सौ शालिनी जोशी
विविधा
☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – संत जनाबाई… भाग – २ ☆ सौ शालिनी जोशी ☆
‘नामयाची दासी’ म्हणून बिरुद मिरवणारी जनाबाई मुक्ताबाईंचे समकालीन. जन्म अंदाजे इ. स. १२६० ते १२७०. गोदावरी तीरावरील गंगाखेडच्या दमा (वडील) आणि करुंड (आई )या भगवत् भक्त दांपत्याचे मुलगी. जातीने शूद्र पण आई-वडील पंढरीची वारी करणारे होते. लहानपणीच आई-वडील दुरावले. पाच वर्षाची अनाथ पोर जना नामदेवांचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे राहिली. देवाची आवड आणि लाघवी स्वभाव यामुळे त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य झाली.
नामदेवांच्या घरातील अंगण, तुळशी वृंदावन, शेणगोवऱ्या वेचण्याची जागा, कोठार, माजकर हेच त्यांचे विश्व बनले. तिथेच त्यांना परमेश्वर दिसला. त्यांचे मन एवढे विशाल झाले की दळणकांडण, धुणीभांडी सडासारवण ही त्यांची कष्टाची कामे देवाचीच झाली. काम करताना विठ्ठलाच्या नामात त्या इतक्या तल्लीन होत की देवच काम करतो हा भाव निर्माण होई. त्यामुळे त्या म्हणत,
झाडालोट करी जनी l केर भरी चक्रपाणी l
पाटी घेऊनिया शिरी l नेऊनिया टाकी दूरी l
ऐसा भक्तिसी भुलला l नीच कामे करू लागला l
जनी म्हणे विठोबाला l काय उतराई होऊ तुला l
दासीपणा आणि अलौकिकता यांचा समतोल त्यांनी साधला.
द्वैतातील काम करताना अद्वैताचा आनंद त्यांनी अनुभवला आणि अद्वैताचा आनंद द्वैतात भोगला. त्यामुळे वास्तव जीवनातले श्रम हे त्यांच्यासाठी क्रीडा झाले. म्हणून त्या म्हणतात,
दळू कांडू खेळू l सर्व पाप ताप जाळू l
सर्व जीवांमध्ये पाहू l आम्ही एक होऊनि राहू l
जनी म्हणे ब्रह्म होऊ l सर्वाघटी ब्रह्म पाहू l
कर्माला क्रीडेचे रूप मिळाले की त्यातील पाप, ताप, दाह सर्व लोपतात. सर्वत्र ब्रह्मच दिसते.
संत नामदेवामुळे ज्ञानेश्वर, विठोबा खेचर, सोपान, चोखोबा, गोरा कुंभार, अशा संत मंडळींचा सहवास जनाबाईंना लाभला. ज्ञानेश्वरांविषयी जनाबाईंना विशेष आदर होता. ‘परलोकीचे तारूl म्हणे माझा ज्ञानेश्वरु’ असे त्या म्हणत असत. नामदेवांसारख्या गुरूचा अखंड सहवास त्यांना लाभला. त्यामुळे गुरुमंत्र घेण्याच्या उपचाराची गरज भासली नाही. संत नामदेव उत्तर, दक्षिण भारतात तीर्थयात्रेसाठी गेल्यावर वारकरी संप्रदायाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. साधारण ३५० अभंग त्यांनी लिहिले. कविता, आरत्या, ओव्या, पाळणे, पौराणिक कथा यांचा समावेश त्यांच्या काव्यात आहे. चरित्रे, उपदेश, भारुडे अशा रचनाही केल्या. अध्यात्मातील योगसाधना आत्मसात करून ज्ञानोत्तर भक्तीचा स्विकार केला.
‘स्त्री जन म्हणूनि न व्हावे उदास’ असे सांगून स्त्रियांना नवीन वाट दाखवली. स्वतः अविवाहित राहिली. विठ्ठलाचे मानुषीकरण करून त्याला माय, बाप, सखा, सांगाती असे संबोधले. नि:संग, त्यागी वृत्ती, निर्भयता, सहनशिलता, वात्सल्य, समर्पण हे भाव त्यांचे ठिकाणी होते. तरीही समाजकंटकांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. एकदा विठोबारायाचा कंठा चोरल्याचा आळ बडव्यानी जनाबाईंवर घेतला. त्यांना सुळी देण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. सुळच विरघळला. जनी परीक्षेत उतरली.
नामदेवाच्या कुटुंबातील अन्य कुणालाही संत संबोधले गेले नाही. पण दासी असणाऱ्या जनाबाईला तो मान मिळाला. नामदेवांच्या घरी सर्वच विठ्ठल भक्त. त्यांच्याविषयी सांगताना जनाबाई म्हणतात,
नामदेवाचे घरी l चौदाजणे स्मरती हरी l
चौघे पुत्र चौघे सुना l नित्य स्मरती नारायणा l
आणिक मायबाप पाही l नामदेव राजाबाई l
आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी lपंधरावी ती दासी जनी l
विरोधी भक्तीने कधी विठ्ठलाला जनाबाईंनी शिव्याही घातल्या. उद्वेगाने त्यांनी म्हटले ‘अरे विठ्या अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या l’ तशाच त्यांनी विराण्याही रचल्या. अशा ह्या जनाबाई लोकांच्या स्तुतीनिंदेच्या पलीकडे जाऊन भक्तीचा प्रसार करणाऱ्या होत्या. दीर्घायुष्य भोगून नामदेवांच्या बरोबर विठ्ठलाच्या पायरीत अंतर्धान पावल्या. (शके १३५०).
तरीही ‘विठू माझा लेकुरवाळा’ अशी जनाबाईंची मायाळू व प्रेमळ साद आणि मातृका विठाबाईचे व तिच्या संत लेकरांचे जनाबाईने रेखाटलेले भावविश्व जनाबाईंना अमर करते.
विठु माझा लेकुरवाळा l संगे गोपाळांचा मेळा l
निवृत्ती हा खांद्यावरी l सोपानाचा हात धरी l
पुढे चाले ज्ञानेश्वर l मागे मुक्ताबाई सुंदर l
गोरा कुंभार मांडीवरी lचोखा जिवा बरोबरी l
बंका कडेवरी l नामा करांगुली धरी l
जनी म्हणे गोपाळा l करी भक्तांचा सोहळा l🙏
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈