डाॅ.भारती माटे

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “आई ssss…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

खूपदा वाटतं,

फोटोत जाऊन बसलेल्या आईशी निदान फोनवर बोलावं!

जमलं तर नियतीशी गोड बोलून

तिने परतूनच यावं!

सकाळी झोपेतून तिनं

हळूच उठवावं,

तरी तिच्या मांडीवर

लोळत पडावं!

तिच्या हातचं काहीही

मनसोक्त खावं,

तिने पाण्यालासुद्धा

दिलेल्या फोडणीने

घर दरवळून जावं!

वय कितीही वाढलं असो,

तोंड तिच्या पदराला पुसावं!

स्वयंपाक शिकून घे,

तिने सतत ओरडावं

आणि आपण मात्र

ओट्यावर बसून

आयतंच खावं!

आई कुठल्या रंगाचा

 घालू ग ड्रेस

म्हणून सतवावं,

तिच्या साडीच्या मऊ स्पर्शाची

पैठणीला नाही सर!

तिला सांगावं…

बाहेरून आल्यावर

तिनेच समोर दिसावं,

थकला असशील ना म्हणून

लगबगीने पाणी द्यावं!

आपण ही आल्या आल्या

आज दिवसभरात घडलेलं

अधाशासारखं सांगून टाकावं,

आपल्याशी वाईट वागणाऱ्यावर

तिने खूप रागवावं!

आपली चूक असली तरी,

आपलीच बाजू घेऊन भांडावं!

आई, तू गेल्यापासून खाण्या-पिण्याची,

सणावाराची मजाच गेली!

 *

किती बोलायचो आपण,

पण नंतर कामात गेलो बुडून,

पाच मिनिटं बोलतोस का बेटा?’

विचारायचीस घाबरून,

तुला दिसतंय ना? कामात

आहे ग मी..जा ना

असंच म्हटलं मी

आणि खरंच निघून गेलीस तू परत

ना येण्यासाठी!

असं कुठलं काम असतं,

आईशी बोलायलाही नसतो वेळ,

माहीतच नसतं आपल्याला, नियती मांडून बसली आहे वेगळाच खेळ!

आता हे घर निशब्द आहे,

यात नाही तुझ्या मायेची ओल,

आजही तुझा फोटो पाहिला की,

काळजात उठते कळ खोल!

आजही आनंद झाला की तुझ्यापुढे येऊन नाचतो, आजही कुणी दुखावलं

तर तुझ्यासमोर रडतो,

चूक झाली तर तुझ्यापुढे येऊन कान धरतो, नवीन काही सुरु करताना

नमस्कार करतो.

पण, फोटोत तुझे शब्द नाहीत,

तुझा स्पर्श नाही,

आई, तुझ्याशिवाय कशालाच अर्थ नाही!

बघ ना जमेल तर,

बोलता येईल का प्रत्यक्ष भरभरून,

खरंच का ग, एकदा गेलेली माणसं येत नाहीत परतून ?

I miss you, Aai. ज्यांना आई आहे ना त्यांनी त्या मातेला कधीही अंतर देऊ नका… कारण मातेची किमया फारच निराळी आहे बरं..! आई म्हणोनी कोणी. आईस हाक मारी. ती हाक येई कानी…

 

कवी: अज्ञात

प्रस्तुती: डॉ. श्रीमती भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments