सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
गुंडीचं उडुपी हॉटेल –
श्रीवर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या या अन्नदान उपक्रम मुळे माझे मन मागे मागे अगदी जुन्या पुण्यात पोहोचलो आणि डोळ्यासमोर आलं ते गुंडीचं उडुपी हॉटेल सकाळ ऑफिस कडे जाणारा श्री जोगेश्वरी च्या जवळचा बोळ म्हणजे चालू करांचा बोळ. ‘बोळ’ हा त्यावेळचा परवलीचा शब्द होता. कारण तिथून पुढे वेश्यावस्ती लागत होती पानाचा तोबरा काजळ, केसांचे फुगे, रंगीबेरंगी साड्या, लाल भडक ओठ अशा त्या नेहमी नटून खिडकीत बसून असायच्या. आम्हाला तिथे जायला बंदी होती. पण का?हे काही कळायचं नाही, आणि विचारायची प्राज्ञा पण नव्हती शनिवार वाड्यावर किंवा जिजामाता बागे कडे जायला त्या बोळा चा शॉर्टकट होता. एकदा हिम्मत करून आम्ही मैत्रिणी तिथून गेलो आमचे भेदरलेले चेहरे बघून त्या हंसायला लागल्या हातवारे करून डोळे मिचकावून आम्हाला जेव्हा त्या बोलवायला लागल्या नां तेव्हा अहो!आमचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली एका दमात आम्ही तो बोळ ओलांडला. शालू करांच्या बोळ्याच्या तोंडाशी असलेल्या गुंडीच्या हॉटेलमध्ये त्या बायका राजरोस पणे शिरायच्या. जोगेश्वरीच्या खिडकीतून आम्ही चोरून बघायचो. चहा पिऊन बनपाव खाऊन पैसे न देता बेधडक त्या बाहेर पडायच्या. नवलच वाटायचं बाई आम्हांला! पै न पै वसूल करणारे हॉटेल मालक हात चोळत बसायचे. आणि तो तांडा गेल्यावर त्यांचा उद्धार करून डोळे गरागरा फिरवायचे. आमच्याकडून मात्र एका गोळीचे पाच पैसे पण सोडायचे नाहीत असं वाटायचं वाचले तर ते पाच पैसे उद्या उपयोगी पडतील. कधी कधी तर गोळी घेऊन पाच पैशाचं गाणं मुठीत आवळून पैसे न देता पळायचा आमचा विचार असायचा, हे लक्षात आल्यावर मालक ओरडायचे, “ए चाललात कुठे? गोळीचे पैसे टाका. पैसे कुणी द्यायचे तुमच्या काकांनी की मामांनी?त्या बायकांना सूट देणारे मालक आपल्याला गोळ्या फुकट का देत नाही या विचारांनी नाक फुगवून पाय आपटत आम्ही हॉटेलच्या पायऱ्या उतरायचो. गुंडी बारा महिने बंडी (जाकिट) घालायचे. अस्सा राग यायचा त्यांचा. सुरेश माझा भाऊ जरा बंडं होता. तो म्हणाला एक दिवस मी या गुंडी मालकांच्या बंडीचं बटणचं तोडणार आहे त्यावेळच्या पोरकटपणाचे आता हसू येतयं. ज्येष्ठ नागरिकात जमा झालेले आम्ही म्हणजे मी आणि सुरेशपरवा ह्या आठवणीने पोट धरून धरून हसलो. पण बरं का मंडळी! आमच्याकडून पैन पै वसूल करणारे गुंडी तसे सत्पात्री दान देणारेही होते. दुकान उघडल्यावर पहिला चहाचा कप दाराशी आलेल्या भिकाऱ्याला ते द्यायचे आणि नंतर भटक्या कुत्र्यांसाठी पावाची लादी मोकळी करायचे. ते पुढे आणि कुत्री त्यांच्या मागे हा सीन बघितल्यावर आम्ही म् ओरडायचो, ” अरे ते बघ दत्त महाराज चाललेत. त्यांचा हा नेम कधी चुकला नाही. आम्हाला कंजूष वाटणारे श्री गुंडी कुत्र्यांना देवासारखे वाटायचे. जोगेश्वरी च्या परिसरात प्रत्येकाच्या अंगात काही ना काही देण्याची दानत होती. सुवासिनी सणावारी आवर्जून मंदिरात येणाऱ्या गरीब ब्राह्मणांना पोटभर जेवायला घालून वस्त्रदान दक्षिणा देऊन संतुष्ट करायच्या. नवरात्रात माझ्या आईकडे तर नऊ दिवस सवाष्ण असायची. गरिबी असली तरी घासातला घास मुंजा, ब्राह्मणांसाठी गाईसाठी पण बाजूला काढला जायचा. श्रावण, भाद्रपद, अश्विन महिन्यात तर दानशूरतेचा कळस गाठला जायचा, कुमारीका सवाष्णी श्रीजोगेश्वरीच रूप समजून पुजल्या जायच्या आणि मायेची सावली ती जोगेश्वरी माता अनेक रूपातून अनेकांना दर्शन देऊन तृप्त करायची. अगदी खरं आहे हे! जोगेश्वरीची लीला तिचा महिमाच अघाध आहे. जय अंबे जय जोगेश्वरी माता की जय
– क्रमशः…
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈