श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ “दक्षिणायन-उत्तरायण ” – कवी :ॲड .समीर आठल्ये ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
सूर्योदय तो पूर्वेला अन्
पश्चिमेस तो अस्त असे
सृष्टीचा हा नियम मानवा
त्रिकालाबाधित सत्य असे ||
*
रवि जरासा अवखळ भारी
एका जागी स्थिर नसे
एका जागी नित्य उगवणे
हेच तया मंजुर नसे ।।
*
वदे रवि तो ब्रह्मापाशी
जरा मोकळीक द्या मजला
उगवुन येण्या एक ठिकाणी
मजला येईल कंटाळा ।।
*
आज येथुनी उद्या तेथुनी
उगवलो तर होईल छान
रोज नव्या देशाला देईन
पहिला बघण्याचा हो मान ।।
*
ब्रह्मदेवही हसले किंचित
हट्ट पाहुनी सूर्याचा
दिवस कुठे अन् कुठे रात्र
हा मेळ कसा साधायाचा ।।
*
मान राखुनी परी रविचा
ब्रह्मदेव वदले त्याला
उगवताना पूर्व दिशा अन्
पश्चिमेस जा अस्ताला ।।
*
परि उगवता पूर्व दिशेला
उत्तरेकडे सरकत जा
सहा मास सरताच मागुता
दक्षिण अंगे उगवत जा ।।
*
सूर्य तोषला रचना ऐकून
उदय आणिक अस्ताची
दिशा जरी ती एक परंतु
जागा बदले नित्याची ।।
*
उत्तर अंगे उगवत जाता
उत्तरायणी सूर्य असे
दक्षिण अंगे तोच उगवता
दक्षिणायनी तोच दिसे ।।
*
संक्रमणाने फुलते जीवन
गती लाभते जगण्याला
म्हणुनी दिनकर व्यापुनी फिरतो
नभांगणातुनी दिवसाला ।।
*
जगी चिरंतन टिकून राही
बदल तयाचे नाम असे
असे बदल, परी मार्ग सुनिश्चित
हे देवाचे दान असे ।
☆
कवी :ॲड .समीर आठल्ये
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈