सौ शालिनी जोशी
विविधा
☆ गा रे कोकीळा गा… ☆ सौ शालिनी जोशी ☆
काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदः पिककाकयोः।
वसंतसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः ।।
कावळा काळा कोकीळ काळा मग कावळा आणि कोकीळ यात फरक कोणता? वसंत ऋतूत कावळा कावळाच असतो तर कोकीळ कोकीळच. वसंत ऋतूत कावळा काव काव करतो तर कोकीळ कुहू कुहू.
शाळेत पाठ केलेले हे सुभाषित आज आठवायला कारण म्हणजे सध्या ऐकायला येणारा कोकीळ आणि कोकिळेचा कलकलाट. दिड महिना वसंत ऋतू झाला तोपर्यंत सर्व शांत होते. पण अलीकडे आठ दिवस पहाटेपासून त्यांचे हाकारणे सुरू असते. कधी खूप लांब वर आवाज येतो. तर कधी अगदी जवळ. पण आज दोन कोकीळ आणि एक कोकिळा यांनी शेजारच्या आंब्याच्या झाडावरती भरपूर दंगा केला. थोडा वेळ शांत मग तिघेही एकदम इतका आवाज करत होते की कोकिळेचा आवाज कोणता आणि कोकिळाचा कोणता कळतच नव्हते. शेवटी कलकलाट करत ते उडून गेले. अशाप्रकारे कधी एकटा कोकीळ तर कधी कोकीळा तरकधी सर्वच एकदम आवाज करत असतात. पहाटे पासून दिवस मावळेपर्यंत हा खेळ सुरू असतो. हाच त्यांच्या वसंतोत्सव असावा.
कोकीळ हा कावळ्याच्या जातीतला पक्षी, कावळ्या सारखाच तुकतुकीत काळा रंग. पण शेपटी थोडी लांब आणि चोच फिकट रंगाची व थोडी वाकडी. डोळा मात्र चकचकीत लाल गोल मण्यासारखा, त्यावर एक काळा ठिपका. फार सुंदर दिसतो. कोकिळाबाईंचा रंग थोडासा तपकिरी काळा. शेपटीवर, पोटावर पांढरे पट्टे आणि अंगभर पांढरे ठिपके. संक्रांतीला पांढऱ्या खडीची काळी साडी नेसतात तसा थाट.
कोकिळेचा आवाज गोड असे आपण समजतो. म्हणून लता मंगेशकरला ‘ गानकोकिळा’ म्हणतात. पण प्रत्यक्षात कोकिळेचा आवाज रखरखीत घशातून ओढून ताणून काढलेला किक किक असा. आणि कोकीळ तिला साद देतो ती मात्र मंजूळ कुहू कुहू अशा आवाजात. पण मनात असेल तरच, कित्येक वेळा कोकिळा हाकारून दमते तरी सुद्धा प्रतिसाद येत नाही. तिचा आवाज चिडका झालेला जाणवतो. पण महाराज प्रसन्न होतील तेव्हा ना? सध्या त्यांचा विणीचा हंगाम असावा.
असे दांपत्य झाडावरती दाट पानात दिसते. जमिनीवर वावरताना दिसत नाही. किडे, अळ्या खाऊन पोट भरते. पण भलतेच आळशी. ‘ असावे घरकुल आपुले छान’ असे त्यांना कधीच वाटत नाही. छोटे छोटे पक्षीही जमेल तसे, ओबडधोबड का होईना, आपले घरटे बांधतात. पण येथे कोकिळाबाई कावळ्याच्या घरातच आपली अंडी ठेवून हिंडायला मोकळ्या. काही वेळा कावळ्याची अंडी खाली फेकायलाही कमी करत नाहीत. बिचारी कावळा कावळी पिल्लं उडायला लागेपर्यंत सांभाळतात. कारण अज्ञानामुळे त्याला फरक कळत नाही.
पूर्वीच्या काळी स्त्रिया कोकिळाव्रत करत असत. म्हणजे कोकिळेचा ओरडलेला आवाज ऐकल्याशिवाय जेवायचं नाही. किती विचित्र आहे नाही? मला वाटते आवाज ऐकण्यासाठी कोकिळेला पोपटासारखे पिंजऱ्यात बंदिस्त ही करत असावे.
कोकिळांचा झाडावरचा वावर इतक्या माझ्या बडबडीला कारण झाला.
एकंदरीत कोकीळ हा असा वैशिष्ट्यपूर्ण पक्षी. त्यामुळे साहित्यात, काव्यात स्थान. पण एरवी वर्षभर त्याचा आवाज, अस्तित्व काही कळतच नाही. म्हणूनच ‘वसंताच्या आगमनी कोकीळ गाई मंजुळ गाणी’.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈