श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “ग्रीक तत्त्ववेत्ता एपिक्युरस यांचे विचार” लेखक : शरद बावीसकर (यांच्या लेखाचा संकलित अंश) ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

भौतिकवादाची कोनशिला समजला जाणारा प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता एपिक्युरस म्हणतो की प्राप्त क्षणात अनंताचं सुख असतं. वर्तमानकाळ सत्-तत्त्व आहे. पण अनावश्यक इच्छांचा पाठलाग आणि मृत्यूचं भय माणसाला वर्तमानाच्या या सत्-वास्तवाचं (reality) आकलन होऊ देत नाही. अतृप्त आणि भयभीत मनोवस्थेमुळे माणूस प्राप्त क्षणात राहण्यास असमर्थ ठरतो. भयमुक्त होऊन प्राप्त क्षणाचा आनंद कसा घ्यावा हा मूलभूत विचार एपिक्युरसच्या सुखवादी तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. त्याचं सुखवादी नीतिशास्त्र आजच्या भांडवलवादी भोगवादाचं द्याोतक नसून त्याला छेद देणारं आहे. आजचा बाजारू भोगवाद प्राप्त क्षणापासून पळ काढायला मदत करतो- तर एपिक्युरसचा सुखवाद प्राप्त क्षणात (carpe diem) अनंताचं सुख शोधायला सहाय्यभूत ठरतो. एपिक्युरसच्या सुखवादाचा आंतरिक संबंध त्याच्या भौतिकवादाशी, अनुभववादाशी, निसर्गवादाशी आणि ईहवादाशी आहे. मात्र विरोधी छावणीकडून एपिक्युरसच्या तत्त्वज्ञानाचा विपर्यास फक्त ‘खा, प्या, मजा करा’ अशा उथळ भोगवादात केला गेला.

एपिक्युरसच्या सुखवादी नीतिशास्त्राविषयी सांगायचं झालं तर त्याचा सुखवाद त्याच्या भौतिकवादी आणि अनुभववादी तर्कशास्त्राचं नैसर्गिक अपत्य आहे. भौतिक जग इतर सगळ्या गोष्टींचं आधारभूत तत्त्व असल्यानं भौतिक जगाचा आणि त्यातील स्थित शरीराचा द्वेष एपिक्युरसच्या दृष्टीनं आत्मवंचना ठरते. त्यामुळे शरीर एकाचवेळी साधन आणि साध्य ठरतं. मन, बुद्धी, चित, वेदना, सुख इत्यादी गोष्टींना शरीरेतर स्वतंत्र अस्तित्व नसून त्या शरीराच्या कृती आहेत. शरीरासोबत या शरीराधारित कृतींचासुद्धा शेवट होत असतो.

एपिक्युरसनुसार वेदना टाळणं आणि सुखाचा शोध घेणं हा मानवी स्वभाव आहे. त्यादृष्टीनं तो जेरेमी बेंथम या आधुनिक सुखवादी विचारवंताचा पूर्वसुरी ठरतो. मात्र एपिक्युरसचा सुखवाद हा भांडवलवादी भोगवादाशी संबंधित नसून त्याला छेद देणारा आहे. एपिक्युरसचा सुखवाद समजून घेण्यासाठी त्यानं केलेलं मानवी इच्छांचं वर्गीकरण लक्षात घेतलं पाहिजे. एपिक्युरसनुसार इच्छा तीन प्रकारच्या असतात. (अ) नैसर्गिक आणि आवश्यक, (ब) नैसर्गिक आणि अनावश्यक, (क) अनैसर्गिक आणि अनावश्यक.

नैसर्गिक आणि आवश्यक इच्छांच्या पूर्तीतच खरं सुख आहे असं एपिक्युरस मानतो. तहान लागलेल्या माणसाला पाणी अमृततुल्य वाटतं. श्रमानंतर केलेला आराम सुखदायी ठरतो. थोडक्यात, काम्यू म्हणतो तसं खरं सुख सगळ्यांना परवडणारं असतं. मात्र बेगडी, दिखाऊ आणि तुलनात्मक सुख महाग क्रयवस्तू बनते. एपिक्युरस म्हणतो की अतिरेकी संपत्तीसंचय, सत्ता, बेगडी नावलौकिक सारख्या अनैसर्गिक आणि अनावश्यक इच्छांचा पाठलाग सुखदायी नसून खऱ्या सुखाचा शत्रूच ठरतो. तत्कालीन नागरी जीवन आणि आजचा भांडवलवादी सुखवाद तिसऱ्या वर्गातील इच्छांवर आधारित आहे! एपिक्युरस निरर्थक गरजांनी ग्रस्त नागरी जीवनाचा त्याग करून निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गाशी एकरूप होऊन जगायला सांगतो. त्यामुळे निसर्गवादाच्या बाबतीत तो रूसोचा पूर्वसुरी ठरतो. एपिक्युरसचा भौतिकवाद जीवनद्वेष्टा आणि शरीराचं दमन करणारा नसून ऐहिक जीवनावरील प्रेमाचा पुरस्कार करतो. त्यामुळे इरास्मुस, राब्ले, नित्शे, फुको सारख्या ‘लाफिंग फिलॉसफर्स’चा तो पूर्वज समजला जातो.

एपिक्युरसनं मृत्यूविषयी विस्तृत विवेचन केलं आहे. त्याच्या तर्कशास्त्रानुसार मृत्यू निरुपद्रवी आहे. मृत्यू म्हणजे शरीरासोबतच मन, बुद्धी, आत्मा, चेतना, जाणीव, भावना इत्यादी कृतींचा शेवट. चिद्वादी परंपरा मृत्यूनंतर शिल्लक राहणाऱ्या आत्म्याला शरीराचे गुणधर्म चिकटवते. शरीर तर भौतिकतेच्या ‘शून्या’त विलीन होतं. त्यासोबतच शरीराच्या वेदना, संवेदना, सुख दु:खं नष्ट होतात. मग शरीराचे गुण आत्म्याला जोडून परत शरीरसंबंधित भीतीच्या/प्रलोभनाच्या राजकारणाची आवश्यकता नाही, असं एपिक्युरस मानतो. अशा प्रकारे मृत्यूच्या भीतीला अनाठायी ठरवून त्याभोवती निर्माण झालेल्या अंधश्रद्धांसाठी तो कर्दनकाळ ठरतो. एकूणच एपिक्युरसचा विचार पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात एकाच वेळी निषिद्ध मानलं गेलेलं पण तीव्र आकर्षण निर्माण करणारं फळ आहे.

लेखक : श्री शरद बावीसकर 

 (यांच्या लेखाचा संकलित अंश) 

संकलन व प्रस्तुती : श्री जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments