सुश्री मीनल केळकर
इंद्रधनुष्य
☆ “चैत्रांगण…” लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
चैत्र येतो तोच एक वेगळीच ऊर्जा घेऊन. अजून वैशाखवणवा दूर असला तरी उन्हाच्या झळा जाणवायला सुरवात झालेली असते. वाराही गरम झुळका घेऊन येतो बरोबर, पण त्याच बरोबर येतात सृजनाचे सुवास, मोगऱ्याचा मंद गंध, वाळ्याची सुगंधी थंडाई, पिकत आलेल्या आंब्या-फणसांचा गोड घमघमाट आणि कडुनिंबाच्या पानांची गर्द हिरवी सळसळ. झाडांच्या पानांमध्ये, फुलांच्या सुगंधांत, आणि अगदी आपल्या मनातही काही नवंनवंसं चेतत असतं आणि अगदी ह्याच वेळेला आपल्या अंगणात उतरतं चैत्रांगण—एका प्राचीन, पण अजूनही जिवंत असलेल्या संस्कृतीची स्वस्तिचिन्हे.
माझं बालपण गोव्यात गेलं. तिथं गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही गुढी उभारायचो, आमरस, मणगणे असे गोड पदार्थ करायचो, कैरीचं पन्हं करायचो, पण चैत्रांगण कधी पाहिलं नव्हतं. त्यामुळे माझ्या आठवणीतल्या चैत्रांगणाला आई-आजीच्या बोटांचा स्पर्श नाही. मी चैत्रांगण पहिल्यांदा पाहिलं ते पुण्याला शिक्षणासाठी आल्यानंतर, एका मैत्रिणीच्या घरी. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते सावरकरांच्या स्वतंत्रता भगवतीप्रमाणे मलाही सदैव भुरळ घालत असल्यामुळे मी त्या मैत्रिणीच्या आजीला खूप प्रश्न विचारले, हीच चिन्हे का काढायची? ह्याच मांडणीत का काढायची, पाडव्याच्याच दिवशी का काढायची, वगैरे वगैरे. सगळ्या प्रश्नांची उत्तरे काही त्यांना देता आली नाहीत, पण त्या म्हणाल्या ते एक वाक्य मला अजूनही आठवतं, ‘अग, शुभ चिन्हं असतात ती, छान, उत्सवी दिसतं घर. आपली संस्कृती मुळात सौंदर्यपूजक आहे म्हणून करायचं’!
त्यांच्या ‘आपली संस्कृती मुळात सौंदर्यपूजक आहे’ ह्या वाक्याचा तर मला पदोपदी प्रत्यय येतो भारतात फिरताना. साधं केळीच्या पानावर जेवण वाढताना सुद्धा किती रंगसंगतीचा विचार करतात लोक भारतात! मातीने सारवलेल्या अंगणात काढलेलं चैत्रांगण किती सुंदर दिसतं. चैत्रांगण म्हणजे केवळ रांगोळी नव्हे—ती तर तब्बल ५१ शुभ चिन्हांची एक स्तोत्रमालाच आहे. गौरी-शंकर किंवा विठोबा-रखुमाई, गणपती, गुढी, भगवा ध्वज, आंब्याच्या पानांचे तोरण, शंख, चक्र, गदा, पद्म, सरस्वती, गाय-वासरू, नाग, मोरपिस, बासरी, ओंकार, स्वस्तिक, गो-पद्म, गरुड, हत्ती, तुळस, शिवलिंग, कैरी, केळीचे झाड, कलश, हळद कुंकवाचे करंडे, त्रिशूळ, परशू, चंद्र-सूर्य, फणी, आरसा, कासव, सनई-चौघडे, कमळ, धनुष्यबाण, पाळणा. प्रत्येक चिन्हाला काहीतरी अर्थ आहे, प्रत्येकामागे एक कथा आहे. कुठे पावित्र्य आहे, कुठे शांती. कुठे मांगल्य आहे, कुठे समृद्धी, कुठे निसर्गाचं गूढ सौंदर्य, तर कुठे संस्कृतीची स्वस्तीचिन्हे, कुठे दैवी वरदहस्त तर कुठे आपल्याच माणूसपणाची ओळख.
ह्या मागची कथा शोधताना मी कुठेतरी अशी कथा वाचली की देवी गौरीने स्वतः पहिल्यांदा ही चिन्हं रेखाटली—शंकराच्या मनातली वादळं शांत करण्यासाठी. किती सुंदर कल्पना! आपल्या हातून, आपल्या नजरेतून, आपल्या मनातून निर्माण होणाऱ्या या शुभ प्रतिमा म्हणजे देवत्वाचं, मातृत्वाचं आणि पती-पत्नींच्या प्रेमाचं प्रतिक आहेत हा विचारच किती देखणा आहे.
माझी मुलं लहान होती तेव्हा मला मदत करायला ज्योती नावाची एक मुलगी मदतनीस म्हणून होती. तिच्या बोटात विलक्षण कला होती. तिला खूप हौस होती म्हणून ती होती तोपर्यंत दोन-तीन तास खपून पाडव्याला चैत्रांगण काढायची. माझी चित्रकला दिव्य असल्यामुळे ह्या कामात केवळ तिची मदतनीस म्हणून तिच्या बाजूला बसून तिला हवे ते रंगांचे डबे उघडून देणे इतकंच माझं काम होतं. पण ती इतकी तल्लीन होऊन चैत्रांगण काढायची की ती स्वतःच एक चित्र वाटायची. तिच्या बोटांमधून सरसर झरणाऱ्या पांढऱ्या पिठाच्या रेघा पाहताना मला सतत जाणवायचं, चैत्रांगण म्हणजे फक्त कला नाही, ती एक नम्रपणे केलेली प्रार्थना आहे.
ही शुभचिन्हे काढताना ती काढणारी व्यक्ती काही मागत नाही—फक्त जोडत राहते स्वतःला, भारतीय संस्कृतीच्या प्राचीन प्रवाहाशी, निसर्गाशी, देवत्वाशी, माणसांशी आणि स्वतःतल्या मूळ कोंभाच्या शांततेशी. आजच्या या धावपळीच्या जगात, ज्योतीला रांगोळी काढण्यात तल्लीन झालेलं पाहिलं की मला हेवा वाटायचा तिचा थोडा, वाटायचं असे काही मंतरलेले, भारलेले क्षण असेच जपून ठेवायला हवेत. एक छोटीशी चंद्रकोर रेखताना, तुळशी वृंदावन साकारताना ती जणू काळालाच थांबवत होती त्या काही क्षणांपुरती.
आता माझ्याकडे ज्योती नाही, आणि माझ्या हातात तिच्यासारखी कला नाही, पण माझ्यासारख्या कलाकार नसलेल्या व्यक्तींसाठी, आजकाल चैत्रांगणाच्या रांगोळीचे साचे मिळतात—त्यातूनही ही परंपरा टिकवता येते. फरशी मातीने सारवताना मऊसूत कालवलेल्या मातीचा तो मायाळू स्पर्श, साचे उमटवताना हळूहळू त्या तांबड्या कॅनव्हासवर उमटत जाणाऱ्या तांदळाच्या पीठाच्या रेघा आणि त्या पांढऱ्याशुभ्र रेघांमधून हळूहळू साकार होणारी शुभ चिन्हं—एकामागोमाग एक अशी उमटताना बघणं हाही एक विलक्षण सौंदर्यपूर्ण आणि शांतवणारा अनुभव आहे.
चैत्ररंगण म्हणजे रेषांनी गुंफलेली प्रार्थना आहे. ती केवळ चैत्रगौरीसाठी नसते, ती आपल्यासाठीही असते – आपल्या आतल्या अस्वस्थतेला, गोंधळाला, आणि कोलाहलाला शांत करण्यासाठी.
लेखिका : सुश्री शेफाली वैद्य
प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈