सुश्री मंजिरी येडूरकर
कवितेचा उत्सव
☆ आई अंगाई गातांना ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆
(आपण बाळांना नेहमीच अंगाई म्हणून झोपवतो. पण खरंच त्या बाळाला अंगाई ऐकताना काय वाटत असेल?)
☆
गोड गळ्यातील सूर लघवी
लोभस माया झोका हलवी
स्वर्ग सुखाची जाणीव काना
आई अंगाई गाताना सूर लाघवी
*
चंद्र, चांदण्या, काऊदादा अन् चिऊताई
कोण आले, कोण गेले, नाही कळले बाई
आपणही मग घेते ताना ——-
*
ठाऊक नाही गाईचे ते हंबरणे
मनी माऊचे लपलप दूध पिणे
विसरुनी जातो भूक हा तान्हा ——
*
तिन्हीसांजेला दिवा लाविता आई
भिती काळजातली दूर ही जाई
बोचे गादी, न रुचे पाळणा ——
*
आकांत मी करते, रडू कोसळते
उचलुनी घेता आपसूक हसते
ही तर जादू स्पर्शाची ना ——–
*
म्हणे लबाडा, लटक्या रागे, मांडीवर घेता
आणि कळते, खरेच आई, थकली आता
म्हणूनच झोपी जाई हा राणा ———-
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈