सुश्री नीला महाबळ गोडबोले
जीवनरंग
☆ घरचं… बाहेरचं… ☆ प्रस्तुती – सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆
परगावी शिकत असलेली लेक घरी आली म्हणून कौतुकानं इडली सांबाराचा बेत केला.
“काय गं आई.. तू घरी कशासाठी करतेस हे पदार्थ ? म्हणजे इडली छान असते तुझी.. पण सांबार… ते आमटीचं मावस नाहीतर चुलत भावंड होतं गं तुझं.. सांबार हॉटेलातलच खरं.. ऑथेंटिक.. आपण नं… इडली हॉटेलातच खात जाऊ किंवा हॉटेलमधून मागवत जाऊ.. ” माझा चेहरा इवलुसा झाला..
पन्नासएक वर्षांपूर्वी आमच्या मिरजेतील ‘श्रीकृष्ण भुवन’ सारख्या उडपी हॉटेलात मिळणारं इडली-चटणी-सांबार आम्हाला स्वर्गीय वाटायचं.. वर्षातून एखादे वेळीच खायला मिळणारा हा पदार्थ अमृतासमान भासायचा.. लेकरांना फार आवडते म्हणून आमची माऊली बिचारी पाट्या-वरवंट्यावर वाटून इडली करायची.. सांबार मसाला ही कल्पनाही तेंव्हा नव्हती. वाटलेलं जिरं-खोबरं घालून ती सांबार करायची.. आणि कृतार्थतेनं आम्हाला रविवारचा पूर्ण दिवस आणि सोमवारचा अर्धा दिवस खाऊ घालायची.. चमचा आणि इडली यांची झटापट करत आम्ही कसेबसे इडलीचे तुकडे तोडायचो.. नि केवळ आकाराशी इमान राखणाऱ्या त्या इडलीला आपलसं करायचो.. नंतर मिक्सर आला तरी परिस्थिती फारशी बदलली नाही..
एखादं माहेर, मेनकासारखं मासिक आणि रुचिरासारखं पुस्तक सोडलं तर नूतन पाकशास्त्राचा कोणताही गुरू नसण्याच्या त्या काळात नवीन पदार्थ असा कितीसा बरा होणार? पावभाजी, पंजाबी डिशेस यांसारखे नवनवीन पदार्थ अवतरत होते आणि “आई” नावाची जमात त्याचे प्रयोग नवरा आणि मुले या सहनशील प्राण्यांवर करत होती..
तव्यापासून विभक्त व्हायची इच्छा नसलेला तुकडा तुकडा गॅंग डोसा, लाल तवंगाच्या झणझणीत मिसळीच्या नावालाही लाज आणणारी मंद पिवळ्या रंगातील चिंच-गुळ हा चवीची परमावधी असणारा मसाला घालून केलेली… खरंतर मटकीची उसळ असणारी तथाकथित मिसळ, मुलांच्या पोटात जास्तीतजास्त भाज्या जाव्यात हा एकमेव उद्देश ठेऊन बीट, दुधी, गाजर.. एवढे अपुरे म्हणून की काय पण गवार, घेवडा वगैरे समस्त भाज्यांची मांदियाळी घालून केलेला पावभाजी नामक पदार्थ… अशी किती नावे घ्यावीत.. ?
हे कमी होते म्हणून की काय.. पंजाबी डिशेसनी खाद्य रंगमंचावर प्रवेश केला.. पंजाबी भाजी बनवण्यापूर्वी… एवढं तूप, पनीर हृदयाला चांगलं नाही, कांदा-टोमॅटोच्या भाऊगर्दीत भाज्यांची चव काय लागणार.. असा संशयकल्लोळ पदराला खोचून केलेलं बटरपनीर, पालकपनीर पंजाबपेक्षा महाराष्ट्राकडचंच वाटायचं..
आईची एखादी मैत्रीण पुण्या-मुंबईहून यायची नि आईला रव्याचा केक, आईस्क्रीम, मॅंगोला असले शहरी फॅन्सी पदार्थ शिकवून जायची.. पुढचे काही दिवस केक नामक रव्याचा टुटीफ्रुटी घातलेला शिरा, चमच्याला शिरकाव करू न देणारी बर्फ नि दूध यांची आईस्क्रीमनामक जोडगोळी.. जर्द पिवळ्या आकर्षक रंगाचं मॅंगोला नावाचं एकाच वेळी मिट्ट गोड, आंबट नि कडु अशा चवींचं (अ)पेय… अशा पदार्थांची स्वयंपाकघर नावाच्या स्थळी प्रयोगशाळा उघडली जायची…
हे पदार्थ बनवतानाचा आईचा सळसळता उत्साह.. पोरांना नवनवे पदार्थ खिलवायची उमेद… आणि मोठ्यांना उलटून बोलणे हे महापातक असण्याचा तो काळ पाहता, पदार्थ कसाही झालेला असला तरी आम्हा पोरांची त्याविषयी बोलण्याची प्राज्ञा नसे.. !! आम्ही बापुडे तो पदार्थ चेहऱ्यावर हसरे भाव ठेऊन जिभेला बायपास करून डायरेक्ट पोटात ढकलत असू..
” हे काय करून ठेवलय.. ? ” या वडिलांच्या तिरसट प्रश्नामुळे आईच्या दुखावलेल्या अंत:करणावर आमचे हसरे चेहरे औषध ठरत… !!
प्रत्येक पदार्थात कमी तेल-तूप, बेताचं तिखट नि मसाले, सोड्याचा कमीत कमी वापर, भाज्यांचा नि कडधान्यांचा वर्षाव करून पदार्थाला कमीत कमी चमचमीत नि जास्तीत जास्त पौष्टिक बनवणारी आमची आई त्या काळात आम्हाला खाद्यजीवनातील खलनायिका वाटत असे..
आम्ही मुले मोठी झालो.. आम्हाला फुटलेली शिंगे आम्हाला नाही तरी आईला दिसू लागली..
“अगं तू कशाला त्रास घेतेस.. आम्ही बाहेरच खाऊ.. ” असे मधात घोळवलेले शब्द आईच्या तोंडावर फेकून आम्ही हॉटेलिंगचा आनंद लुटू लागलो.. हॉटेलच्या चमचमीत आणि झणझणीत पदार्थांनी आईच्या सात्त्विक पदार्थांवर सरशी मारली…
आईने वरणभात, पोळीभाजी, पुरणपोळ्या, गुळपोळ्या… फारतर दडपेपोहे, भजी, थालीपीठ, धिरडी, अळुच्या वड्या, सुरळीच्या वड्या, मसालेभात.. असले पदार्थ करावेत..
या मतावर आम्ही ठाम झालो..
“*** हॉटेलात कसली मस्त पावभाजी असते.. एकदा खाऊन बघ.. ” म्हणत पित्ताचा त्रास असणाऱ्या आईला हॉटेलात नेऊन पावभाजी खाऊ घालण्याचा बेमुर्वतपणाही केला..
नि तिखट भाजी सहन न झालेल्या आईला पावाला पाव लावून खाताना पाहून निर्लज्जपणे तिची टिंगल केली.. आज तिच्या वयाला पोहोचल्यावर ते आठवतं, डोळे आपोआप वाहू लागतात.. नि स्वत:ची लाज वाटते.. !!
माझं लग्न ठरलं.. प्रत्येक नववधुप्रमाणे अनेक स्वप्नं उराशी बाळगून सासरी पाऊल टाकलं.. “हृदयाकडचा मार्ग पोटातून जातो.. ” असल्या वाक्यांनी प्रभावित व्हायचं ते वय होतं.. भरपूर मसाले, तिखट, तेल यांची सोबत घेऊन हॉटेलच्या पदार्थांची बरोबरी करण्याचा मी आणि माझ्या समवयीन जावेनं लावलेला सपाटा.. आमच्या नवऱ्यांनी नि सासुसासऱ्यांनी कौतुक करत बिनबोभाट झेलला… !!
ती माणसेच सज्जन.. !!! कधीकधी दोघे भाऊ.. मित्रांचं निमित्त काढून बाहेरच जेवून येत.. हा भाग वेगळा… !!
“रविवारी संध्याकाळी स्वयंपाकघराला सुट्टी” अशी सकृतदर्शनी आम्हा जावा-जावांना खुशावणारी घोषणा सासऱ्यांनी केली… त्यात आमच्या पदार्थांच्या धास्तीचा वाटा किती नि आमच्या काळजीचा हिस्सा किती… हा संशोधनाचा विषय… !!
यथावकाश पोटी कन्यारत्न जन्मलं… हे रत्न त्याच कुटुंबाचा अंश असलं तरी त्यांच्याइतकं सहनशील आजिबात नव्हतं नि नाही… आठ महिन्याच्या लेकरासाठी पुस्तके वाचून केलेल्या खिमट, लापशी, सूप्स, भाज्या घालून केलेला गुरगुट्या भात, उकड अशा बेचव पदार्थांना पहिल्या चमच्याला ” फुर्र.. फुर्र… ” करून एखाद्या निष्णात फलंदाजाला लाजवेल एवढ्या लांबवर तो पदार्थ तोंडातून उडवून.. नि मामीने केलेल्या चमचमीत इडली-सांबाराला मिटक्या मारून… तिने तिचे पाळण्यातले पाय दाखवले..
माझी पोर मोठी होत होती… त्याचबरोबर माझ्यातली आईही जोमाने वाढत होती.. एक म्हण आहे, “लेकराला खाण्यापेक्षा माऊलीला खायला घालण्याची इच्छा जास्त प्रबळ असते.. ” त्यानुसार मराठी, दाक्षिणात्य, पंजाबी, चायनीज, इटालियन, कॉंटिनेंटल, चाट.. , केक्स, आईस्क्रीम्स, कोल्ड-ड्रिंक्स.. कसले कसले पदार्थ पुस्तकात वाचून, यु-ट्युबवर पाहून करायला सुरुवात केली..
कोविडच्या काळात तर विचारूच नका.. !! मऊ झालेल्या चिकट नूडल्स, लसणाचा व मिरचीचा कमीत कमी वापर केल्याने बेचव झालेलं मांचुरियन, केवळ घरी करायच्या अट्टाहासापोटी जन्माला घातलेला कसातरी पिझ्झा…. जाऊदे… नावं तरी किती घ्यायची? यांचा एक घास घेऊन जेवणाला रामराम ठोकणारी माझी लेक पाहिली की माझ्यातलं मातृत्त्व चारी मुंड्या चीत होतं… !!
“आई, हे पदार्थ घरी नाही चांगले होत.. हॉटेलातलेच चांगले लागतात गं..
तू घरी कशाला व्याप करतेस? तू आपले मराठी पदार्थ.. फारतर डोसे, पराठे घरी करत जा… पावभाजी, पंजाबी, कॉंटिनेंटल, इटालियन आपण कधीतरीच खाऊ.. पण हॉटेलमधेच खाऊ.. उगीच हे पदार्थ घरी करून दुधाची तहान ताकावर कशाला भागवायची?” असं ती जेंव्हा कोणताही संदेह न ठेवता स्पष्टपणे सांगते तेंव्हा परीक्षेत नापास झाल्यासारखं वाटतं…
माझं कुठे चुकत असेल? मी एवढ्या मायेनं नि निगुतीनं पदार्थ करते.. अगदी हॉटेलसारखा करायचा प्रयत्न करते.. तरीही तो हॉटेलसारखा होतच नाही आणि हिला आवडत नाही..
कुठे चुकत असेल माझं? विचार केला.. केला.. नि लक्षात आलं… पदार्थ करताना माझ्यातली आई, बायको, जीवशास्त्राची विद्यार्थिनी सतत आड येते. तेल-तूप, लोणी, पनीर, चीज घालताना हृदय नि रक्तवाहिन्यांचं जाळं डोळ्यासमोर दिसू लागतं. साखरेचा डबा कॅलरीचा हिशोब नि मधुमेहाचं दर्शन घडवतो.. तिखट, मिरच्या, मसाले.. पोटात खड्डे पाडतात.. त्यांच्या दर्शनानंच पोटात जाळ पेटल्याचा भास होतो.. अजिनोमोटो, खाद्यरंग वगैरे कधीही शरीरात कॅन्सरला जन्माला घालतील.. हे सतत वाटत राहतं.. रेसिपीत दिलेल्या प्रमाणात तेल, तूप. तिखट, मसाले टाकायला हात धजत नाही… सगळं अगदी कमी कमी वापरलं जातं.. मग पावभाजी मिळमिळीत होते, नूडल्स चिकट होतात, पिझ्झा बेचव होतो, सांबार आमटीचा मामेभाऊ होतं, पंजाबी भाज्या पंजाबी रहातच नाहीत.. मिसळ नेभळट होते… साजुक तूप घालून केक केक न राहता मिठाईचा भाऊबंद होतो.. नि खिशालाही झेपत नाही… आईस्क्रीमचं तर न बोललेलंच बरं…
पैसा हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन रसनेला लालूच दाखवत नि शरीराला डावलत बनवलेल्या मसालेदार, चमचमीत, चविष्ट, रंगीत अशा हॉटेलच्या पदार्थांसमोर… आपल्या जीवाभावाच्या माणसांचं पोषण आरोग्य, दीर्घायुष्य हेच उद्दीष्ट असणाऱ्या गृहिणीचे, आईचे….. चवीत, चमचमीतपणात मार खाणारे पदार्थ कसे जिंकतील?
आता मी ठरवलंय… फक्त. आपले साधे सरळ मराठी पदार्थ घरी करायचे.. नि पावभाजी, मिसळ, इटालियन, मेक्सिकन, चायनीज, कॉंटिनेन्टल पदार्थांसाठी सरळ हॉटेल गाठायचं… !! उगीच आपल्या हौसेची शिक्षा घरच्यांना कशाला.. ? आपणही खूश… आपली पोरंही खूश.. आणि हॉटेलवालेही खूश. नाहीतरी सरकारनं परवाच्या अर्थसंकल्पात आपल्याला एवढी सूट कशासाठी दिलीय? पैसा बाजारात फिरावा म्हणूनच नां?
एखादा पदार्थ कधीतरीच खावा… पण तो जिभेला, चवीला न्याय देऊन खावा.. केवळ टिकमार्कपुरता नको.. त्यावेळी कॅलरीज, पोट, हृदय… सगळं बाजूला ठेवावं.. नि जिव्हालौल्य मनमुराद उपभोगावं.. !!
आता तुम्ही म्हणाल ‘ आमची मुलं नाहीत हो अशी… आणि मीही नाही तशी.. मी अगदी चविष्ट बनवते आणि माझ्या मुलांना ते फार आवडतं बरं का… !! माझ्या स्वयंपाकाचं फार कौतुक होतं घरात.. ‘
तसं असेल तर चांगलंच आहे.. पण मग मला एकच सांगा.. हॉटेलं भरून का वाहतात ?
© सुश्री नीला महाबळ गोडबोले
सोलापूर
फोन नं. 9820206306, ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈