श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “येसूबाई” – लेखिका : सुश्री सुलभा राजीव ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : येसूबाई
लेखिका : सुलभा राजीव
प्रकाशन:उत्कर्ष प्रकाशन
चौथी आवृत्ती
पृष्ठ:४९३
मूल्य:६००/
कितीही संकटं आली तरीही खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा देणारे चरित्र! महाराणी येसूबाई!
पती छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुध्द कट शिजला. घरच्याच मंडळींनी कारस्थानं केली!सासूबाईंनी शंभुराजांना कैद करण्यासाठी सैन्य पाठवले होते!स्वराज्याचे निम्म्याहून अधिक कारभारी कारस्थानात गुंतलेले! माहेर वतनदारीसाठी विरोधात गेलेलं……… सासर आणि माहेर दोन्ही परके!तरीही संभाजी महाराजांच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या राहिल्या! नऊ वर्षांचा तो संभाजी महाराजांच्या राज्याचा झांजवती काळ, रोजच लढाई!
आप्तांच्या फितुरीने केलाला घात!पती छत्रपती संभाजी महाराजांना झालेली कैद आणि पतीची क्रूर हत्या!छत्रपती संभाजी महाराजांची जिवंतपणी आणि बलिदान झाल्यानंतरची विटंबना! रायगड स्वराज्याची राजधानी! राजधानीवर चालून आलेला शत्रू!रायगड शर्थीने झुंजायचा….. पतीच्या निधनाचे दुःख करत बसायला ही वेळ मिळाला नाही!
रायगडाचा पराभव! आणि तब्बल २९ वर्षांची कैद!ज्या स्वराज्यासाठी हे सर्व भोगलं त्यासाठी परत भाऊबंदकी आणि ताराराणी यांच्याशी कलह… तरीही येसूबाई उभ्या राहिल्या! त्यांच्यावर आलेली संकटं इतिहासातील कोणत्याही स्त्रीवर आलेली नाहीत, इतकी वाईट आणि भयंकर! तरीही त्या लढत राहिल्या… आपल्यासाठी एक आदर्श जीवन उभे राहिले…. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण प्रत्यक्ष जीवनात उतरणार ही महान त्यागमूर्ती “महाराणी येसूबाई”!
महाराणी येसूबाई!छ्त्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना कुळमुखत्यार म्हणून नियुक्त केले होते! श्री सखीराज्ञी जयति!
छ्त्रपती संभाजी महाराजांसारख्या परम प्रतापी राजपुत्रासोबत ज्यांचा विवाह झाला आणि गाठ बांधल्या गेली स्वराज्याच्या रक्षणाची! त्या सोबत येणाऱ्या अग्नीदिव्यांशी! त्यागशी आणि हौतम्याशी!
आयुष्याची २९ वर्षे कैद! त्या आधीचा गृह कलह! कट आणि कारस्थाने! पतीची, स्वराज्याच्या छत्रपतींची क्रूर हत्या! त्यात ही खचून न जाता नऊ महिने रायगड लढविणाऱ्या येसूबाई! धोरणी मुत्सद्दी आणि त्यागाची मूर्ती म्हणजे येसूबाई! पोटाचा पुत्र लहान असल्याने राजाराम महाराज यांना छ्त्रपती म्हणून अभिषिक्त करणाऱ्या त्यागमुर्ती! राजाराम महाराजांना रायगडावरून सुखरूप जिंजी कडे पाठवून देतात आणि स्वतःला मात्र जन्माची मोगली कैद!
डॉ सदाशिव शिवदे यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेली ही भव्य कादंबरी!
तब्बल ४२ संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन लिहिलेली ही कादंबरी वाचताना वाचक इतिहासाचा भाग होऊन जातो ! लेखिकेने अतिशय नेकिने आणि मेहनतीनं आणि मोठ्या कष्टानं ही कादंबरी लिहून पूर्ण केली आहे. कादंबरी लेखन चालू असतानाच लेखिका स्वतः ही कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी लढत होत्या. प्रचंड वेदना आणि भयंकर असे उपचार चालू असताना अभ्यास आणि लेखनात खंड पडणार नाही याची काळजी घेत होत्या. त्यांनी त्या दुर्धर रोगावर यशस्वी मात केली. आपल्याला ही अमूल्य अशी कादंबरी मिळाली….. नियतीशी झुंज देण्याची प्रेरणा मात्र त्यांना झुंजार येसूबाई यांच्याच जीवनातून मिळाली !२९ वर्षे कैदेत राहूनही त्यांनी हार मानली नाही! कदाचित लेखिकेच्या या परिस्थितीमुळे पुस्तकात मुद्रणदोष शिल्लक राहिले असतील असं वाटतं. हे मुद्रण दोष असूनही कादंबरीची साहित्य म्हणून जी उंची आहे ती अतिशय भव्य आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर छावा, संभाजी सारख्या मैलाचा दगड ठरलेल्या लोकप्रिय कादंबऱ्या असताना महाराणी येसूबाई यांच्या जीवनावरील कादंबरी लिहिणं खूप आव्हानात्मक काम होतं… जे लेखिकेने पूर्ण केलं आहे.
प्रत्येकाने हे चरित्र वाचून आत्मसात केलं तर आयुष्यातील संकटाना सामोरे जाण्याची तयारी होईल… लहान लहान संकटाना सामोरे जाताना मोडून पडणारी आपली पिढी खंबीर होऊन उभी राहील !
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈