सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ माहेर… भाग-२ – मूळ गुजराती लेखक : यशवंत ठक्कर – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम ☆ मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिले – स्वातीला किती तरी काळानंतर अशा जिवंत वातावरणाचा अनुभव येत होता. कुणी तरी अगदी जवळचं, आत्मीय भेटावं, तसा तिला आनंद झाला होता. वस्तू घेणार्या ग्राहकांच्या डोळ्यात दिसणारी आशा, उमंग, लाचारी यासारखे भाव तिला स्वत:चेच वाटले. किती तरी वर्षांपूर्वी ती हेच भाव घेऊन, या बाजारात नेहमीच येत होती. आता इथून पुढे)
दोघेही एका कपड्यांच्या हातगाडीपासून काही अंतरावर उभे होते. एक बाई तिथे आपल्या एका मुलाला घेऊन कपडे घ्यायला आली होती. तिने ठेलेवाल्याकडून मुलाच्या मापाची शर्ट-चड्डीची एक जोडी खरेदी केली आणि मुलाला घातली. त्याला ती अगदी बरोबर बसत होती. मुलगा नवीन कपडे पाहून खुश झाला. आता केवळ पैसे देणं बाकी होतं. ती भावाबद्दल विक्रेत्याशी घासाघीस करू लागली.
‘‘मेहुल, तुला आठवतं, अंशचा पहिला वाढदिवस होता. त्यावेळी त्याच्यासाठी कपडे घ्यायला आपण याच बाजारात आलो होतो. ‘ स्वातीने प्रेमळ नजरेने त्या मुलाकडे बघत म्हंटले.
‘हो. त्यावेळी आपला नाईलाज होता. कमाई कमी होती नं!’
‘कमाई कमी होती, पण जीवन छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांनी झळकत होतं.
मी पण व्यापार्यांशी या बाईप्रमाणेच घासाघीस करायची आणि त्याने किंमत कमी केली, की खूप खुश व्हायची. ’
आज मात्र ती बाई आणि तो मुलगा यांच्या नशिबात खुशी नसावी. खूप घासाघीस केल्यानंतरही त्या व्यापार्याने जो भाव सांगितला, तेवढे पैसे बाईकडे नव्हते.
तिच्याकडे वीस रुपये कमी होते. वीस रुपये कमी घेऊन कपडे देण्यासाठी ती गयावयाकरत होती. पण व्यापार्याने त्यासाठी आपली असमर्थता दर्शवली. तो म्हणाला, ‘ताई, यापेक्षा एक रुपयादेखाल कमी होऊ शकत नाही. माझेदेखील घर आहे. परिवार आहे. तिकडेही मला लक्ष द्यायला हवं!’
त्या बाईकडे शेवटी एकच उपाय उरला. त्या मुलाच्या अंगावरचे कपडे काढून व्यापार्याला परत करणं. ती जेव्हा तसं करू लागली, तेव्हा तो मुलगा मोठमोठ्याने आक्रोश करू लागला. बघता बघता त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो म्हणू लागला, ‘तू मला नवे कपडे घेऊन देण्यासाठी आणलस, तर का घेऊन देत नाहीयेस?’ तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, बेटा, हे कपडे चांगले नाहीयेत.
आपण तुला दुसरे चांगले कपडे आणू!’ पण मुलाला काही ते म्हणणं पटलं नाही. त्याचं झगडणं चालूच होतं. बालहट्टामुळे बाईपुढे धर्मसंकट उभे राहिले. ती जोर लावून त्याने घातलेले कपडे काढायचा प्रयत्न करत होती, तर मुलगा पूर्ण ताकदीनिशी कपडे घट्ट पकडून ठेवत होता.
आता मेहुलला रहावलं नाही. तो ठेलेवाल्याजवळ गेला आणि त्याने बाईला ऐकू जाणार नाही, इतक्या हळू आवाजात ठेलेवाल्याला विचारले, ‘किती कमी पडताहेत?’
साहेब, वीस रुपये. जितके कमी करणं शक्य असेल, तेवढे मी केले. आता याहून कमी करणं खरंच मला शक्य नाही. नाही तर मी मुलाला रडू दिलं नसतं. ‘
‘तू त्यांना कपडे दे. ते गेले, की मी तुला वीस रुपये देईन. त्यांना सांगू नकोस, की बाकीची रक्कम मी देतोय, नाही तर त्यांना वाईट वाटेल. ’ मेहुल हे हळू आवाजात बोलला आणि स्वातीपाशी येऊन उभा राहिला.
‘राहूदेत त्याने घातलेले कपडे’ ठेलेवाला म्हणाला. ‘दे पैसे. वीस रुपये कमी आहेत ना, चालेल. ’
बाईने तिच्याजवळ असलेली रक्कम व्यापार्याच्या हातावर ठेवली.
‘आता खुश ना?’ व्यापार्याने प्रेमाने मुलाला विचारले. बालकाने निर्मळ नजरेने आपली प्रसन्नता व्यक्त केली.
बाई व्यापार्याला आशीर्वाद देत-देत आणि मुलाच्या गालावरील अश्रू पुसत पुसत निघून गेली.
बाई आणि तिचा मुलगा थोडे दूर गेल्यावर मेहुलने त्या व्यापार्याचे पैसे देऊन टाकले.
‘आज मला माझा हरवलेला मेहुल परत मिळाला. ’ खुश होत स्वाती म्हणाली.
‘स्वाती, आज मी ऑफीसमध्ये हरवलेल्या मेहुलला शोधण्याखेरीज दुसरं काही कामच केलं नाही. चार वाजता मला तो मिळाला आणि मी तुला लगेचच फोन केला. ’
स्वातीने मेहुलचा हात धरला. ‘चल! आता मला काहीच नको. जे हवं होतं, ते मिळालं. ’
‘अरे ! इथपर्यंत आलोय, तर राजस्थानी कचोरी खाल्ल्याशिवाय कसं जायचं?
राजस्थानी कचोरी खाल्ल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये आइसक्रीम खाल्लं. अंशूला पहिल्यांदा त्याच हॉटेलमध्ये त्यांनी आइसक्रीम खिलावलं होतं.
बाजारात चक्कर मारून ती दोघे बाईक ठेवलेल्या ठिकाणी परत आली.
मेहुलने स्वातीला मागे बसवले आणि बाईक पळवली. तो घराकडे जाणारा रास्ता नव्हता. स्वातीने विचारले, ‘इकडे कुठे? घेरी नाही जायचं?’
‘नाही. अजून एक ठिकाण बाकी आहे.’
‘कुठे?’
‘जवळच आहे.’
त्या जवळच्या जागेबद्दल स्वाती काही अंदाज बांधू लागली, पण तिचे सगळे अंदाज चुकीचे ठरले. त्या जागी मेहुलने बाईक उभी केली, तेव्हा ती चकित झाली.
‘इथे जायचे!’ बोटाने इशारा करत तो म्हणाला.
काव्य-रसिकांचं स्वागत करणारा तो टाउन-हॉल स्वातीला तिच्या माहेरासारखाच वाटला.
— समाप्त —
☆☆☆☆☆
मूळ गुजराती कथा – पीयरियां
मूळ गुजराती लेखक – श्री यशवंत ठक्कर
मोबाईल: 9427539111
हिंदी अनुवाद – मायका
हिंदी अनुवादक – राजेन्द्र निगम
अहमदाबाद 380059, मो. 9374978556
मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈