प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

रोखून धरलेली नजर ☆ प्रा. भरत खैरकर 

हे कधी लक्षात आलाय कां काही लोक नेहमी तुमच्या मर्यादा, कमतरता, सीमा दाखवायला, तपासायलाच बसलेले असतात! ते कधीही तुमच्याशी धड बोलत नाहीत. सारखा अपमान करण्याच्या स्थितीमध्ये किंवा तुम्हांला कमीपणा दाखवण्याच्या नादात असतात. तुम्हांला तुच्छ लेखण्यासाठी ते सतत खूप उत्सुक असतात.

त्यांच्या अशा वागण्याला आपण हसून देतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो. पण अशाने ते थांबत नाहीत! अशावेळी काय करायचं? जे तुमचा सतत अनादर करतात. तुम्हांला हीन पद्धतीने वागवतात तर मग तुम्ही एक गोष्ट करा. अशा माणसाकडे एकदम डोळ्यात रोखून बघा! काही बोलूच नका!!

अशी माणसं तुम्हांला त्यांच्या नाटकामध्ये, तमाशामध्ये सामील करू इच्छितात. त्यासाठी तुमची प्रतिक्रिया, तुमचं घाबरलेपण, अळखळलेपणा, उत्तर देणं किंवा उलट उत्तर देणं त्यांना हवं असतं. जेणेकरून तुम्ही त्यात ओढले जाल. असं करून ते तुमचा आत्मविश्वास तोडू इच्छितात किंवा तुम्हांला हीन दाखवितात.

मात्र तुम्ही जेव्हा शांत राहून त्यांच्या नुसतं नजरेला नजर भिडवता तेव्हा मात्र त्यांचे सगळे पवित्रे फेल गेलेले असतात.. संपलेले असतात. आणि तुमच्या कोणत्याही प्रकारच्या न मिळालेल्या प्रतिसादामुळे सगळा खेळच उलटफेर होतो. कारण समोरच्या व्यक्तीला हवी असलेली प्रतिक्रिया आपण न केल्याने त्याचा ‘ पोपट’ होतो. आणि तो व्यक्ती आतल्याआत तडफडायला लागतो. ज्यावेळी तुम्ही स्थिर आणि रोखून अशी एक नजर टाकता. तेव्हा तुम्ही कुठलाही शब्द न वापरता स्पष्टपणे सांगत असतात की ‘तुझ्या नाटकात मी सामील होणार नाही!’. किंवा ‘तुला हवा आहे तसं मी वागणारच नाही’.. त्यामुळे समोरच्याचा भ्रमनिराश होतो.

ही अशी एक पद्धत आहे ज्यामुळे तुम्ही काहीही न करता समोरच्याला चितपट करू शकता. बऱ्याच वेळा स्थिर नजर आणि शांत राहणे ह्याच गोष्टी ‘कारीगर’ ठरतात.

हा उपाय रोजच्या आयुष्यात कसा उपयोगी पडतो हे बघायचे असेल तर हे ऐका.. मीटिंगमध्ये नेहमी एक व्यक्ती सारखी सारखी माझ्या मतावर प्रतिक्रिया द्यायची.. उलटसुलट रिएक्शन द्यायची. जसं काही त्याचं काहीतरी अडतयं किंवा त्याचा काहीतरी त्यात हेतू आहे.. स्वार्थ आहे.. त्याहीपेक्षा त्याला मला खालीच दाखवायचं होतं.. त्यासाठी तो चढ्या आवाजात बोलायचा.. आणि स्वतःलाच इतरांपेक्षा शहाणा समजायचा.. इतरांपेक्षा मलाच अक्कल आहे.. किंवा ‘मीच हे सर्व घडवून आणलं. ‘ हे दाखवण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असायचा.. त्यावेळी मी माझे म्हणणे अत्यंत नम्रपणे किंवा कोणालाही न दुखवता, इतरांचा आदर करत मांडायचो. तरीही त्याचा अट्टाहास काही जात नव्हता. ग्रामीण भाषेत ‘माझीच लाल’ असं बोलल्या जातं. तसा काहीसा तो व्यक्ती होता. त्यामुळे तो प्रत्येक वेळी मलाच नव्हे तर इतरांना सुद्धा मीटिंगमध्ये मधेमधे करून रोखून धरायचा.. व आपण किती हुशार आहोत हेच सांगायचा त्याचा रोख असायचा.. आता हे मात्र अती झालं होतं..

असेच एकदा मिटिंगमध्ये मी खुर्ची थोडीशी मागे केली.. रेलून बसलो.. आणि एकसारखा टक लावून त्याच्याकडे बघत गेलो.. मी शब्दही काढला नाही. माझे दोन्ही हात मी छातीशी बांधून घेतले आणि साधारण तीस-पस्तीस सेकंदापर्यंत त्या व्यक्तीला सारखा न्याहाळत राहिलो. नव्हे त्याला रोखूनच बघत राहिलो.. त्यामुळे हळूहळू मीटिंग मधील वातावरण एकदम ‘गरम’ झाले.. इतरही लोक मला फॉलो करू लागले.. तेही त्याच्याकडे टक लावून बघायला लागले.. कोणीच काही बोलत नव्हतं.. आणि आता सगळे त्याच्या रिॲक्शनची वाट बघत होते तो काय करतो किंवा काय करेल ही उत्सुकता सर्वांना लागली होती.

तो अचानक घाबरायला लागला.. त्याच्या आवाजाला कंप सुटला.. त्याचे शब्द अडखडायला लागले.. तो ततपप करायला लागला.. तो इकडे तिकडे बघायला लागला.. नजरेला नजर मिळवण्याची हिंमत करत नव्हता.. त्यानंतर झालेल्या कित्येक मीटिंगमध्ये त्याने मला मधे टोकलं नाही की रोखलं नाही. एवढंच नाही तर तिथून पुढे तो माझ्याशी इज्जतीत वागायला लागला.. आदर द्यायला लागला.. त्याला हे लक्षात आलं की मी तो व्यक्ती नाही ज्याला तो दाबू शकतो.. त्याच्या इशाऱ्यावर नाचवू शकतो.

बऱ्याच वेळा लोकांना हे दाखविण्यासाठी की तुम्ही नेमके कोण आहात हा पवित्र आजमावला पाहिजे!जेव्हा तुम्ही वरील पद्धत अवलंबता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुम्ही सांगत असता की मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे चालणारा व्यक्ती नाही. तुझ्या हातातली कठपुतली नाही. माझे धागेदोरे माझ्याच हातात आहे. ते तुला देऊन तुझ्या तमाशाचा मी भाग बनू इच्छित नाही. माझ्या भावभावनांशी खेळण्याचा तुला अधिकार मी देणारच नाही. आणि माझी मूल्ये काय आहे, हे तुझ्यासारख्या कडून सर्टिफाईड करून घेण्याची गरज नाही.

खूपदा आपला जेव्हा कोणी अपमान करतो किंवा बदनामी करतो तेव्हा आपण स्वतःला डिफेन्स करण्याचा पवित्रा आजमावतो.. आणि समोरच्या व्यक्तीला एक प्रकारे वाव देत असतो.. आपण आपली सफाई.. आपली बाजू मांडत असतो.. जेणेकरून कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये किंवा भांडण होऊ नये. मात्र समोरचा त्या सगळ्या गोष्टींचं ‘पोतरं’ करतो.

अशावेळी तुम्ही रोखून धरलेली नजर ही काही आक्रमक कृती नाही. ती एक सौम्य पण रामबाण अशी कृती आहे! यामधून तुम्ही शांत आणि मजबुतीने उभे आहात खंबीर आहात हे समोरच्याला दिसतं.. तुमचे पाय जमिनीवर आहेत. तुम्ही उडो उडो करत नाही.. किंवा कुठलाही प्रकारचा दाखवेपणा तुम्हांला नको आहे. तुमचं काम आणि तुम्ही हे सांगण्याचा तुमचा रोख ह्यातून दिसतो. तुम्ही जिम्मेदार व्यक्ती आहात. हा सुद्धा संदेश या कृतीतून जातो.

जे लोक इतरांची बेईज्जत किंवा अपमान करत असतात त्यांना आजवर कोणीही रोखलेलं किंवा उलट बोललेलं नसतं. त्यामुळे हे लोक शेफारलेले असतात.

आपली उणीव झाकण्यासाठी असे लोक इतरांचा वापर करत असतात. त्यांना हे कोणी सांगितलं नसतं की तुमच्या अशा वागण्याने समोरच्याच व्यक्तिमत्व किंवा त्याचे सद्गुण दबून जातात.. पण जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीला शांत आणि रोखून धरलेल्या नजरेने बघता तेव्हा ती कृती एका आरशासारखे काम करते.. तो आरसा.. ती नजर.. त्या व्यक्तीला त्याचं प्रतिबिंब दाखवितं. तुम्ही त्याला काही सांगत नसता फक्त त्याला ‘दाखवत’ असता.

पण विश्वास ठेवा की अशा प्रकारचे लोक या पद्धतीने स्वतःला कधीही बघू इच्छित नाही किंवा त्यांनी तसं स्वतःला कधी बघितलेच नसते.. स्वतःचं असं भयानक रूप जेव्हा ते त्या आरशात बघतात.. तेव्हा ते खजील होतात.. त्यांना त्यांच्या कृतीबद्दल शरम वाटते.. लाज वाटते. त्यामुळे रोखून पाहण्याची ही त-हा.. पद्धत खूप उपयुक्त आणि परिपूर्ण आहे. चला तर मग बघूया रोखून आपला अपमान करणाऱ्याकडे! ज्यामुळे समोरचा व्यक्ती थोडा माघारी जाईल आणि आपण आतल्या आत मजबूत होवू !!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments