सौ राधिका भांडारकर
☆ माझी जडणघडण… वासंती – भाग – ३७/२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
वासंती
(भाऊने पसंत केलेली शंभरावी, सुंदर वासंती आज पर्यंत ज्या कुटुंबात फक्त प्रेमाचीच कारंजी उसळली, एकमेकांसाठी कठीण परिस्थितीतही सारी भक्कमपणे उभी राहिली त्या कुटुंबात वासंतीचे अस्तित्व एका उसवू पाहणाऱ्या ठिगळासारखे जाणवायला लागलं.) – इथून पुढे
सुरुवातीला तिची दबक्या आवाजातली भाऊशी कुरबूर सुरू झाली. भाऊ दुर्लक्ष करायचा म्हणून मग मोठ्या आवाजात खोलीच्या बाहेर भांडणं आली. सारं घर हादरलं.
वासंतीला वेगळं व्हायचं होतं. तिच्या मनासारखं घर तिला थाटायचं होतं. इथे राहणं तिला अजिबात आवडत नव्हतं पण भाऊ असहाय्य होता. एक तर कुटुंबावर त्याचं अतिशय प्रेम होतं आणि दुसरा व्यावहारिक मुद्दा म्हणजे स्वतंत्र घर घेण्यापासून ते चालवण्यापर्यंत लागणारं आर्थिक सामर्थ्य त्याच्यात नव्हतं. इथे कमावणाऱ्या पाठच्या भावांच्या साथीने एकत्र राहणं नक्कीच अवघड नव्हतं. शिवाय एकमेकात जिव्हाळा होता. नाना तर्हेने त्याने वासंतीला हे पटवण्याचा प्रयत्न केला पण तिचं म्हणणं एकच, ” तुमच्याच जीवावर तुमचे भाऊ मोठे झाले ना मग आता त्यांनी तुम्ही त्यांच्यावर खर्च केलेले धन द्यावं की परत तुम्हाला! या निमित्ताने त्यांनी त्याची परतफेड करायला हवी. ” भाऊच काय वासंतीच्या या बोलण्याने सारं घर कळवळलं. वासंतीने नात्यातला सारा गोडवाच शोषून घेतला. त्यानंतर सगळंच हळूहळू तुटत गेलं. वासंतीने कुठल्याच नात्याचा, कुणाच्या वयाचा आदर बाळगलाच नाही. तिच्यासाठी ते घर, घरातली माणसं म्हणजे जणू काही एक उकिरडा होता, नरक होता. ती केव्हाही कुणालाही मनाला येईल ते जिभेला बांध न घालता, वारेमाप बोलत सुटायची. भाऊ तर तिच्यासाठी एकदम फोडणीतून बाजूला काढलेल्या कढीपत्यासारखा होता. येता जाता ती त्याला म्हणायची, ” मुलांना जन्म देताना तरी विचार करायचा? त्यांचं भविष्य घडवण्याची क्षमता नाही तुमच्यात तर कशाला संसार मांडलात? भावांचेच संसार ओढायचे होते ना आयुष्यभर! उपयोग काय हो तुमच्या हुशारीचा? पुढे येण्यासाठी काही मेहनत केलीत का? यापुढे तरी कराल का? माझ्या आई बापाने काय पाहिलं तुमच्यात कोण जाणे! अशा अडाणी, स्वार्थी कुटुंबात त्यांनी मला ढकलून दिलं! ”
मग दिवस असो, करकरीत संध्याकाळ असो, तिथे फक्त भांडण, रडणं, अबोला आणि भयाण मौनातील अमंगल, अशुभ शांतता!
एकंदरच दिघे कुटुंबाची स्वस्थता हरपली. चार भिंतीतली प्रतिष्ठा पणाला लागली. घर म्हणजे असतं एक विसाव्याचं स्थान. थकूनभागून आल्यानंतर सुखसंवाद घडवणारं ठिकाण असतं पण ते सारं उध्वस्त होत होतं. कुणालाच घरी परतावंसं वाटत नव्हतं. जिथे एकेकाळी सुखद वारे वाहत होते तिथे तप्त लाव्हा रसाचीच धग जाणवायला लागली होती. केवळ एका व्यक्तीमुळे. भाऊने पसंत केलेली ही शंभरावी सुंदर मुलगी वासंती हिच्यामुळे. वासंती आमच्या घराची खलनायिका ठरली. माणसं, नाती पर्यायाने कुटुंब पार दुभंगलं. जिजीचं दुसरं भाष्यही खरं ठरलं. “चापू चापू दगड लापू. ”अतिचिकित्सेचं कडू फळ!
भाऊचं वासंती वर फार प्रेम होतं ते जाणवायचं पण तो तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं, महत्त्वाकांक्षापूर्तीसाठी अपुरा ठरला. एक हुशार, देखणा, कुटुंब बांधून ठेवण्यासाठी धडपडणारा भाऊ अखेर व्यसनाधीन झाला. नैराश्याच्या गर्तेत लोटला गेला. वासंतीचे माहेरी जाणं, तिथेच मुलांना घेऊन महिनो नि महिने राहणं आताशा वाढलं होतं. ती माहेरच्या आधाराने भाऊला धमक्याही द्यायची म्हणे!
एकदा भाऊ माझ्या आईजवळ म्हणाला होता, ” मालू वहिनी तू आमच्या घरातली आदर्श व्यक्ती! तू तर एका श्रीमंत बापाची मुलगी पण आमच्या “जनाचा” संसार कसा छान सांभाळलास! आज “जना” जो काही आहे तो केवळ तुझ्यामुळे. जिजी आमची मावशी असूनही तू आम्हाला जवळची वाटतेस.
माझंच नशीब असं फुटकं का ग? ” तेव्हा आई त्याला म्हणाली होती, ” असं बोलू नकोस. आपल्याही काही चुका असतील. वासंतीला समजावून घेण्यात आपणच कमी पडत असू. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि वासंतीतही अनेक गुण आहेत रे! कला आहेत. दिवाळीत ती रांगोळ्या किती सुंदर काढते! तुमचे “जना” तर तिच्या हातच्या पोळ्या आणि वालाच्या बिरड्याचं इतकं कौतुक करत असतात! नीटनेटकं कसं राहावं ते तिच्याकडूनच शिकावं. संसाराच्या तिच्या काही वेगळ्या कल्पना असतील. तुमच्यातल्या मतभेदामुळे आणि भिन्न वृत्तीमुळे नात्यांमध्ये या दर्या निर्माण झाल्यात. त्या बुजण्यापेक्षा अधिक खोल होत आहेत पण अजूनही वेळ गेलेली नाही भाऊ. खरं म्हणजे तुझी जबाबदारी आहे हे सारं नीट करण्याची. सगळ्याच काही मराठी चित्रपटातल्या सुलोचना नसतात हे लक्षात ठेव. “ त्या दिवशी भाऊने आईला अक्षरश: साष्टांग नमस्कार घातला आणि तो मुकाटपणे निघून गेला.
आज मी जेव्हा या घटनांचा दुसऱ्या बाजूने विचार करते तेव्हा मला आईचे हे शब्द आठवतात. बालमनावर असे मी म्हणणार नाही कारण त्यावेळी आम्ही अर्धवट वयात होतो.. आमच्यावर हेच रुजले होते की वासंती म्हणजे भांडकुदळ, बेलाभांड, शिवराळ, घरभेदी स्त्री. प्रथम दर्शनी तिच्या सौंदर्याने प्रभावित झालेल्या आम्हाला नंतरच्या भागात मात्र ती परीकथेतील कुरूप, दुष्ट, चेटकीण भासायला लागली होती. आमच्या घरातला “वासंती” हा एक अत्यंत नकारात्मक घटक ठरला होता. जिने भाऊचं जीवन उध्वस्त केलं होतं.
पुष्कळ दिवस, महिने, वर्ष सरली. खूप बदल झाले. पपी, बाळू चतुर्भुज झाले. त्यांचे संसार मार्गाला लागले. आमच्या लाडक्या कुमुदआत्याचं निधन झालं. वासंतीचं अस्तित्व जरी ठिगळ लावल्यासारखं विसंगत होतं तरी तेही कायमस्वरूपी राहिलं. स्टेशन रोडवरचं त्यांचं घर रीडेव्हलपमेंटला गेलं आणि कालांतराने प्रत्येक भावाला स्वतंत्र दोन-तीन खोल्यांचे असे मोठे फ्लॅट्स मिळाले. वेगळं होण्याचं वासंतीचे एकेकाळचं स्वप्न अशा रीतीने पूर्ण झालं म्हणायला हरकत नाही. या व्यवहारात कुमुदआत्याच्या परिवाराची मात्र होरपळ झाली. ज्या जावयाने आप्पांवर शेकलेल्या गंभीर प्रकरणातून त्यांची सहीसलामत सुटका केली आणि आयुष्यभर पत्र्याचे छत असलेल्या माळ्यावर आनंदाने राहण्याचे पत्करले त्यांची मात्र घराच्या या व्यवहारात दखल घेतली गेली नाही हे गैर झाले. गुलाबमावशी आणि आप्पांचीही वाटणी झाली. बाळूने आणि बाळूच्या बायकोने मात्र डीमेन्शिया झालेल्या गुलाबमावशीला मरेपर्यंत सांभाळले.
वासंती बदलली की नाही माहीत नाही पण निवळली असं वाटायचं पण तरीही वासंतीची “घरभेदी” प्रतिमा कुटुंबीयांच्या मनावरून पुसली जाणं जरा अशक्यच होतं. कुटुंबाचे तुकडे तिच्यामुळेच झाले हा दगडावरचा ठसा ठरला.
माझ्या लग्नानंतर मी माहेरी आले असताना वासंतीला भेटायला गेले होते. भाऊ घरात नव्हताच पण ती होती. वयानं थकलेली जाणवत होती. तिच्या देहावरच्या लावण्य खुणा विझलेल्या दिसत होत्या. डोळ्याखालची काळी वर्तुळं त्यात भर घालत होती. तिला भेटायला जाण्याचं आणखी एक कारण म्हणजे किरण, संजय, अमिता. आम्हा सर्वांनाच त्यांच्याविषयी उपजत ओढा होता. अखेर ती आमची भावंडच होती ना!
माझं पहिलं लक्ष गेलं ते वासंतीच्या दारात रेखलेल्या सुरेख रांगोळीवर. रांगोळी.. छोटीशीच पण कलात्मक. दारावर तोरण होतं. वसंतीने माझं अगदी प्रेमाने स्वागत केलं. तिने स्वतःच्या हाताने उत्कृष्ट स्वयंपाक माझ्यासाठी रांधला होता. तिच्या हातच्या साध्या वरण-भातालाही काय स्वाद होता! मी तिला तसं म्हटल्यावर तिचे डोळे पाणावले. म्हणाली, ” तुझ्या पप्पांना मी केलेला प्रत्येक पदार्थ आवडायचा आणि ते तोंडभरून कौतुक करायचे. ”
मी काही बोलले नाही पण मला एक सहज आठवलं. त्यावेळी पप्पा वासंतीचे कौतुक करत असताना गुलाब मावशी एकदा म्हणाली होती, ” चांगलं न व्हायला काय झालय? तेल बघा केवढं घातलंंय! ” असो!
ता तो साराच भूतकाळ होता.
वासंतीकडून परतताना तिने माझी ओटी भरली. तिने स्वतः गुंफलेला मोगर्याचा गजरा माझ्या केसात माळला आणि म्हणाली, ” अशीच येत जा बरं का! पुढच्यावेळेस जावईबापूंना घेऊन ये. ”आज हे सारं तुम्हाला सांगताना, लिहिताना माझे डोळे भरून आलेत. अनेक घटनांची प्रतिबिंबे त्या पाण्यात तरळत आहेत. आयुष्याचे इतके टप्पे ओलांडल्यानंतर, नानाविध अनुभव घेतल्यानंतर, अनेक व्यक्तींचे स्वभाव, जीवनं जवळून, लांबून पाहिल्यानंतर मनाच्या पातळीवर परिपक्व झाल्यानंतर एकच वाटतं आपण कुणाही बद्दल पटकन इतके निर्णयात्मक का होतो…?
का नाही थांबत? का नाही वाट पहात?
अलिप्तपणे का विचार करू शकत नाही…?
– समाप्त –
– क्रमश: भाग ३७
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈