सौ राधिका भांडारकर
☆ माझी जडणघडण… भाग – – ३५ – रेडिओ – भाग दुसरा ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
रेडिओ – भाग दुसरा
(हे “गीत रामायण” वर्षभर श्रोत्यांनी प्रचंड भावनात्मकतेने, श्रद्धेने आणि अपार आनंदाने ऐकले.)
इथून पुढे —
आज काय रामजन्म होणार…
सीता स्वयंवर ऐकायचे आहे…
राम, सीता, लक्ष्मण वनवासात चालले आहेत..
“माता न तू वैरिणी” म्हणत भरत कैकयीचा तिरस्कार करतोय…
भरत भेटीच्या वेळेस,
।पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा।
या गाण्याने तर कमाल केली होती.
“सेतू बांधा रे” या गाण्याबरोबर श्रोतृवर्ग वानरसेने बरोबर जणू काही लंकेलाच निघाला. घरोघर “सियावर रामचंद्रकी जय” चा गजर व्हायचा.
शेवटचं,
।गा बाळांनो श्री रामायण। या गाण्याने कार्यक्रमाचा जेव्हा समारोप झाला तेव्हा एक अनामिक हुरहूर दाटून आली. खरोखरच या श्रोतृगणात आमची पिढी होती हे आमचं किती भाग्य! या अमर महाकाव्याची जादू आम्ही या रेडिओमुळे प्रत्यक्ष अनुभवली. त्यानंतरच्या काळात गीतरामायणाचे अनेक प्रत्यक्ष कार्यक्रम झाले.. आजही होतात पण रेडियोवर ऐकलेल्या त्या पहिल्या कार्यक्रमाची मजाच और होती! आजही आठवताना, लिहिताना, माझ्या अंगावर काटा फुलतो. कसे आम्ही कुटुंबीय, शेजारी, आजूबाजूचे सारेच हातातली कामे टाकून गीत रामायणातल्या समृद्ध रचना गाणाऱ्या रेडिओ जवळ मग्न होऊन, भान हरपून बसून राहायचे आणि पुढच्या आठवड्याची प्रतीक्षा करायचे.
आज ओठातून सहज उद्गार निघतात, “रेडिओ थोर तुझे उपकार.”
शालेय जीवनातला आणखी एक- रेडिओ सिलोन वरून प्रसारित होणारा अतीव आनंददायी, औत्स्युक्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे “बिनाका गीतमाला”
“अमीन सयानी”चं बहाररदार निवेदन आणि तत्कालीन हिंदी चित्रपटातील एकाहून एक आवडती गाणी ऐकताना मन फार रमून जायचं. दर बुधवारी रात्री आठ वाजता, रेडिओ सिलोन वरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही न चुकता ऐकायचो. त्यासाठी दुसऱ्या दिवशीचा गृहपाठ पटापट संपवून “बिनाका गीतमाला” ऐकण्यासाठी सज्ज व्हायचे हे ठरलेलेच. आज कुठले गाणे पहिल्या पादानवर येणार यासाठी मैत्रिणींमध्ये पैज लागलेली असायची. तसेच नव्याने पदार्पण करणार्या शेवटच्या पादानवरच्या गाण्याचे ही अंदाज घेतले जायचे. आम्ही अक्षरश: “बिनाका गीतमालाची” डायरी बनवलेली असायची. शेवटच्या पादानपासून पहिल्या पादानपर्यंतची दर बुधवारची गाण्यांची यादी त्यात टिपलेली असायची. मुकेश, रफी, तलत, आशा, लताची ती अप्रतीम गाणी ऐकताना आमचं बालपण, तारुण्य, फुलत गेलं.
जाये तो जाये कहा..
जरा सामने तो आओ छलिया..
है अपना दिल तो आवारा..
जिंदगी भर नही भूलेंगे..
जो वादा किया वो..
बहारो फुल बरसाओ..
बोल राधा बोल..
बिंदिया चमकेगी, कंगना खनकेगी..
वगैरे विविध सुंदर गाण्यांनी मनावर नकळत आनंदाची झूल या कार्यक्रमातून पांघरली होती.
दुसऱ्या दिवशी शाळेतही मधल्या सुट्टीत पटांगणातल्या आंब्याच्या पारावर बसून आम्ही मैत्रिणी ही सारी गाणी सुर पकडून (?) मुक्तपणे गायचो. अमीन सयानीचे विशिष्ट पद्धतीने केलेले सूत्रसंचालन, त्याचा आवाज आम्ही कसे विसरणार? अजूनही हे काही कार्यक्रम चालू आहेत की बंद झालेत हे मला माहीत नाही. असतीलही नव्या संचासहित पण या कार्यक्रमाचा तो काळ आमच्यासाठी मात्र अविस्मरणीय होता हे नक्की.
फौजीभाईंसाठी लागणार्या विविधभारतीनेही आमचा ताबा त्याकाळी घेतला होता.
वनिता मंडळ नावाचा एक महिलांसाठी खास कार्यक्रम रेडिओवरून प्रसारित व्हायचा. तो दुपारी बारा वाजता असायचा. त्यावेळी आम्ही शाळेत असायचो पण आई आणि जिजी मात्र हा कार्यक्रम न चुकता ऐकायच्या. खरं म्हणजे त्या काळातल्या सर्वच गृहिणींसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आणि मनोरंजनाचा ठरला होता. माझा या कार्यक्रमांशी प्रत्यक्ष संबंध आयुष्याच्या थोड्या पुढच्या टप्प्यावर आला. त्यावेळच्या आठवणी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. अकरावीत असताना
माझे अत्यंत आवडते, इंग्लिश शिकवणारे, खाजगी क्लासमधले “काळे सर” हे जग सोडून गेले तेव्हा मी खूप उदास झाले होते. त्यांच्या स्मृतीसाठी मी एक लेख लिहिला आणि “वनिता मंडळ” या आकाशवाणीच्या कार्यक्रमात तो सादर करण्याची मला संधी मिळाली. त्यावेळी मा. लीलावती भागवत, विमल जोशी संयोजक होत्या. त्यांना लेख आणि माझे सादरीकरण दोन्ही आवडले आणि तिथूनच आकाशवाणी मुंबई केंद्रावर माझ्या कथाकथनाच्या कार्यक्रमाची नांदी झाली. तेवढेच नव्हे तर मी लेखिका होण्याची बीजे या आकाशवाणीच्या माध्यमातूनच रोवली गेली. माननीय लीलावती भागवत या माझ्या पहिल्या लेखन गुरू ठरल्या. रेडिओचे हे अनंत उपकार मी कसे आणि का विसरू?
अगदी अलीकडे “उमा दीक्षित” संयोजक असलेल्या एका महिला कार्यक्रमात कथाकथन करण्यासाठी मी आकाशवाणी मुंबई केंद्रावर गेले होते. पन्नास वर्षात केवढा फरक झाला होता! दूरदर्शनच्या निर्मितीमुळे आकाशवाणीला ही अवकळा आली असेल का असेही वाटले. नभोवाणी केंद्राचे एकेकाळचे वैभव मी अनुभवलेले असल्यामुळे त्या क्षणी मी थोडीशी नाराज, व्यथित झाले होते. फक्त एकच फरक पडला होता. त्या दिवशीच्या माझ्या कार्यक्रमाचा अडीच हजाराचा चेक मला घरपोच मिळाला होता पण त्याकाळचा १५१ रुपयाचा चेक खात्यात जमा करताना मला जो आनंद व्हायचा तो मात्र आता नाही झाला. आनंदाचे क्षण असे पैशात नाही मोजता येत हेच खरं! माझ्या कथाकथनाला अॉडीअन्स मिळेल का हीच शंका त्यावेळी वरचढ होती.
आता अनेक खाजगी रेडिओ केंद्रेही अस्तित्वात आहेत. गाडीतून प्रवास करताना अनेक RJ न्शी ओळख होते. कुठल्याही माध्यमांची तुलना मला करायची नाही पण एक नक्की माझ्या मनातलं नभोवाणी केंद्र… ऑल इंडिया रेडिओ… त्याचे स्थान अढळ आहे आज मी रेडिओ ऐकत नाही हे वास्तव स्वीकारून सुद्धा…
“ताई उठता का आता? चहा ठेवू का तुमचा? साखर नाही घालत.. ”
सरोज माझ्या डोक्यावर हात ठेवून मला उठवत होती…
“अगबाई! इतकं उजाडलं का? उठतेच..
आणि हे बघ तो रेडियो चालूच ठेव. बरं वाटतं गं!ऐकायला”
गरमगरम वाफाळलेला आयता चहा पिताना रेडियोवर लागलेलं कुंदा बोकीलचं,
।शाळा सुटली पाटी फुटली
आई मला भूक लागली।
हे गाणं ऐकत पुन्हा मी त्या आनंददायी ध्वनीलहरीत बुडून गेले.
– क्रमश: भाग ३५ – समाप्त.
क्रमशः…
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈