श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “इन्फोटेक” – लेखक : श्री अच्युत गोडबोले – परिचय : श्री सचिन केळकर ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : इन्फोटेक
लेखक : श्री अच्युत गोडबोले
प्रकाशक : बुकगंगा
पृष्ठ : ४९६
मूल्य: ४९९₹
अन्न, वस्त्र, निवारा आणि इन्फोटेक या आता माणसाच्या नवीन मूलभूत गरजा बनल्या आहेत. आपल्या जीवनातल्या कुठल्याही घडामोडी मध्ये इन्फोटेक चा मोठा वाटा असतो. पण नक्की इन्फोटेक म्हणजे काय ? या चार अक्षरी शब्दांमध्ये किती गोष्टी समाविष्ट आहेत याचा आपण कधी विचार केला आहे का ? हा विचार आपल्यापर्यंत घेऊन येतं ते इन्फोटेक हे पुस्तक.
मराठीतील एक उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ म्हणून हे पुस्तक नक्कीच खास आहे. अच्युत गोडबोले यांची एखाद्या विषयाबद्दल विस्तृत माहिती करून देण्याची खासियत आणि हा विषय तर त्यांच्या आवडीचा असल्यामुळे, बारीक-सारीक गोष्टींच्या बद्दल अतिशय खोलात जाऊन सोप्या भाषेत दिलेली माहिती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य ठरते.
नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून उच्च व्यावसायिक शिक्षण दिलं जावं अशी सूचना आहे. पण अशा वेळेला महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये मातृभाषेतील पुस्तकेच उपलब्ध नसतात. ही उणीव इन्फोटेक क्षेत्राकरिता हे पुस्तक नक्कीच पूर्ण करते.
कम्प्युटर, इंटरनेट, मोबाईल आता आपल्या परिचयाचे शब्द झाले आहेत. पण यानंतर येणारे 5G, क्लाऊड कॉम्प्युटिंग, बिगडेटा, ऑगमेन्टेड रियालिटी, ब्लॉक चेन या इन्फोटेक मधील नवीन नवीन संकल्पनांची माहिती, किमान तोंडओळख होणे आपल्याला आवश्यक आहे.
इन्फोटेक या पुस्तकाची रचना एका संदर्भ ग्रंथा सारखी आहे. इंग्रजी भाषेमध्ये टेक्नॉलॉजी फॉर डमीज (Dummies) या प्रकारची बरीच पुस्तके उपलब्ध आहेत. एखादी गोष्ट अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याकरता डमीज प्रकारच्या पुस्तकांचा वापर होतो. थोडे फार या धाटणीचे हे पुस्तक असले तरी मराठी वाचकाला सहज समजेल अशा भाषेत इन्फोटेक या विषयातील संकल्पनांची माहिती करून देते.
पुस्तकात नऊ भाग आहेत. या भागात डेटा, जीपीएस आणि गुगल मॅप्स, सेंसर आणि आयओटी(IoT), नवीन युगातील वापरली जाणारी काही ठळक तंत्र कल्पना जसे ब्लॉकचेन, बिटकॉइन, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि AR/VR, नेटवर्किंग आणि इंटरनेट, मोबाईल फोन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि भविष्यातील तंत्रज्ञान यांच्या बद्दल लिहिले आहे. शेवटच्या दोन भागात संगणकीय शास्त्रातील मूलभूत संकल्पना अतिशय सोप्या करून सांगितल्या आहेत.
डेटा किंवा माहिती – एखाद्या गोष्टीची इत्यंभूत माहिती असणे अतिशय गरजेचे असते त्याचप्रमाणे ही माहिती कशी वापरली जाते, त्यावरून त्या माहितीचे महत्व जास्त ठळक होतं. इन्फोटेक मध्ये माहिती किंवा डेटा एका विशिष्ट पद्धतीने स्टोर किंवा संकलित केली जाते. या पद्धतींचा थोडक्यात विश्लेषण पहिल्या भागात आपल्याला बघायला मिळते, आपण वापरत असलेल्या माहिती साठवणीच्या काही गोष्टी जसे फ्लॉपी ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह, मेमरी स्टिक यामध्ये हा डेटा कसा स्टोर किंवा संग्रहित केला जातो याबद्दल या भागात माहिती दिली आहे. आधुनिक संगणक मोठ्या प्रमाणामध्ये डेटाचा वापर करू लागले आहेत, हा वापर अजून सुगम होण्याकरता डेटा इनक्रीप्शन आणि कॉम्प्रेशन किंवा सांकेतिक भाषेत डेटा साठवणी, डेटा मॅनेजमेंट आणि मोठ्या प्रमाणात संकलित होणाऱ्या डेटाचा अजून चांगला वापर- बिग डेटा अनालिसिस या संकल्पना या पहिल्या भागात आपल्याला वाचायला मिळतात. बिट्स आणि बाईट्स यांनी सुरुवात झालेले डेटा स्टोरेज आता आपण सहजपणे गिगाबाइट मध्ये मोजू लागले आहोत. आणखी काही वर्षांमध्ये डेटा स्टोरेज कॅपॅसिटी पेटा बाईट, हेक्सा बाईट, झिटा बाईट आणि योटा बाईट इथपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. यावरून आपल्याला अंदाज येतो की डेटा स्टोरेज, डेटा मॅनेजमेंट याची प्रगती कुठल्या स्तरावरती जाणार आहे.
“डेटा इज द न्यू ऑइल” हा एक कन्सेप्ट सध्या खूप प्रचलित आहे. जसे आखाती देशांसाठी कच्चे तेल हे एक विकासाची पायरी होती तसेच आपल्या नागरिकांच्या बद्दल उपलब्ध असलेला डेटा हा भविष्यामध्ये एक गुरुकिल्ली ठरणार आहे. असं म्हणतात कि एक व्यक्ती म्हणून तुम्ही काय आहात, तुमच्या आवडी निवडी काय आहेत, तुम्ही कुठे जाता, हे तुमच्या घरच्या लोकांपेक्षा गूगल ला जास्त माहित असते. याचं कारण म्हणजे प्रचंड प्रमाणात आपण तयार केलेला डिजिटल डेटा-स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स, काढलेले फोटो, सेल्फी, सोशल नेटवर्किंग मध्ये टाकलेले पोस्ट, फोन रेकॉर्ड, सर्च इंजिन च्या queries, बँकेतील व्यवहार या सगळया गोष्टी डेटा स्वरूपात कोठे न कोठे स्टोअर केलेल्या असतात.
इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT)* – हा भाग खूपच लक्षवेधी आहे. फक्त कम्प्युटर्स आणि मोबाईल फोन्स नव्हे तर अनेक यंत्रे आणि गोष्टी आता इंटरनेट बरोबर संलग्न होऊ लागल्या आहेत. याचाच परिणाम म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. छोट्या छोट्या गोष्टीतून तयार होणारे सिग्नल्स किंवा संकेत, इंटरनेट वरती माहिती म्हणून वापरता येऊ लागले आणि या छोट्या सेन्सर्सनी आपल्या भोवतीचं जगच बदलून टाकलं. खुल जा सिम सिम हे फक्त गोष्टीतील वाक्य नसून आता अशा परवलीच्या शब्दाने आपण आपल्या घरातील किंवा कार्यालयातील अनेक गोष्टी फक्त शब्द किंवा आपल्या हालचालीतून घडवून आणू शकतो. हे सगळे सेन्सर्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स या प्रणालीमुळे शक्य झाले आहे. स्मार्ट होम, स्मार्ट कार, स्मार्ट फॅक्टरी अशा अनेक उदाहरणांमधून IoT आणि बिग डेटा यांचा एक संयुक्त उपयोग आपल्याला बघायला मिळत. आहे. टेस्ला कंपनीची स्वतःहून चालणारी कार हे या सेंसर आणि IoT प्रणालीचे एक सर्वोच्च उदाहरण ठरेल.
या क्षेत्रातील उदाहरणे वाचली की आपल्याला थक्क व्हायला होतं. सेंसर आणि IoT यांचा वापर दिवसेंदिवस वाढत जाणार आहे.
येत्या काही वर्षात इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये डेटा निर्मिती करणार आहेत आणि या डेटाचा अभ्यास करण्याकरता अतिशय खास व्यवसायिकांची गरज भासणार आहे. अशा व्यावसायिकांना डेटा सायंटिस्ट असेही म्हटले जाईल.
अच्युत गोडबोले यांचं या विषयावरती इंडस्ट्री 4. 0 या नावाचे पुस्तक उपलब्ध आहे ज्यामध्ये या विषयावर अजून सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
ब्लॉक चेन. – क्रिप्टो करन्सी सध्या खूप वादादित असलेला शब्द आहे. क्रिप्टो करेंसी ज्या तंत्रज्ञानामुळे विकसित झाली ते तंत्रज्ञान म्हणजे ब्लॉक चेन. अकाउंटिंग च्या भाषेत सेंट्रलाइज लेजर ठेवण्यापेक्षा जर लेजर हे अनेक संगणकावरती ठेवलं गेलं आणि प्रत्येक एन्ट्री मध्ये होणारे बदल हे या सर्व संगणकावरती जर एकत्रितपणे होत गेले तर डेटा मध्ये होणारे बदल आणि त्यातून होणारे गैरवापर (फ्रॉड) हे रोखले जाऊ शकतील ही या ब्लॉक चेन मागची संकल्पना. ब्लॉक चेनचा वापर शिक्षण, उत्पादन, वितरण, सरकारी कामकाज आणि डॉक्युमेंट्स या सगळ्या क्षेत्रामध्ये होऊ शकतो.
याचबरोबर थ्रीडी प्रिंटिंग, क्लाऊड कम्प्युटिंग आणि ए आर / व्ही आर या तंत्रज्ञानाची माहिती थोडक्यात करून देण्यात आली आहे.
मोबाईल आणि इंटरनेट हे आता सर्वसामान्य माणसांच्या हातातील तंत्रज्ञान असले तरी मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटचे महाजाळे नक्की कसे चालते आणि त्यांच्या संदर्भात कोणत्या तांत्रिक गोष्टी येतात हा इतिहास ही त्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो.
इन्फोटेक विषयाची व्याप्ती खूप आहे. अनेक संकल्पना त्यात आहेत. प्रत्येक संकल्पना विस्तृत माहिती करून देणे या परिचयात शक्य नसले तरी इन्फोटेक या पुस्तकात मात्र या विषयांवर अतिशय सखोल चर्चा केली आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण तो भाग अवश्य वाचा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर सुद्धा अच्युत गोडबोले यांचा वेगळा ग्रंथ उपलब्ध आहे तोही अवश्य वाचावा.
टेक्नॉलॉजी मधलं मला काही कळत नाही असं म्हणणारे बरेच लोक असतात पण अशा पुस्तकातून इन्फोटेकच्या संकल्पनांची माहिती करून घेणे आणि त्याचा आपल्या जीवनात कसा वापर होतो हे जाणून घेणे खूप रंजक आहे. इन्फोटेकच्या जाळ्यात स्वतःला हरवून न देता त्यातून योग्य गोष्टींची माहिती करून सही सलामत बाहेर पडण्याकरता हे पुस्तक वाचणे अतिशय आवश्यक आहे.
पुस्तक परिचय : श्री सचिन केळकर
प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈