सौ. गौरी गाडेकर
जीवनरंग
☆ मोठा… भाग – २ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
(तेवढ्यात एक झोपाळा रिकामा झाला. प्रतिक्षिप्त क्रिया झाल्याप्रमाणे अधीर धावत जाऊन त्या झोपाळ्यावर बसला आणि झोके घेऊ लागला.) – इथून पुढे
पूर्वी आजोबा चालू शकायचे, तेव्हा ते रोज संध्याकाळी अखिलला बागेत घेऊन यायचे. तेव्हा अखिल स्वच्छंदपणे बागडत असे. आजोबा बाकावर बसून इतर आजोबांशी गप्पा मारायचे. अखिल इतर मुलांबरोबर पकडापकडी, लपाछपी, साखळी खेळायचा. शिवाय घसरगुंडी, चक्र, झोपाळे वगैरे होतेच. नंतर आजोबा आजारी पडले. त्यांना घरातल्या घरातपण एकट्याने चालता येत नाही आता. वॉकर घेऊन आजी त्यांना टॉयलेटला नेते. तेवढंच त्यांचं चालणं.
आज मात्र त्याची मनःस्थिती वेगळीच होती. ‘अधीरला कसं सांगायचं हे? त्याला कळेल; पण तो घाबरणार नाही, असं. ‘
दोन झोके घेतले मात्र, अधीरला आजीचं आठवलं. तो मग धावतच अखिलकडे गेला, ” दादा, दादा, सांग ना. आजी कुठे गेली?”
” आपण बसू या. मग सांगतो. “
बाक भरलेले होते. मग ते खाली हिरवळीवरच बसले.
“दादा, आता सांग ना. आजी…. “
“आपली आजी ना, अधीर, देवबाप्पाकडे गेली. “
“हो? मग परत कधी येणार?”
” नाही. परत नाही येणार. ”
” का पण?”
“देवबाप्पाकडे गेलेले परत येत नाहीत. तिथेच राहतात ते. “
“मग आपल्याला आजी कुठची?”
आता अधीरलाही रडायला येऊ लागलं. मग अखिलने त्याला जवळ घेतलं. थोडा वेळ रडल्यावर अखिलने स्वतःचे व अधीरचे डोळे पुसले.
“हे बघ, अधीर. बाबा ऑफिसात आणि आई शाळेत गेल्यावर आपल्यालाच आजोबांची काळजी घ्यावी लागणार. “
“पण आपल्याला तर चहा करायला येत नाही. “
“मी शिकेन चहा करायला. “
“मग मी तुला मदत करीन. आणि आजोबांना बाथरूममध्ये नेताना तू एका बाजूने धर, मी दुस-या बाजूने धरीन. ”
दोघे घरी आले, तेव्हा आजी कुठेच दिसत नव्हती. आजोबा झोपले होते. कदाचित नुसतेच डोळे मिटून पडले असतील. घरात फक्त बायकाच होत्या. बाबा, काका, मामा…… कोणीच पुरुष घरात नव्हते. आत्याचे डोळे रडून रडून सुजले होते. काकी, मामी आणि इतर बायका गप्पच होत्या. कियानची आजी आणि शेजारच्या बिल्डिंगमधल्या एक बाई बोलत होत्या.
“आजी शेवटपर्यंत आजोबांचं व्यवस्थित करत होत्या. आता या नोकरीला जाणार, म्हटल्यावर पंचाईतच आहे. ते तसे बेडरिटन…. “
” रिटन नाय हो. रिडन. बेडरिडन. आता तसे वृद्धाश्रम झालेत, म्हणा. त्या पिंकीच्या आई सांगत होत्या. त्यांनी त्यांच्या सास-यांना ठेवलंय ना, त्या वृद्धाश्रमातला स्टाफ एकदम अॅरोगंट आहे. “
“मग घरी आणलं त्यांना? “
” छे हो. सहा महिन्यांचे पैसे आगाऊच भरले आहेत. ती मुदत संपल्यावर दुस-या वृद्धाश्रमात ठेवणार, म्हणाल्या. “
आंघोळ करून आलेल्या उमाच्या कानावर हे पडलं. न राहवून ती बोलली, ” हे बघा. वृद्धाश्रमाच्या गप्पा इथे नकोत. बाबांना आधीच धक्का बसलाय. त्यात हे कानावर पडलं, तर ते हाय खातील. आणि आम्ही आमच्या बाबांना घरीच ठेवणार. ”
” नाही हो, अखिलची आई. मी आपलं सांगितलं. सोयी आहेत, म्हटल्यावर…. ”
“हा विषय बंद. ”
मघापासून काळजीत असलेल्या आत्याने सुटकेचा निश्वास सोडला.
काकी म्हणाली, ” अखिल, अधीर, तुम्ही आंघोळ करून घ्या. मी पाणी काढून देते आणि टॉवेल आणून देते. “
अखिलने अधीरला आंघोळ घातली. स्वतःही केली.
केस पुसताना अखिलला आठवलं, त्याने कितीही जोर लावून केस पुसले, तरी आजी केसांना हात लावून बघायची आणि कुठे ओलसर असतील, तर खसखसा पुसून द्यायची.
अधीर तर काय, आजी केस पुसायला लागली, की मोठमोठ्याने ओरडायला लागायचा. मग आजी शांतपणे त्याला समजवायची, ” डोक्यात पाणी मुरलं, तर सर्दी होते. केस पुसताना तुला दुखत असेल, तर आपण सरळ तुझं चकोट करून घेऊ या. वाटल्यास शेंडी ठेवू या. ” मग अधीर घाबरून गप्प बसायचा.
अखिलची मुंज झाली, तेव्हा आई, बाबा, आजोबा सगळे मागे लागले होते, “चकोट करू या. छान दिसेल मुंजा. ” पण अखिल अजिबात तयार नव्हता. मग आजीने फतवा काढला, ” मुंज अखिलची, केस अखिलचे, तर निर्णयही अखिलच घेणार. ” अखिल खूश झाला.
पण आजी एवढ्यावरच थांबली नाही. तिने बाबा, काका आणि इतरांचे मुंजीतले, काही छोट्या बाळांचे जावळाचे फोटो गोळा केले. एका मासिकातले मोठमोठ्या माणसांचेही फोटो दाखवले. “हल्ली, अरे, फॅशन आलीय चमनगोटा करायची. आणि समजा, तुझे केस कापलेच, तर महिन्या-दीड महिन्यात हा बगिचा पुन्हा वाढणार, ” त्याचे केस कुरवाळत आजी म्हणाली.
“नक्की?”
“नक्की. अगदी शंभर टक्के. “
“पण कापताना दुखणार?”
“एवढं पण नाही. आता तुला मी त्या छोट्या बाळांचे फोटो दाखवले ना?जावळ काढतानाचे. “
“मुलं चिडवतील?”
“चिडवायला लागली, तर तूच उलट सांग त्यांना, ‘किती हलकं वाटतं!’ “
शेवटी अखिल हसतहसत तयार झाला होता.
शेजारच्या काकूंनी दारातूनच अखिलला हाक मारली आणि हातातला मोठा जेवणाचा डबा त्याच्याकडे दिला, ” स्वयंपाकघरात नेऊन ठेव. कोणाला जेवायची इच्छा नसणार. पण काहीतरी पोटात तर गेलं पाहिजे. आजोबांना औषधं घ्यायची असणार. तू आणि अधीर – तुमची आंघोळ झाली, तर आमच्याकडेच या जेवायला. आणि तिथेच अभ्यास वगैरे करत बसा. इथे कोणकोण येत राहणार…. ”
आजी नेहमी सांगायची, काकू ओरडत असल्या, तरी स्वभावाने खूप चांगल्या आहेत. ते अखिलला आता पटलं.
अखिलला काकूंची खूप भीती वाटायची. खूप कडक होत्या त्या.
एकदा दुपारी अखिल आणि कियान जिन्यात कॅचकॅच खेळत होते. दोनदा बॉल काकूंच्या दारावर बसला. तेव्हा काकू बाहेर येऊन ओरडल्या, ” दुपारच्या वेळी घरात बसून बैठे खेळ खेळा. ” त्यामुळे तो काकूंच्या बाजूला फिरकत नसे. पण आज नाईलाज होता. म्हणून तो पटकन काकूंना बोलवायला गेला. त्याही चटकन आल्या. आणि केवढी मदत केली त्यांनी!
त्याउलट कियानची आजी त्याला मस्त वाटायची. त्याच्याकडे कधी गेलं, की आजी तिच्या खोलीत टीव्ही बघत बसलेली असायची. भूक लागली, की कियान स्वतःच स्वयंपाकघरात जायचा आणि डबे उघडून यांच्यासाठी खायला आणायचा.
मग अखिलला डॉक्टरांची आठवण झाली. त्याला डॉक्टरांचा रागच आला होता. स्वतःहून सोडाच, पण आजोबांनी सांगितलं, तरी ते हॉस्पिटलला, अॅम्ब्युलन्सला फोन करत नव्हते. नुसतेच गप्प बसून राहिले होते.
आता अखिलच्या लक्षात आलं, आजी गेल्याचं डॉक्टरांना कळलं, तरी आजोबांना धक्का बसेल, म्हणून ते तेव्हा काहीच न बोलता आई-बाबांची वाट बघत बसले होते. नंतरही त्यांनी आईकडे, आजोबांसाठी एक गोळी काढून दिली आणि सांगितलं, “यांना त्रास झाला, तर रात्री जेवल्यानंतर ही गोळी द्या. म्हणजे शांत झोप लागेल. “
अखिल तसा नेहमीच सगळ्यांशी बोलायचा. पण इतरांचं बोलणं, त्यामागचा अर्थ, बोलणा-याचा स्वभाव, प्रामाणिकपणा याची जाणीव आज झाली, तेवढी त्याला कधीच झाली नव्हती.
या पाच-सहा तासात आपण ख-या अर्थाने मोठे झालो आहोत, असं त्याला वाटलं.
– समाप्त –
© सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306, ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈