☆ ‘Busy’ असलेला आईवर्ग… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆
आजच्या ६५, ७०, ते ७५ वयोगटाचा जो आईवर्ग आहे तो प्रचंड व्यस्त आहे. खरतर हा आनंदाचा भाग आहे तरी चिडचिड होते.
आईचा योगवर्ग, भिशी, मदत सप्ताह, सत्संग, पूजा, महत्वाच्या भेटी गाठी, बँकेच्या फेऱ्या, वाढदिवस, नाटक अशी एक ना अनेक कामं यामध्ये हा आइवर्ग खूप व्यस्त असतो. आईला फोन केला तरीही वेळ बघा, तिला वेळ आहे का विचारा… आईला आपल्या घरी राहायला बोलवलं तरी तिला Time table बघून मगच एखाद दिवस वेळ असतो. इकडे आल्यावर पण मैत्रिणीचा फोन येणार, ” लेकिकडे गेलात का, उद्या येता ना पण, आपलं हळदीकुंकू ठरलं आहे. ग्रुप वर टाकलंय “
झालं.. आईची लगबग सुरू… शेवटी मला म्हणणार, तूच ये गं निवांत तिकडे रहायला..
आईला आता वेळच नाही आपल्यासाठी? हे मनात येऊन जातं. पण दुसऱ्या क्षणी वाटतं. या किती आनंदी राहतात! यांच्या ग्रुपला एकदा भेटायला गेले होते, मस्त धमाल असते. Gossip वैगेरे काही नाही, सूना बिना सगळं विसरून एक एक उपक्रम चालू असतात. हसणं, चिडवणं, गाणी म्हणणं, वाचन चालू असतं. त्यांचे ते काही तास मस्त जातात. आर्थिक स्वातंत्र्य आणि तब्येतीची काळजी घेतल्याने त्यांची सेकंड इनिंग मनासारखी चालू आहे. उगाच कुठल्याही गोष्टीत अडकत नाहीत. समविचारी, समदुःखी आणि सम वयस्कर लोकांमध्ये राहणे जास्त आनंद मिळतो.
मला आठवतं माझ्या आजीला असा ग्रुप नव्हता. मंदिरात वैगेरे थोडा वेळ जायचा. त्यामुळे सूना नणंद नातवंडं मुलं इतकंच जग. घरात तेच तेच विषय.. आर्थिक स्वातंत्र्य ही नव्हतं. पण आता काळ बदलतोय. नवे विचार येत आहेत. मोकळीक मिळत आहे हे पाहून आनंद वाटतो.
आनंदी आणि समाधानी आई पाहणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. त्यामुळे ही बिझी आई स्वीकारायला हवी. तिची वेळ पाळून तिच्या सोबत मिळतील ते आनंदाचे क्षण रहायला हवं. चला आई आता दुपारी फ्री असेल फोन करून घेते पटकन……
लेखक : अज्ञात
प्रस्तुति : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈