वाचताना वेचलेले
☆ ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी एक छान सल्ला!…’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
☆
काटकसर जरूर करावी
चिकटपणा नको
भरभरून आयुष्य जगावं
हातचं राखून नको
*
विटके दाटके आखूड कपडे
घरी घालून बसायचे
स्वच्छ चांगले कपडे फक्त
बाहेर जाताना वापरायचे
*
कपाटं भरून ठेवण्यापेक्षा
घरातही टापटीप रहावं
राजा-राणीसारखं रूप
वास्तूलाही दाखवावं
*
महागाच्या कपबश्या म्हणे
पाहुण्या-रावळ्यांसाठी
जुन्या-पुराण्या फुटक्या
का बरं घरच्यांसाठी?
*
दररोजचाच सकाळचा चहा
घ्यावा मस्त ऐटीत
नक्षीदार चांगले मग
का बरं ठेवता पेटीत?
*
ऐपत असल्यावर घरातसुद्धा
चांगल्याच वस्तू वापरा
का म्हणून हलकं स्वस्त?
उजळा कोपरा न कोपरा
*
अजून किती दिवस तुम्ही
मनाला मुरड घालणार?
दोनशे रुपयांची चप्पल घालून
फटक फटक चालणार?
*
बॅलन्स असून उपयोग नाही
वृत्ती श्रीमंत पाहिजे
अरे वेड्या जिंदगी कशी
मस्तीत जगली पाहिजे
*
प्लेन कशाला ट्रेन ने जाऊ
तिकीट नको ACचं?
गडगंज संपत्ती असूनही
जगणं एखाद्या घुशीचं
*
Quality चांगली हवी असल्यास
जास्त पैसे लागणार
सगळं असून किती दिवस
चिकटपणे जगणार?
*
ऋण काढून सण करावा
असं आमचं म्हणणं नाही
सगळं असून न भोगणं
असं जगणं योग्य नाही
*
गरिबी पाहिलीस, उपाशी झोपलास
सगळं मान्य आहे
तुझ्याबद्दल प्रेमच वाटतं
म्हणून हे सांगणं आहे
*
टिंगल करावी टोमणे मारावे
हा उद्देश नाही
तुला चांगलं मिळालं पाहिजे
बाकी काही नाही
*
लक्झरीयस रहा, एन्जॉय कर
नको चोरू खेटरात पाय
खूप कमावून ठेवलंस म्हणून
चांगलं कुणीही म्हणणार नाय
*
ऐश्वर्य भोगलं पाहिजे,
माणसाने मजेत जगलं पाहिजे…!
☆
कवी : अज्ञात
प्रस्तुती : श्री मनोहर जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈