सुश्री तृप्ती कुलकर्णी
पुस्तकावर बोलू काही
☆ नवा परीघ… लेखिका : सुश्री आश्लेषा महाजन ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
पुस्तक : नवा परीघ
लेखिका : आश्लेषा महाजन
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन
कवयित्री, लेखिका आश्लेषा महाजन यांचा दिलीपराज प्रकाशन यांनी प्रकाशित केलेला ‘नवा परीघ’ हा कथासंग्रह नुकताच वाचला. यापूर्वी त्यांच्या कविता, आणि त्यांनी लहानांसाठी लिहिलेली-अनुवादित केलेली पुस्तकं, कादंबरी हे साहित्यप्रकार मी वाचले होते. १२ जुलै १९६१, पानशेच्या पुरावर आधारित असलेल्या कादंबरीवर मी पुस्तक परिचयदेखील लिहिलेला आहे. पण काही किरकोळ अपवाद वगळता त्यांचा ‘कथा’ हा साहित्यप्रकार मात्र माझ्या वाचनात आलेला नव्हता. आणि त्यामुळेच हा नवा कथासंग्रह नक्की कसा असेल हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती.
‘नवा परिघ’ या कथासंग्रहात सुरुवातीलाच मनोगतामध्ये आश्लेषा महाजन यांनी त्या कथासंग्रहाकडे का वळल्या किंवा कथा हा साहित्य प्रकार त्या कशा दृष्टीने पाहतात याचं उत्तम आणि प्रामाणिक कथन केलं आहे. एक वाचक म्हणून ते मनाला सहज स्पर्शून जातं. आपण एखादा साहित्यप्रकार का लिहितो आहोत, त्याची नक्की गरज काय आहे, हे एखाद्या लेखकाला/लेखिकेला समजणं हे किती महत्त्वाचं आहे हे त्यांच्या या मनोगतातून मला जाणवलं.
आणि पुढेही तोच प्रामाणिकपणा, तिच वैचारिक समज त्यांच्या प्रत्येक कथेतून दिसून येते. सद्यस्थितीतल्या वातावरणाशी मिळत्याजुळत्या अशा या कथा आहेत. मुखपृष्ठावर दाखवल्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष यांच्या नात्याची विशिष्ट चौकट कुठेतरी नव्याने साधायला हवी, त्यात थोडी मोकळीक असायला हवी किंवा आजकालच्या भाषेत जरा स्पेस असायला हवी हा दृष्टिकोन यातल्या काही कथांमधून प्रकर्षाने जाणवतो. लेखिका मूलतः कवी मनाच्या आहेत किंबहुना कविता हा त्यांचा व्यक्त होण्याचा स्वाभाविक कलाप्रकार आहे त्यामुळे कथेमध्ये येणारी तरलता, काही प्रसंगांना विशिष्ट प्रकारे उद्धृत करणं, प्रत्येक गोष्टीचा शेवट ठराविक साच्यातून न करता तो वाचकाच्या दृष्टिकोनातून त्याला ठरवू देणं असेही काही प्रयोग या कथांमध्ये केल्याचं आढळतं. पण विशेष म्हणजे कथेमध्ये कुठल्याही स्वरूपात दोन ओळींची का होईना कविता घालण्याचा मोह प्रकर्षाने टाळलेला आहे. सुरुवातीच्या मनोगतातच त्यांनी सांगितलं कविता हा अतिशय उत्कट आणि हृदयस्थ प्रकार जरी असला तरी काही विचार, काही गोष्टी यांच्यासाठी मोठा परिघ असणं आवश्यक ठरतं आणि म्हणूनच त्या विषयांना त्यांनी कथा रूपात मांडलेलं आहे. या दृष्टिकोनातूनसुद्धा ‘नवा परीघ’ हे नाव या संग्रहाला साजेसं आहे असं म्हणता येईल.
यातल्या कथा निरनिराळ्या मासिकांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. आणि त्यांचं एकत्रिकरणं केलेलं आहे. त्यामुळेच काळाच्या वेगवेगळ्या तुकड्यात लेखिका स्वतःच्याच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून एखाद्या नात्याकडे किंवा स्त्री-पुरुष सहजीवनाकडे कशी विविध दृष्टीतून पाहते हे स्पष्टपणे दिसून येतं. तसंच या कथासंग्रहाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कथेला थेट सुरुवात होते. प्रास्ताविक आढळत नाही. आणि कुठलाही प्रकारचा पाल्हाळीकपणा न जाणवता घट्ट आकृतीबंध असलेला कथाऐवज आपल्याला वाचायला मिळतो. मोजकी पात्रं, त्यांच्यातले संवाद आणि गरजेपुरती येणारी त्यांच्या अवतीभवतीची पात्रं, त्यांची पार्श्वभूमी असे या कथांचे सर्वसाधारण स्वरूप आहे.
सुख आणि दुःख या आपल्या आयुष्यातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. छाप आणि काटा या सारख्याच त्या आपल्या आयुष्याला चिकटलेल्या असतात. आणि अनेकदा सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये त्यांचं प्रमाण हे बऱ्यापैकी समसमान असतं. क्वचित प्रसंगी एखाद्याचं कमी जास्त असू शकतं, पण पूर्णविरोधाभास किंवा पूर्ण एकांगी असं आयुष्य सामान्य व्यक्तींच्या पदरी खूप कमी वेळा येतं. हा सुखदुःखाचा ‘तोल’ अतिशय उत्तमरीत्या या कथांमधून साधला आहे.
सर्वच कथा वाचनीय आहेत. पण विशेष परिणाम करतात त्या म्हणजे मेकअप, प्लाझ्मा, गादी, लेप, जीवन है अगर जहर, व्हेंचर पायलट, एकतानता. यातली प्लासिबो आणि श्रद्धा या कथांचा अजूनही विस्तार झाला असता तर चालला असता हे ही खरं. पण कदाचित मासिक किंवा अंकातल्या शब्द मर्यादेमुळे हे बंधन आलं असावं असं वाटतं. प्रत्येक कथा साधारणपणे ८ ते १० पानांची आहे आणि एकूण १६ कथांचा यामध्ये समावेश आहे. यातल्या बऱ्याच कथांवर उत्तम प्रकारच्या लघु फिल्म होऊ शकतील. याबाबत लेखिकेने खरंच विचार करायला हवा. साध्या सोप्या भाषेत लिहिलेल्या, जीवनातल्या अनेक प्रसंगांना सहजपणे, प्रामाणिकपणे सामोरे जाणाऱ्या, कुठलाही विशिष्ट प्रकारचा सूर न लावणाऱ्या या कथा सर्वसाधारण व्यक्तीला आपल्या जिव्हाळ्याच्या वाटतील अशाच आहेत.
एकूणच या कथांमध्ये मानवी नातेसंबंधांवर जास्त भर दिलेला आहे. मुळात मानवी नातेसंबंध ही गोष्टच अतिशय गुंतागुंतीची, समजायला क्लिष्ट, हाताळताना हळुवार आणि तितकीच पारंपारिक ओझ्यात जखडलेली बाब आहे हे नक्की. तंत्रज्ञानाच्या किती सुविधा उपलब्ध झाल्या, आर्थिक स्थितीचा एकूण स्तर जरी उंचावला तरीदेखील मानवी मनाच्या काही गरजा आणि काही क्षमता-अक्षमता देखील आपल्या आयुष्याला व्यापून उरतात त्यांची बीजं रुजतात आणि नकळत विचारप्रवृत्तही करतात. या कथांमध्ये ती तळाशी रुजलेली बीजं स्पष्टपणे दिसून येतात. त्यांच्यावरच या कथांची निर्मिती झाली आहे हे स्पष्टपणे जाणवण्या इतक्या या कथा नितळ आणि निर्मळ आहेत. त्यामुळे त्या जास्त भावतात.
नव्या परिघातल्या या कथा एकदा तरी आवर्जून वाचाव्यात अशाच आहेत.
परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈