सौ. उज्ज्वला केळकर
☆ प्रिय बाबा… कवयित्री : सुश्री वंदना श्रीवास्तव ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
मूळ हिन्दी कविता लिंक >> हिन्दी साहित्य – कविता ☆ ओ मेरे जनक… ☆ सुश्री वंदना श्रीवास्तव ☆
☆
प्रिय बाबा,
तू पुन्हा मला
चिमणी म्हणालास.
मला आठवण आहे,
जेव्हा मी छोटीशी चिमणी होते,
अंगणात नाचत, बागडत होते, तेव्हा
तू मला आपल्या मांडीवर बसवून
आकाशाकडे बोट दाखवत
म्हणाला होतास,
तुला उडायचं आहे.
हे अनंत आकाश तुझं आहे. ,
अनंत उड्डाणासाठी.
तेव्हा माझे डोळे लकाकले होते.
माझे पंख उत्साहाने फडफडले होते
पण, तेव्हा मला कुठे माहीत होते
की मी पंख पसरून उडण्याचा प्रयत्न करेन,
त्या अनंत आकाशात,
तेव्हा माझ्याभोवती तू कुंपण घालशील
माझे पंख थोडेसे खुडशील
शाळेत पोपटपंची केलेलं
मी फटाफटा बोलत होते
शाळेत शिकवलेल्या कविता
लचकत, मुरडत गात होते, तेव्हा,
तू मुग्ध होत होतास.
माझ्या विद्वत्तेवर आणि असामान्यत्वावर
पण जेव्हा मी,
माझे स्वत:चे शब्द बोलण्याची इच्छा धरली,
त्या ठरीव परिभाषेला बाजूला सारून,
माझी वाक्ये बोलू लागले,
तेव्हा तू गुपचुप माझी जीभच कातरलीस
माझ्या शब्दकोषातील किती पाने फाडून टाकलीस
तो तूच होतास ना! माझ्यावर खूप खूश होतास आधी
मग आपला ‘कोहिनूर’ मूल्यांकनासाठी
दुसर्यांकडे का सोपवलास?
ज्यांनी माझं मनोबल आतपर्यंत तोडलं.
आता जर ‘चिमणी’ म्हणून बोलवायचं असेल,
तर कान टोचण्याच्या वेळी,
हा मंत्रही कानात पुटपुट की
चुकीचं ऐकून मी गप्प बसू नये.
डोळ्यात काजळाबरोबर
स्वप्न बघण्याची हिंमतही भर.
कवटाळताना मला इतकं साहस दे की
त्यांना पूर्ण करण्याची जिद्द मी दाखवू शकेन
इतका आत्मसन्मान भर माझ्यात, की
जे आहे, जशी आहे, तशीच बनून राहू शकेन.
इतकं करू शकलास बाबा,
तरच मला ‘चिमणी’ म्हणून हाक मार.
तरच मला ‘चिमणी’ म्हणून हाक मार…
—–
मूळ कविता – ओ मेरे जनक
मूळ कवयित्री – सुश्री वंदना श्रीवास्तव
संपर्क – नवी मुंबई महाराष्ट्र; ई मेल- vandana [email protected]
भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈