श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ “का??…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
“ का? ”
रात्रीचे साडे अकरा वाजले तरी श्रीकांत लॅपटॉपवर काम करत होता. रूमचा लाइट पाहून आईनं दार वाजवलं.
“आई, काय काम आहे. झोप ना”नेहमीप्रमाणे श्रीकांत खेकसला.
“ए, विनाकारण ओरडू नकोस”
“सॉरी!! मातोश्री. प्रोजेक्टचं काम चालूयं. ते झालं की झोपतो”
“आधी दार उघड”
“काय कटकट ये”चडफडत श्रीकांतनं दार उघडलं.
“प्रोजेक्ट किती अर्जंट आहे”
“विशेष नाही”
“मग लवकर झोप”
“का?”
“सकाळी लवकर उठायचं आहे”
“सुट्टी आहे. मी निवांत उठणार”
“उद्या गुढीपाडवा पण आहे”
“सो व्हॉट…”
“सकाळी तुला गुढी उभारून पूजा करायचीय.”
“हे कधी ठरलं”श्रीकांत वैतागला.
“आत्ताच”
“गप ना. उगीच छळू नकोस.”
“आठ वाजेपर्यंत गुढी उभारु.”
“इतक्या सकाळी? ”जांभई देत श्रीकांत म्हणाला.
“खरंतर सात वाजताच उभारली पाहिजे पण उशीर झालाय म्हणून तुला सवलत. ओके!!”
“नॉट ओके, मला एक कळत नाही जर संध्याकाळी काढूनच टाकायची तर गुढी उभारायची कशाला?”
“शास्त्र असते ते! ! ”आई हसत हसत म्हणाली.
“बघ. तुझ्याकडे उत्तर नाहीये आणि हसलीस म्हणजे माझं म्हणणं तुला पटलं.”
“अजिबात नाही. आपला सण परांपरेनुसारच साजरा करायचा.”
“गुढी उभरण्या मागंच लॉजिक काय?”
“तू नवीन पिढीतला आजच्या भाषेत बोलायचं तर झेड जनरेशन मधला ना..”
“त्याचं इथं काय संबंध?”
“तुम्ही लोक खूप हुशाssssssर. मग गुढीचं उभरण्यामागचं लॉजिक गुगल कर. चॅट जीपीटी ला विचार.”
“ते तर करणारच आहे. सकाळी तुला सांगतो!!” श्रीकांत.
“चला त्यानिमित्तान तुला सणांची माहिती होईल.”
“येस. माहिती असणं केव्हाही चांगलं ना. नवीन पद्धतींचा स्वीकार करावा. स्वतःला अपडेट करावं”
“शंभर टक्के मान्य पण हा सिलेटीव्ह अप्रोच नको.”
“म्हणजे”
“सोकोल्ड मॉडर्न आणि झेड जनरेशनमध्ये भारतीय सणांना नावं ठेवण्याचा ट्रेंड आहे. प्रत्येक सणाविषयी काही ना काही तक्रारी असतातच. हे कशाला? असंच कशाला? हेच का करायचं? वगैरे वगैरे…”
“अच्छा म्हणजे प्रश्न विचारायचे नाहीत. ”श्रीकांत.
“जरूर विचारा परंतु १४ फेब्रुवारी, ३१ डिसेंबर, वर्षभर साजरे केले जाणारे ‘डे’, त्याच त्या पार्ट्या आणि अजून काही.. साजरे करताना चकारही शब्द तोंडातून निघत नाही मात्र भारतीय सणांमध्येच लॉजिक शोधता. माझा आक्षेप त्यावर आहे.”
“कुठचा विषय कुठं नेतेयेस”
“बरोबर बोलतेय. सणवार आले की हे कशासाठी? का? असं तुझ्या तोंडून बऱ्याचदा ऐकलयं.”
“परत तेच. यात काहीच चुकीचं नाही. तुझ्याकडे उत्तर असेल तर कनव्हीन्स मी.”
“मला एवढचं सांगायचं की सरसकट नावं ठेवणं सोप्पंयं त्याऐवजी आपले सण, ते साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती याविषयी नीट माहिती घे. मग बोल. खात्रीने सांगते की प्रत्येक ठिकाणी लॉजिक सापडेल. ” श्रीकांत विचारात पडला.
“आई, यावर नंतर बोलू. आता रात्र खूप झालीय. तू म्हणशील तसं करतो. सकाळी सातला गुढी उभारू हॅपी!! ”
“ठीकयं पण आधी माहिती घे आणि मनापासून वाटलं तर कर उगीचच जुलमाचा रामराम नको.” आई
“दोन्ही बाजूनं कसं काय बोलतेस”
“बोलाव लागतं. विनाकारण सणांना टार्गेट केल्यावर राग येणारच.”
“आय एम सॉरी! ! तुला दुखवायचं नव्हतं”
“प्रश्न माझ्या दुखवण्याचा नाहीये. झपाट्यानं बदलणाऱ्या जगात सगळंच तात्पुरतं झालेलं असताना वर्षानुवर्षे हे सण, परंपरा आजही उत्साहात, जल्लोषात, आनंदात साजरे केले जातात. ही बाब खरंच अभिमानाची आणि कौतुकास्पद आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे झोप आता, बाकी उद्या बोलू. गुड नाइट”.
बरोब्बर सात वाजता अत्यंत उत्साहात श्रीकांतनं गुढी उभारली तेव्हा आईच्या चेहऱ्यावर प्रचंड कौतुक होतं. श्रीकांतनं कडुलिंबाचं एक कोवळ पान खाल्लं अन एकेक आई-बाबांना दिलं.
“अरे वा, गुढीपाडव्याचा अभ्यास केलेला दिसतोय.” आई
“हो, थॅंकयू आई”
“तुलासुद्धा थॅंकयू”
“का?”
“माझं ऐकलं म्हणून”आई.
“तुझं ऐकल्यानं माझाच फायदा झाला. पाडवा म्हणजे गुढी अन गोड पदार्थाचं जेवण आणि सुट्टी एवढचं माहिती होतं. आपलं बोलणं झाल्यावर इंटरनेटवर गुढीपाडव्याविषयी चांगली, नवीन आणि इंटरेस्टिंग माहिती मिळाली आणि आपल्या प्रत्येक सण का? आणि विशिष्ट पद्धतीनेच साजरा करण्यामागचं लॉजिक समजलं.”
“म्हणूनच तर पिढ्या बदलल्या तरी सण दिमाखात साजरे होतायेत. ”आई.
“मी ठरवलयं की माहिती नसताना किवा अर्धवट माहितीच्या आधारे व्यक्त होणाऱ्या जमान्यात यापुढे प्रत्येक सण का? साजरा करायचा याविषयी सोशल मिडियावर लिहिणार. याची सुरुवात आजपासून…”
“चांगल्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा!! आता नवीन परंपरेचे पालन करू” आई.
“म्हणजे”
“गुढीसोबत सेल्फी तर पाहिजेच ना” लगेचच आई, बाबा, श्रीकांत तिघांनीही गुढीसोबत फोटो काढले.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈