वाचताना वेचलेले
☆ राम की कृष्ण ? – कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆
☆
कोणीतरी विचारले, मला परवा,
तुला राम हवा की कृष्ण हवा?
मी म्हणाले, किती छान विचारला प्रश्न.
सांगते, कधी मला राम पाहिजे, कधी कृष्ण!
रामराया, पोटात घालेल माझी चूक
आणि कृष्ण भागवेल माझी भूक!
रात्रीची शांत झोप, रामरायाच देतो.
भूक लागली की कृष्णच आठवतो.
कशाचीही भीती वाटली की मला आठवतो, राम!
कष्ट झाले, दुःख झाले की कृष्णाकडेच मिळतो आराम.
रक्षण कर! सांगते रामरायालाच.
सुखी ठेव सांगते, मी श्रीकृष्णालाच.
बुध्दीचा विवेक रामाशिवाय कोणाकडे मागावा,
व्यवहारातील चतुरपणा कृष्णानीच शिकवावा.
सहनशक्ती दे रे, माझ्या रामराया.
कृष्ण बसलाय ना कर्माचे फळ द्यायला.
रामाला फक्त शरण जावे वाटते.
कृष्णाशी मात्र बोलावेसे, भांडावेसे वाटते.
रामाला क्षमा मागावी,
कृष्णाला भीक मागावी.
रामाला स्मरावे,
कृष्णाला जगावे.
अभ्यास करताना प्रार्थना राजमणी रामाला!
पायावर उभे राहताना विनवणी, विष्णूला.
एकाचे दोन होताना घ्यावे, रामाचे आशीर्वाद.
संसार करताना आवर्जून द्यावा नारायणाला प्रसाद.
आरोग्य देणारा राम,
सौंदर्य देणारा कृष्ण.
राज्य देणारा राम,
सेना देणारा कृष्ण.
बरोबर-चूक सांगतो राम,
चांगले-वाईट सांगणे कृष्णाचे काम.
रामाकडे मागावे आई वडिलांचे क्षेम,
कृष्णाकडे मागते मी मित्रांचे प्रेम!
पाळण्यात नाव ठेवताना गोविंद घ्या, गोपाळ घ्या.
अंतिम वेळी मात्र रामनाम घ्या.
दोघांकडे मागावे तरी काय काय?
ते दोघे हसत बघत आहेत माझ्याकडे,
म्हणत आहेत, अग आम्ही एकच!!
तू फसलीस की काय?
म्हणाले, कोण हवा? हा प्रश्नच नाही
मिळू दोघेही, नाहीतर कोणीच नाही.
मी रडले आणि म्हणाले, दोघेही रहा माझ्याबरोबर
परत नाही विचारणार हा प्रश्न.
राम का कृष्ण?
परत विचारले जरी
फक्त म्हणेन,
जय जय रामकृष्ण हरी,
जय जय रामकृष्ण हरी.
☆
कवी: अज्ञात
प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈