श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “राजं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
आई मी आता मोठा झालोय बघ.. करून येऊ दे कि मला एकट्याने जंगलची सफर… घेऊ दे कि मला शिकारीचा अनुभव… कळू दे इतर प्राण्यांना या छोट्या युवराजची काय आहे ती ताकद… जंगल राजांच्या दरबारात मलाही जायचं राजांना मुजरा करायला… आलो आहे आता तर सामिल करुन घ्या मला तुमच्या सैनिक दलात.. मी लहान कि मोठा याचा फारसा करू नका विचार तुम्ही खोलात… बऱ्या बोलानं जे तुमचा हुकूम पाळणार नाहीत… त्यांची काही मी खैर ठेवणार नाही.. जो जो जाईल विरोधात या राजाच्या त्याचा त्याचा करीन मी फडशा फडशा… मग तो कुणी का असेना दिन दुबळा वा बलवान… त्याला राजा पुढे तुकवावी लागेलच आपली मान… राजाच्या पदरी मुलुखगिरीचा होईन मी शिपाईगडी.. स्वारीला जाऊन लोळवीन ना एकेका शत्रूची चामडी.. गाजवीन आपली मर्दुमकी मग खूष होऊन राजे देतीलच मला सरदारकी… मग दूर नाही तो दिवस चढेल माझ्या अंगावरती झुल सरसेनापतीची.. बघ आई असा असेल तुझ्या लेकराचा दरारा… भितील सारी जनाता कुणीच धजणार नाही माझ्या वाऱ्याला उभा राहायला.. मिळेल मला मग सोन्या रूप्याची माणिक मोत्यांची नि लाख होनांची जहागिरी.. जी माॅ साहेब म्हणतील तुला सदानकदा कुणबिणी वाड्यात करताना चाकरी… ते दिवस नसतील कि फार दूरवर बघ यशाचे आनंदाचे नि सुखाचे आपले दारी गज झुलती.. आई मी आता मोठा झालोय बघ करू दे कि मला राजाची चाकरी… “
“अरे तू अजून शेंबडं पोरं आहेस.. अजूनही तुझं तुला धुवायचं कळतं तरी का रे… नाही ना.. मग आपण नसत्या उचापतींच्या भानगडी मध्ये नाक खुपसू नये समजलं… आपला जन्म गुलामगिरी करण्यासाठी झालेला नाही.. ताठ मानेने नि स्वतंत्र बाण्याने जगणारं रे आपलं आहे कुळ… जीवो जीवस्य जीवनम हाच आहे आपल्या जगण्याचा मुलमंत्र… पण म्हणून काही उठसुठ विनाकारण आपण दीनदुबळ्यांची शिकार करत नाही… जगा आणि जगू द्या हाच निर्सागाचा नियम आपण पाळत असतो… आणि अत्याचार कुणी करत असेल इथे तर त्याला सोडत नसतो.. पण जे काही करतो ते स्वबळावर… कुणाच्या चाकरीच्या दावणीला बांधून गुलामगिरीचं जिणं कधीच जगत नाही… त्यांनी म्हटलं पाहिजे असा कनवाळू राजा दुसरा आम्ही कधी पाहीलाच नाही… असा ठेवलाय आपण प्रेमाचा दरारा सगळ्या जंगलाच्या वावरात… म्हणून तर आजही आपलं आदरानं नावं घेतलं जात घराघरात… तुला व्हायचं ना मोठं मग हे स्वप्न तू बाळगं आपल्या उराशी… राज्यं असलं काय नि नसलं काय काही फरकच पडत नसतो आपल्याला असल्या टुकार, लबाड, विचाराशी… आपणच आपल्याला कधी राजे म्हणवून घ्यायचंय नाही ते रयतेने विनयाने, आदराने म्हणत असतात ते पहा ते निघालेले दिसताहेत ना ते आमचे राजे आहेत… समजलं…
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈