सौ राधिका भांडारकर
☆ माझी जडणघडण… वासंती – भाग – ३७/१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
वासंती – भाग -१
गुलाब मावशीचा ज्येष्ठ सुपुत्र, पप्पांचा मावसभाऊ आणि माझा काका ज्याला आम्ही “भाऊ” अशी हाक मारत असू. आमचा आणि गुलाबमावशीचा परिवार हा संयुक्त परिवारासारखाच होता. एकमेकांच्या कुटुंबामध्ये घडणाऱ्या सर्वच चांगल्या- वाईट, सुख- दुःखांच्या घटनांमध्ये आमची खोलवर गुंतवणूक असायची. “भाऊचं लग्न” ही एक अशीच घटना होती की ज्यामुळे औत्स्युक्य आणि चिंता आमच्या घरात पसरली होती. औत्स्युक्य अशासाठी की आता भाऊचे लग्न होणार घरात सून येणार, काकी मामी येणार, काहीतरी कौटुंबिक बदल घडणार म्हणून आणि चिंता अशासाठी की भाऊ कोणतीच मुलगी पसंत करत नव्हता. त्याला सुंदरच मुलगी हवी होती बायको म्हणून. तसा भाऊसुद्धा गोरा, देखणा होताच. हसरा, मिस्कील होता. त्याचे शिक्षण मात्र तुलनेने कमी होते. खरं म्हणजे तो हुशारही होता, त्याचं गणित फार चांगलं होतं शिवाय आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय घटनांचे त्याला ज्ञान होते. त्यावर तो सफाईदारपणे बोलू शकायचा. आपली मते मांडू शकायचा पण तो शिकू शकला नाही कारण त्याच्यावर अचानक कुटुंबाचा आर्थिक भार पेलण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच्यावर पाठच्या दोन भावांचे शिक्षण आणि भविष्य घडवण्याची जबाबदारी होती. भाऊ तसा कर्तव्यदक्ष होताच आणि त्याचे त्याच्या भावांवर अपार प्रेम होते. , ज्या संधी आपल्याला मिळाल्या नाहीत त्या भावांना मिळाव्यात ही त्याची मनापासून इच्छा होती आणि तशी त्याची धडपड होती आणि खरोखरच त्याने त्यासाठी त्याची स्वतःची घडण बाजूला ठेवून आई-वडिलांच्या संसाराची जबाबदारी कर्तव्यपरायणतेने खांद्यावर पेलली.. त्यात तो यशस्वी झाला. सत्यरंजन ज्याला आम्ही “पपी” म्हणत असू आणि सुभाष ज्याला आम्ही “बाळू” म्हणत असू, त्या दोघांची शिक्षणं विनाअडथळा पार पडली. दोघांनाही उत्तम पगाराच्या नोकऱ्याही मिळाल्या. “पपी” तर शिक्षण आणि नोकरीत अधिक सरस ठरला. भविष्यात त्याला अनेक संधी उपलब्ध झाल्या. हे फक्त “भाऊ” मुळे शक्य झाले याची जाणीव मात्र दोघांनाही होती. भाऊ जरी जिथे होता तिथेच राहिला पण त्याची कारणे या दोघांनी कधीही स्मृतीआड केली नाहीत. त्यांनी भाऊविषयी सदैव आदरच बाळगला.
मग लग्न ठरवताना आज पर्यंत स्वतःसाठी कुठलंही स्वप्न न पाहणाऱ्या भाऊने सुंदर मुलीशी विवाह करायचा निर्धार केला तर गैर काय होते? म्हणूनच सारे जण याबाबतीत.. जरी ही बाब फारशी कुणाला रुचत नसली तरी भाऊसोबत राहिले.
भाऊने अक्षरश: नव्व्याणव मुलींना नकार दिले. कोण सावळी, कोण बुटकी, कुणी अधिक उंच, कुणाचे दात किंचित पुढे, कोणाचे केस पातळ, कुणी जाडी कुणी लुकडी अशा विविध कारणांनी भाऊने धडाधड विवाहयोग्य वधूंवर फुल्या मारल्या. माझे पप्पा आणि आप्पा (भाऊ चे वडील) कधी कधी त्याला समजावण्याचा प्रयत्नही करायचे.
“अरे या मुलीला नाकारतोस? काय खोड दिसते तिच्यात तुला? शरीरयष्टी थोडी किरकोळ आहे पण लग्नानंतर होईल की ती भरदार आणि शिवाय तिचे वडील सचिवालयात मोठ्या पदावर आहेत. नाही म्हटलं तरी तुझ्यासाठी ते फायद्याचे ठरू शकते. तुलाही ते पुढे आणतील.”
पण या कशाचाही होकारार्थी परिणाम भाऊवर व्हायचा नाही. झालाही नाही.
भाऊची स्त्रीसौंदर्यविषयीची नक्की काय कल्पना होती तेच कुणाला कळत नव्हते. सारेच हैराण होते. जिजी मात्र म्हणायची, ” योग यावा लागतो. वेळ आल्याशिवाय काही घडत नाही. आता भाऊ साठी मुली बघूच नका, ”
कधी कधी ती असेही म्हणायची, ” बघ हं भाऊ! “चापू चापू दगड लापू” असं व्हायचं तुझ्या बाबतीत,”
पण जिजीचे पहिले म्हणणे खरे ठरले. अखेर भाऊचे लग्न जुळण्याचा योग आला. वासंतीला भाऊने बिनतक्रार, कसलीही खोड न काढता क्षणात पसंत केले. वासंती ही शंभरावी मुलगी होती आणि भाऊच्या स्त्रीसौंदर्य कल्पनेत ती १००% उतरली. दोघांनीही एकमेकांना पसंत केले आणि भाऊचे लग्न जमले. गंगेत घोडं नहालं!
मोरेश्वर ढगे (मला नक्की नाव नीट आठवत नाही) यांची वासंती ही ज्येष्ठ कन्या. तिला अनिल नावाचा एकच भाऊ होता. वासंतीची आई जाडजूड, लठ्ठ, चष्मेवाली, थोडं अंगाशी सैल झोळ असलेलं नऊवारी लुगडं नेसणारी पण बोलण्यात स्पष्ट, ठणठणीत आणि काहीशी चतुर, चौकस होती. त्या मनाने वासंतीचे वडील मात्र शांत, गरीब, सरळ स्वभावाचे वाटले. अनिल उंच, मिस्कील आकर्षक असला तरी थोडासा कलंदर, बढायाखोर, उनाड असावा असा आपला एक अंदाज. अर्थात पहिल्याच भेटीत जजमेंटल कशाला व्हावे?
पण वासंती मात्र खरोखरच सुंदर होती. नाकी डोळी नीटस, रंग जरी सावळा असला तरी कांती सतेज होती. तिचे डोळे तर फारच सुंदर होते. मोठे पिंगट रंगाचे आणि पाणीदार, बोलके. केसही सरळ आणि लांब सडक. बांधा थोडा बसका आणि स्थूल असला तरी तिच्या एकूण व्यक्तीमत्वाला तो शोभून दिसत होता आणि बोलताना तिच्या पातळ ओठांची सुरेख हालचाल व्हायची. थोडक्यात काय वासंती सगळ्यांनाच आवडली. भाऊला हवी तशी मनासारखी जोडीदार मिळाली म्हणून सारेच खुश झाले. थोडं दडपण होतं ते म्हणजे गुलाबमावशीच्या स्टेशन रोडवरच्या राहत्या घराचं. घराला काहीच रेखीवपणा, सुविधाबद्ध आराखडा नव्हता. मुळात शयनगृह हा प्रकारच तिथे नव्हता. कशाही एकमेकांना जोडलेल्या, अर्थहीन, हेतूशून्य खोल्या. पाठीमागच्या बाजूने जिना उतरून खाली गेल्यावर कॉमन पद्धतीचे संडास तेही त्यावेळच्या टोपली पद्धतीचे. कॉमन अशासाठी की खालच्या मजल्यावर एक दोन भाडोत्री राहत होते आणि त्यांच्यासाठी वेगळी सोय नव्हती.
वासंती ही मुंबईत ग्रँटरोड सारख्या भागात राहणारी. त्यांचंही घर मोठं नसलं तरी मुंबईच्या वेगळ्याच शहरी वातावरणात वाढल्यामुळे त्यांच्या जीवन पद्धतीत फरक नक्कीच होता पण लग्न जमण्याच्या आनंदात काही बाबी किरकोळ ठरतात किंवा “पुढचं पुढे बघू” अशा सदरात जाऊन बसतात हेही तितकंच खरं.
वासंती आणि भाऊचे लग्न झाले. “लक्ष्मी नारायणाचा जोडा जणूं” म्हणून सारे नावाजले. दोन्ही कुटुंबात आनंदी आनंद होता. गृहप्रवेशाच्या वेळी वासंतीने लाजत मुरकत सुरेख शब्दांची गुंफण करून नावही घेतले. भाऊ तर काय हवेतच होता.
जिना चढून वर आल्यानंतर झोपाळा असलेल्या बाहेरच्या जागेच्या उजव्या बाजूच्या काहीशा काळोख्या खोलीचे रूपांतर भाऊ आणि वासंतीच्या शयनगृहात झाले. पूर्वी त्या खोलीतून पापड लोणच्याचे वास यायचे पण आता पावडर, परफ्युमचे सुगंध यायला लागले. काही आधुनिक, छान छान वस्तू तिथे दिसू लागल्या, सुंदर चादरी, पडदे झळकले. एक वेगळाच साज त्या खोलीला चढला आणि हे सारं केवळ वासंतीमुळे.
शक्यतो तिच्या आवडीनिवडी जपण्याचा भाऊ बऱ्याच वेळा रिकाम्या खिशाचा विचार न करता प्रयत्न करायचा. घरात वापरायची एक खोली नकळतपणे कमी झाली तरी बाकीच्या सर्व सदस्यांनी सांभाळून घेतले. याच घराच्या माळ्यावरच्या दोन खोल्यात कुमुदआत्या आणि तिचे कुटुंब राहत होते. गुण्यागोविंदाने सारे नांदत होते. सारी प्रेमाची, अत्यंत घट्ट जुळलेली नाती. याच नात्यात वासंती नावाचा एक नवा धागा सुंदर रित्या विणला जावा हीच साऱ्यांची अपेक्षा असणार ना? पण तसे झाले नाही. का? कुठे बिनसले? नक्की काय चुकले? कलहाची सुरुवात कशी कधी झाली हे कळलंच नाही. भाऊने पसंत केलेली शंभरावी, सुंदर वासंती आज पर्यंत ज्या कुटुंबात फक्त प्रेमाचीच कारंजी उसळली, एकमेकांसाठी कठीण परिस्थितीतही सारी भक्कमपणे उभी राहिली त्या कुटुंबात वासंतीचे अस्तित्व एका उसवू पाहणाऱ्या ठिगळासारखे जाणवायला लागलं.
क्रमशः भाग ३७ / १
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈