सौ.वनिता संभाजी जांगळे
कवितेचा उत्सव
☆ एकांतकट्टा… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆
☆
रोज सांजेला
सांज सावल्यांचा,
घेत कानोसा.
मी आणि माझे मन
दोघांचा मिळून रमतो
एक एकांतकट्टा.
तेंव्हा निशब्द आवाजाच्या,
निरव मैफिलीत.
घिरट्या घालत येतात,
आशांचे बगळे तर
कधी निराशांचे कावळे.
त्यांच्या इवल्याशा चोचिंत
किती!किती!तो गोंगाट.
कधी हारलेल्या तर,
कधी जिंकलेल्या क्षणांचा.
अशातच धावून यावा,
दिशांना पांघरत गडद अंधार.
आणि समारोप व्हावा,
या एकांतकट्ट्याचा.
इतक्यात मंदिरात व्हावा
नाद घंट्यांचा आणि
सुर आरतीचा कानात
सांजणवेळांचा काकस्पर्श मात्र,
तसाच उभा मनात.
☆
© सौ.वनिता संभाजी जांगळे (घागरे)
जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली
संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈