श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 278
☆ हेका टाळण्यात गोडी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
देह गुऱ्हाळ केलेत, इतकी वागण्यात गोडी
वाटे घुंगरासारखी, तुमच्या बोलण्यात गोडी
*
येता दुसऱ्याच्या घरात, केला निर्मिती सोहळा
संसाराच्या चुलीमध्ये, हाडे जाळण्यात गोडी
*
गाठ मित्राच्या सोबती, होती सकाळीच पडली
सूर्यासोबत वाटावी, येथे पोळण्यात गोडी
*
कष्ट विस्मरणात जाती, बाळा पाहुनी झोळीत
फांदीवरती ही झोळी, वाटे टांगण्यात गोडी
*
सात जन्मातही नाही, त्यांचे फिटणार उपकार
आई-बापाचे हे ऋण, आहे फेडण्यात गोडी
*
वृक्षवल्ली तुकारामा, सारे तुमचेच सोयरे
माझ्यामध्ये शिरला तुका, झाडे लावण्यात गोडी
*
संन्यस्ताश्रमास पाळा, देईल शरीर इशारा
टाळा साखर झोपेला, हेका टाळण्यात गोडी
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈