इंद्रधनुष्य
☆ अन्नाची नासाडी नकोच… लेखक/लेखिका : सुश्री सविता भोसले / श्री सुनील इनामदार ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆
☆
लग्नाचे मस्त रिसेप्शन सुरू होते. लोक रांगेमध्ये नवरदेव- नवरीला शुभेच्छा देत… भेटवस्तू देत…. फोटो काढत…. पुढे पुढे सरकत होते. झाल्यावर जेवणाचा मस्त आस्वाद घेत होते.
“अरे.. अरे…. हे काय करतोस? चक्क नोट फाडतोस. “
असा मोठाsss आवाज झाल्यामुळे, हॉलमधील सर्वांनीच स्टेजकडे वळून पाहिले. काहींना कसला गोंधळ आहे… तो कळेच ना… म्हणून सर्वजण स्टेज जवळ जमा झाले.
“अरेssss नकुल ! काय करतोयस तू? चक्क पाचशेची नोट फाडली! हा माझा अपमान आहे. असं कोणी करता का?”
असं म्हणून त्या जवळच्या नातेवाईकाने, नवरदेवाशी भांडायला सुरुवात केली. तेव्हा हॉल मधे कुजबूज सुरू झाली. त्यांच्या भांडणावरून एवढे कळाले की,
भेट म्हणून आलेले पैशाचे पाकीट तिथेच फोडून त्यातील पाचशेची नोट सर्वांसमोर फाडली होती. हे सर्व पाहून उपस्थितांना मोठा धक्का बसला. कारण नवरदेव.. नकुल… हा अतिशय समजूतदार मुलगा होता. तो असे काही करेल; असे कुणालाही वाटले नव्हते. थोड्या वेळ शांतता पसरली. जेवणाऱ्यानीही आपले जेवण मध्येच थांबवले.
सर्वांचे प्रश्नार्थक चेहरे पाहून, नकुलने माईक हातात घेतला आणि तो शांतपणे बोलू लागला.
“मी असे केले; त्यामुळे तुम्हा सर्वांना खूप आश्चर्य आणि माझा रागही आला असेल. पण यामागेही काही कारण आहे. मी ते तुम्हाला सांगू इच्छितो. आपण सर्वजण खूप चांगले लोक आहात. छान पैकी जेवणाचा आस्वाद घेत आहात. पण मला असे आढळले की ९०% लोक आपले जेवणाचे ताट अर्धवट जेवून, जेवणाच्या ताटात बरेचसे पदार्थ टाकून देत आहेत. कुणी कुणी तर वाटीभर भाजी घेऊन, एक घास खाऊन, तशीच वाटी डस्टबिन मध्ये टाकली. असे आजच नाही तर; बऱ्याच ठिकाणी मी पाहतो. मला तुमचा अपमान करण्याचा हेतू अजिबात नाही… तुम्ही पोटभर जेवा पण अन्न वाया घालवू नका. भले गर्दी असेल तर पदार्थ संपल्यावर पुन्हा रांगेत उभे राहावे लागते; पण फार वेळ नाही लागत हो! एकदम वाढून घेतल्याने अंदाज येत नाही. म्हणून अन्न तसेच टाकून दिले जाते. आज आपल्या भारतात कितीतरी जण उपाशी झोपतात. तुम्हाला मी एक ५००रुपयाची नोट फाडली तर किती राग आला!!! पण…. तुम्ही जेव्हा आपल्या ताटात बरेच उष्टे अन्न टाकता तेव्हा पाचशे रुपये पेक्षा जास्त किमतीचे अन्न वाया घालवत आहात;; पण ते कळून येत नाही…. आपणाला याची जाणीवही नसते किंवा जाणवत असेल तरी, दुर्लक्ष करतो का आपण? एक चपाती किंवा एक भाजी किंवा कुठलाही अन्नपदार्थ बनवण्यासाठी, ते उगवण्यापासून ते तुमच्या ताटापर्यंत खाण्यायोग्य बनवण्यासाठी… अनेक जणांचे हात लागलेले असतात. त्यांची मेहनत असते… वेळ आणि पैसा घालवलेला असतो! मग तो कोणाचा का असेना!!
‘मला कुठे खर्च येतो ?
मी कशाला काळजी करू?’
असा विचार असतों का तुमच्या मनात?
जी गोष्ट अन्नासाठी तीच पाण्याबाबत आहे.
हे तुम्हाला दर्शविण्यासाठी, मी पाचशेची नोट फाडली. आता तुम्हाला वाटेल की, तेवढ्यासाठी नोट फाडायची काय गरज? नुसतं सांगितलं असतं तरी चाललं असतं. पण काळजी करू नका! ही फाडलेली नोट खोटी होती. आणि या माझ्या छोट्याशा नाटकात माझा हा मित्रही सहभागी होता. “
असे म्हणून त्याने त्याला मिठी मारली. दोघांनी भांडण्याचे उत्तम नाटक केले होते.
हे ऐकल्यावर सर्वांनी मनापासून टाळ्या वाजवल्या. एव्हाना प्रत्येकाच्या मनात असलेला प्रश्न आणि राग निघून गेला होता.
त्यानंतर नकुलने सर्वांना शपथ घ्यायला लावली की,
“मी कुठेही.. म्हणजे
घरामध्ये…
हॉटेलमध्ये….
लग्नामध्ये….
अन्नाचा एकही कण वाया घालवणार नाही. “
त्या रिसेप्शन मधून बाहेर पडलेला प्रत्येक सुशिक्षित व्यक्ती… सुसंस्कृत होऊन घरी गेला.
प्रत्येकाला तो विचार खूप म्हणजे खूपच आवडला.
☆
लेखक : सविता भोसले / सुनील इनामदार
मो. ९८२३०३४४३४.
प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे
पुणे
मो 9420861468
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈