डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? इंद्रधनुष्य ?

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी वाहिलेले पहिले “प्रशिक्षण व रोजगार केंद्र”)

(दया, क्षमा, शांती, सहानुभूती, करुणा, माया, प्रेम या सर्वांचं मिश्रण असणारे अनेक महापुरुष आपल्याकडे होऊन गेले… या महापुरुषांनी आपले अवतार संपवताना आपल्या पाऊलखुणा मागे ठेवल्या…. यातलीच एक पाऊलखुण म्हणजे दानिश भाई शहा असावेत!) – इथून पुढे —-

पाऊस पडून गेल्यानंतरचा सुखद गारवा आणि मातीचा मंद सुवास म्हणजे दानिश भाई… दया, करुणा, प्रेम निर्माण होण्यासाठी अशांना एखादा प्रसंग किंवा व्यक्ती समोर असण्याची गरज वाटत नाही… यांचे पात्र कायम प्रेम आणि करुणा यांनीच काठोकाठ भरलेले आणि भारलेले असते…

तहानलेल्या बाळाला पाहून आईला जसा पान्हा फुटावा, तसं एखाद्या गोरगरिबाचे दुःख आणि वेदना पाहून यांच्या पात्रालाही पान्हा फुटतो… आणि मग झिरपत राहतात जिव्हाळा, माया आणि प्रेम नावाच्या भावना…! यातलंच एक नाव श्री. दानिश भाई…!!!

आता जागा मिळण्यासारखी अशक्यप्राय गोष्ट दानिशभाई मुळे शक्य झाली. दहा वर्षांची माझी फरपट थांबल्यानंतर, आता मला काय वाटत असेल, हे मी कोणत्या शब्दात, कसं सांगू ? 

आपण भविष्यात जेव्हा कधी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगार  केंद्र सुरू करू त्यावेळी तेथील प्रकल्प कसे असावेत याचा विचार खूप वर्षांपूर्वीच मी आणि मनीषाने करून ठेवला होता. आपण जे काही प्रशिक्षण आणि रोजगार देणार आहोत त्यामुळे आपल्याकडे कामासाठी येणाऱ्या लोकांच्या शरीराला कोणत्याही प्रकारे इजा होता कामा नये, आपण जे काही करू त्यामुळे प्रदूषण तर वाढणार नाहीच; परंतु अस्तित्वात असलेले प्रदूषण कमी होईल, कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल अशा व्यवसायांचे प्रशिक्षण द्यायचे, जेणेकरून गरीबातला गरीब व्यक्ती सुद्धा या व्यवसायाच्या आधारावर जगू शकतो…. असे आणि आणखीही बरेच काही निकष आम्ही ठरवले होते. त्या आधारावर खालील चार प्रकल्प या जागेत सुरू करायचे ठरवले आहे. 

  1. रस्त्यावर पडलेल्या फुलांची पावडर (चुर्ण) –

वैद्यकीय, त्यातूनही आयुर्वेदिक क्षेत्रात असल्यामुळे समजले, डोक्याला लावण्यासाठी आयुर्वेदिक तेल, विविध आजारांवर उपयुक्त असे मसाजसाठी तेल, अनेक मलम, त्वचेची निगा राखणारे क्रीम यासाठी अनेक कंपन्यांना खरोखरच्या फुलांची पावडर हवी असते. (हल्ली ऑरगॅनिक / नैसर्गिक चा बोलबाला असल्यामुळे कंपन्यांचा भर कृत्रिम रंग आणि वास (Essence) न वापरण्याकडे आहे ) हे आमच्या पथ्यावर पडले…! अशी फुले आम्ही गोळा करून त्यांची पावडर करून या कंपन्यांना विकणार आहोत.

अनेक फुलं देवाच्या दारात, मंदिराबाहेर पडलेली असतात, त्याला “निर्माल्य” म्हटले जाते…. अनेक फुलांच्या पाकळ्या, फुलविक्रीच्या दुकानाबाहेर किंवा रस्त्यावर अनेकदा उकिरड्यावर पडलेल्या असतात, त्याला “कचरा” म्हटले जाते… आपण कोणाच्या संगतीत आहोत त्यावरून आपली प्रतिष्ठा ठरते हेच खरं …! आपण “निर्माल्य” की “कचरा”… ? हे आपण कुणाच्या सहवासात आहोत त्यावर ठरते. असो. 

* आमचे भीक मागणारे लोक (तरुण मुलं) फिरून हे निर्माल्य आणि कचरा उचलतील, किलोच्या भावाने आपण तो विकत घेऊन त्यांना पैसे देऊ. 

* ज्यांना आपण बैठे काम करण्यासाठी निवडले आहे, असे आपले वृद्ध लोक फुलांची रंग आणि जाती नुसार (जात म्हणजे गुलाब, झेंडू, निशिगंधा, जास्वंद वगैरे वगैरे 😊) वर्गवारी करतील. 

* यानंतर या फुलांचे शुद्धीकरण करून त्यांना विशिष्ट तापमानात सुकवले जाईल. या प्रक्रियेत सर्व अशुद्धी (Impurities) इथे नष्ट होतील. 

* यानंतर वर्गवारीनुसार फुलांची पावडर (चूर्ण) केले जाईल. 

* स्वच्छतेचे सर्व निकष पाळून (Extremely hygienic conditions) याचे पॅकिंग केले जाईल, त्यावर स्टिकर लावले जाईल. 

यातील बऱ्याचशा बाबी मशीन वर होणार आहेत, या मशीन अत्यंत सुरक्षित आणि एका क्लिकवर चालणाऱ्या आहेत… जवळपास पाच लाखांच्या या मशिन्स आपल्याला  सेंचुरी एन्का कंपनी देणार आहे. माझे ज्येष्ठ स्नेही डॉ निलेश लिमये सर यांचा या मशीन घेऊन देण्यात सिंहाचा वाटा आहे. 

तर, आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांना प्रोफेशनली आपण हे प्रॉडक्ट विकणार आहोत, मिळालेला सर्व पैसा हा आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना रोजगार म्हणून देणार आहोत.

आपल्या या प्रकल्पात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले जात आहेत…. रस्त्यावरचा कचरा आणि निर्माल्य उचलले जाईल… (जे नदीत जाते आणि नद्या प्रदूषित होतात) कचरा आणि निर्माल्यामधून तयार होणारी लक्ष्मी… कितीतरी भुकेल्यांची भूक भागवून अन्नपूर्णा होईल… भीक मागणाऱ्या लोकांना स्वयंपूर्ण बनवून सन्मानाने जगण्याचा आशीर्वाद देईल ! 

  1. शोभेचा बुके

तुळशी बागेत खोटे परंतु अत्यंत आकर्षक मोती मिळतात, सोन्यासारख्या दिसणाऱ्या तारा मिळतात. माझी आई या सर्व बाबींचा उपयोग करून अत्यंत सुंदर असा एक बुके तयार करते. फुलांचा बुके कितीही महाग असला आणि छान असला तरी तो चार दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. माझी आई, जो बुके बनवते, त्याला फार खर्च येत नाही, दिसतो इतका सुंदर, की कुणीही प्रेमात पडावं… आणि याचे सौंदर्य किमान पाच वर्षे टिकते. 

माझ्या आयुष्यातली प्रथम शिक्षिका, प्रथम प्रशिक्षिका माझी आई… लहानपणी डोळे उघडले तेव्हा तीच दिसली होती…  तेव्हा मी तीच्या छायेखाली होतो…. आज थोडा वयाने मोठा झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा तीच दिसली… आता तीच्या छायेखाली माझ्यासारखे अनेक अभिजीत घालत आहे… या प्रकल्पात तिला आम्ही प्रशिक्षिका म्हणून येण्याची विनंती केली आहे… आईच ती… नाही म्हणेल कशी…. ? 

आईच्या मार्गदर्शनानुसार, आमच्या लोकांनी तयार केलेले बुके आम्ही सर्व लोकांना विकत घेण्याची विनंती करू. रोटरी क्लब, लायन्स क्लब तथा अन्य संस्थांना कार्यक्रमावेळी फुलांचे बुके वापरण्या ऐवजी आमचे बुके विकत घेण्याची विनंती करू. यातून जो निधी मिळेल, तो आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस दिला जाईल. 

  1. लिक्विड वॉश

कपडे आणि भांडी सोडून सर्व डाग (फरशी, किचन कट्टा, गाड्या, टॉयलेट, खिडकीच्या काचा, टीव्ही अथवा इतर वस्तूंच्या ग्लासेस, आणखीही बरेच काही) साफ करणारे लिक्विड वॉश आपले लोक या ठिकाणी तयार करणार आहेत. 

यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान आणि फॉर्म्युला मेहता सोप कंपनी यांनी आपल्याला विनामूल्य देऊ केले आहे. (ज्येष्ठ मेहता सर हे दानिश भाईंचे अत्यंत घनिष्ठ मित्र आहेत, या जन्मात तरी दोघांचे ऋण मला फेडणे शक्य नाही‌)

हे लिक्विड वॉश आपण, समाजामध्ये लोकांनी विकत घ्यावे यासाठी विनंती करणार आहोत, त्याचप्रमाणे आयटी कंपन्या, मॉल्स अशा मोठ्या संस्थांच्या हाउस कीपिंग डिपार्टमेंटला भेटून आपले लिक्विड वॉश विकत घेण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत. यातून मिळणारा निधी, आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत. 

Big Bucks या कंपनीचे मालक श्री विपुल भाई शहा यांनी सुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे. 

  1. फेकलेल्या कपड्यांपासून कापडी पिशव्या तयार करणे… प्लास्टिक पिशव्या न वापरण्यासाठी समाजाला विनंती करणे.

ज्यांना शिवणकला येते अशा वृद्धांना आपण या ठिकाणी बसवून त्यांच्याकडून कापडी पिशव्या शिवून घेणार आहोत. अंध आणि अपंग लोकांना या पिशव्या विकायला लावणार आहोत. समाजामध्ये प्लास्टिक पिशव्या न वापरण्याविषयी अपील करणार आहोत. पिशव्यांची विक्री करून, मिळणार आहे तो निधी, पिशव्या शिवणाऱ्या, पिशव्या विकणाऱ्या आणि समाजात प्रबोधन करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत.

तर असे या प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूप आहे… ! हा प्रकल्प म्हणजेच आपल्याकडे एक नवीन बाळ येणार आहे… ! बाळाचं नाव काय ठेवायचं ? बारसं कधी करायचं ? अशी आमच्याकडे लगबग सुरू आहे… 

भिक्षेकर्‍यांसाठी प्रशिक्षण केंद्र / रोजगार केंद्र सुरू करण्यासाठी जागा हवी…  हे दहा वर्षे उरात जपलेलं स्वप्न पाठलाग करून सुद्धा प्राप्त झाले नाही, मी आशा सोडली होती… जेव्हा कधी या प्रकल्पाचा विचार करायचो, तेव्हा कायम समोर काळाकुट्ट अंधार दिसायचा… अमावस्येच्या काळ्याकुट्ट रात्री सारखा ! परंतु अनेक अनाकलनीय घटना माझ्या सुद्धा नकळतपणे घडत गेल्या, आणि हे राखेत निपचित पडलेलं… विझत चाललेलं स्वप्न, नव्या जोमानं मशाल होत पुन्हा पेटून उठलं… या मशालीच्या प्रकाशाने माझे डोळे दिपून गेले… डोळ्यासमोरच्या काळ्याकुट्ट अंधारात दूरवर दिसणारा अत्यंत प्रखर आणि तेजस्वी असा हा प्रकाश म्हणजे माझ्या आयुष्याच्या मध्यरात्री उगवलेला जणू सूर्य वाटला… !

ज्या भीक मागणाऱ्या समाजासाठी आपण काम करतो, त्यांच्याही आयुष्यात असाच काळाकुट्ट अंधार आहे ; या प्रकल्पाच्या निमित्ताने त्यांच्या सुद्धा घरात आता दिवा लागेल… सन्मानाने ! 

दुसऱ्याचा प्रकाश उधार घेऊन जे जगतात त्यांना ग्रह म्हणतात…. ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो, ते तारे म्हणून मिरवतात… आजपर्यंत माझ्या आणि मनीषा च्या आधाराने जगलेले जे ग्रह आहेत, ते या प्रकल्पाच्या निमित्ताने तारे होतील…. आयुष्याच्या या टप्प्यावर, काळ्याकुट्ट मध्यरात्री, आता ते स्वतःच सूर्य म्हणून उगवतील… ते स्वयंप्रकाशित होतील… स्वयंपूर्ण होतील… तेजस्वी तारा होतील सूर्यासारखा!

ठरलं… आता ठरलं…. 

आपल्या या नवीन बाळाचं नाव ‘मध्यरात्रीचे सूर्य…!!!” हेच ठेवायचं ठरलं… 

तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने शुभेच्छांमुळे इथवर तरी आलो…. आता सगळ्यात मोठे आव्हान आणि माझी परीक्षा इथून पुढे सुरू होईल…

सुरुवातीच्या टप्प्यात आपण साधारणपणे 25 लोकांना या प्रकल्पात सहभागी करून घेणार आहोत. आमच्या या लोकांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून …

  1. प्रत्येक व्यक्तीस रुपये 150 प्रतिदिन.
  2. सकाळचा चहा, नाष्टा आणि दुपारचे जेवण.
  3. याचसोबत कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा / किराणा.

अंदाजे रुपये 300 दर दिवशी एका व्यक्तीसाठी खर्च आहे…  25 लोकांसाठी रुपये 7500 प्रति दिवस… सुट्ट्या वगळता 25 दिवस जरी काम झाले तरी महिन्याचा खर्च रुपये 1, 87, 000 (एक लाख सत्याऐंशी हजार)… यात कच्चा माल, फिरतीसाठी वाहन, पेट्रोल, मेंटेनन्स म्हणजे लाईट बिल वगैरे वगैरे खर्च समाविष्ट नाहीत. 

आमच्याकडे काम करणाऱ्या सर्वांना रोजच्या रोज पगार देणे मला भाग आहे… रोजच्या रोज चूल पेटवायची असेल तर रोज त्यात लाकडं सुद्धा घालावी लागतील…! असो…

हा प्रकल्प नेमका काय आहे, कुठून कुठवर आलो, यामागे नेमकं उद्दिष्ट काय आहे, फलित काय मिळेल, आव्हानं काय आहेत याची सर्वांगीण कल्पना यावी, यासाठी आपल्यासमोर, वरील प्रमाणे सर्व काही व्यक्त केलं आहे. 

चैत्र शु. १ गुढीपाडवा, अर्थात 30 मार्च 2025  या शुभ दिनापासून प्रकल्प सुरू करण्याची “मनीषा” आहे…! पुढे जे जसे घडेल तसे नक्की कळवत राहीन…

प्रश्न खूप आहेत, पण तुम्हा सर्वांच्या साथीनं उत्तरं सुद्धा मिळतील, असा विश्वास आहे… इथवर ज्याने आणून सोडलंय, तो पुढे न्यायला नाही कसा म्हणेल… हि श्रद्धा आहे… आपण दिलेल्या आशीर्वाद आणि शुभेच्छांवर, मनापासून निष्ठा आहे…

मला काही नको… फक्त सोबत रहावे, मी चालत राहीन, प्रयत्न करत राहीन, वाटेत मात्र कधी मोडला माझा कणा, तर फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा…!!!

आपले स्नेहांकित,

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे,

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments