कणभरही रेंगाळलं नव्हतंच. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखं वरवर शांत पण आतून उतावीळपणानं ते एन्व्हलप मी घाईघाईने फोडलं आणि पाहिलं तर आत माझ्याच नावाची पोस्टींग कम ट्रान्सफरची ऑर्डर होती! त्यातल्या चार ओळी माझं रुटीन पूर्णत: उलथंपालथं तरी करणार होत्या किंवा सावरणार तरी…. !

मी ती आॅर्डर वाचताच ‘त्या’नेच घडवून आणलेल्या त्या अद्भूत चमत्काराने मनोमन सुखावलो. ‘त्या’नेच जोशीकाकांच्या तोंडून वदवलेलं माझं भविष्य त्या ट्रान्स्फर आॅर्डरमधील शब्दरुपात माझ्या नजरेसमोर जिवंत झालेलं होतं!!…. होय. माझं पोस्टिंग लखनौला नव्हे तर आमच्या याच

रिजनमधल्या इचलकरंजी मुख्य शाखेत ‘हायर ग्रेड ब्रॅंच मॅनेजर’ म्हणून झालेलं होतं! ‘त्या’च्या आशीर्वादांच्या त्या

शब्दरूपावरून फिरणारी माझी नजर आनंदाश्रूंच्या ओझरत्या स्पर्शानेच ओलसर झाली… ! स्वप्नवतच वाटत राहिलं सगळं !! पण…. मी स्वतःला क्षणार्धात सावरलं. शांतपणे डोळे मिटून घेतले… ‘त्या’ला मनोमन नमस्कार केला… डोळ्यातून वाहू पहाणारा आनंद डोळे क्षणभर तसेच मिटून आतल्या आत जिरवला. अलगद डोळे उघडले न् त्या क्षणी आठवण झाली ती मला मनापासून सहकार्य करणाऱ्या, माझ्या भवितव्याची चिंता लागून राहिलेल्या माझ्या ब्रॅंचमधील स्टाफमेंबर्सची! ते सर्वजण आपापल्या कामांत व्यस्त होते तरीही माझा आनंद आत्ताच सर्वांमधे वाटून मला द्विगुणित करायचा होता! त्याच असोशीने दुसऱ्याच क्षणी मी केबिनचं दार ढकलून बाहेर आलो.. !

त्यादिवशी लंचटाईममधे डायनिंग टेबलवर आणि पुढे दिवसभरही ‘ हे आक्रित घडलं कसं?’ हाच सर्वांच्या चर्चेचा मुख्य विषय होता! माझ्यापुरता तरी तो चमत्कारच होता पण तो घडला होता तो मात्र कुणी घडवल्यासारखा नाही तर सहज घडल्यासारखा!! यामागील कार्यकारणभावाची जी उकल पुढे एक दोन दिवसातच झाली, तीही कुणालाही अगदी सहजपणे पटावी अशीच होती!

खरंतर यावेळच्या प्रमोशन पोस्टींगसाठी सेंट्रल-ऑफिसने ठरवलेल्या पाॅलिसीनुसार सर्वच प्रमोटी-आॅफिसर्सची पोस्टींग्ज कोणताही अपवाद न करता आऊट आॅफ स्टेटच होतील असेच ठरले होते. त्यानुसार कुणाचे पोस्टींग कुठे करायचे याबाबतच्या निर्णयावर जी. एम्. नी सह्याही केल्या होत्या. त्याप्रमाणे कोल्हापूर रिजनमधील आम्हा सर्व प्रमोटीजची उत्तर-प्रदेश मधील शाखा किंवा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेसमधे ट्रान्स्फर करण्याचा निर्णय झालेला होता आणि त्यानुसारच माझं पोस्टींग रिजनल ऑफिस, लखनौला होणार असल्याची ती बातमी अशी पूर्णत: सत्याधिष्ठीतच होती! असं असतानाही पुढच्या चार सहा दिवसात अशा कांही घटना आकस्मिकपणे घडत गेल्या की सेंट्रल ऑफिसला या प्रमोशन ट्रान्सफर पॉलिसीबाबत तडजोड करणे भाग पडले होते. कारण इकडच्या रिजन्सच्या तुलनेत बॉम्बे रिजनमधील प्रमोटिजची संख्या कितीतरी पटीने जास्त होती. त्या मुंबईस्थित सरसकट सगळ्यांनाच प्रदीर्घ काळासाठी घरापासून परप्रांतात एकटंच निघून जाणं केवळ गैरसोयीचंच नव्हे, तर अनेक दृष्टीने अडचणीचेही ठरणारे होते. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन युनियनकडे लेखी तक्रारी दिल्या. आणि अर्थातच त्यामुळे युनियन हेडक्वाॅर्टर्ससाठी हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला. त्यांनी बॅंकेच्या सेंट्रल-मॅनेजमेंटकडे हा विषय लावून धरला आणि त्यांच्या मिटिंगमधे झालेल्या चर्चांमधे ही पॉलिसी कांही प्रमाणात शिथिल करण्याची मॅनेजमेंटने तयारी दाखवली. त्यानुसार ऑलओव्हर इंडियाच्या, मेरीटनुसार बनवलेल्या हजारभर प्रमोटींच्या लिस्टमधे पहिल्या शंभरात नावे असणाऱ्या प्रमोटीजना त्यांच्या सध्याच्या रिजनमधेच पोस्टिंग द्यायचे आणि बाकी सर्वांचे मात्र ठरल्याप्रमाणे आऊट ऑफ स्टेट पोस्टींग करायचे अशी तडजोड मान्य झाली. आश्चर्य हे कीं त्या मेरिट-लिस्टमधे माझा नंबर ९८ क्रमांकावर होता! म्हणूनच केवळ माझं लखनौचं पोस्टिंग रद्द होऊन ते इचलकरंजी (मुख्य) ब्रँचला झालं!!

माझा पौर्णिमेचा नित्यनेम आता निर्विघ्नपणे सुरु रहाणार असल्याचा खूप मोठा दिलासा मला प्रमोशन नंतरची नवीन जबाबदारी स्वीकारण्यासाठी अतिशय आवश्यक असं मानसिक स्वास्थ्य देणारा ठरला ही ‘त्या’चीच कृपा होती हे खरंच पण त्यापेक्षाही माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं ते जन्म आणि मृत्यू या दोन्हींकडे वेगळ्या आणि अधिक समतोल नजरेने पहायची मला मिळालेली नवी दृष्टी! अर्थात जोशीकाका याला निमित्त झाले होते हे खरेच पण त्यामागचा कर्ता-करविताही ‘तो’च होता आणि हे माझ्यासाठी अधिक मोलाचं होतं! म्हणूनच जन्म आणि मृत्यूला जोडणाऱ्या पुनर्जन्माच्या बंद दरवाज्याची दारं कांही अंशी तरी किलकिली झाल्याचा आभास माझ्या मनात कांहीकाळ निर्माण झाला तरी त्यात मी फार काळ रुतून बसलो नाही. यातून समीर गेल्याचं दुःख बऱ्याच प्रमाणात बोथट झालं हे एक आणि या ना त्या रुपांत बाबांची दिलासा देणारी सावली सिलिंडरच्या रूपात माझ्यासोबत आहे ही कधीच न विरणारी भावना आजही तितक्याच अलवारपणे माझी सोबत करते आहे हेही माझ्यासाठी फार मोठा दिलासा देणारेच ठरले आहे.

माझ्या आयुष्यात त्या त्या क्षणी मला अतीव दु:ख देऊन गेलेले, माझे बाबा आणि समीरबाळ यांचे क्लेशकारक मृत्यू त्यांच्याशीच निगडीत असणाऱ्या या सगळ्या पुढील काळांत घडलेल्या घटनांमुळे माझं उर्वरीत जगणं असं अधिकच शांत, समाधानी आणि अर्थपूर्ण करणारेच ठरले आहेत. ‘त्या’चा कृपालोभ यापेक्षा वेगळा तो काय असणार?

हे सगळं त्याक्षणी पूर्ण समाधान देणारं असलं तरी हा पूर्णविराम नव्हता. पुढील आयुष्यांत असे अनेक कसोटी पहाणारे क्षण आपली वाट पहातायत याची मला कल्पना नव्हती एवढंच!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments