सौ राधिका भांडारकर
विविधा
☆ स्त्री लेखन स्वातंत्र्य ☆ सौ राधिका भांडारकर ☆
स्त्रियांना लेखन स्वातंत्र्य आहे का?
ती बोल्ड लिहू शकते का?
ती मनात येणाऱ्या सर्वच भावना सहजपणे लिहू शकते का?
या सर्व प्रश्नांना माझे एकच उत्तर आहे “हो”
“का नाही?”
पण ती लिहीत नाही हे सत्य आहे. चौकटी, मर्यादा, समाजाचे दडपण कोणत्याही प्रकारे तिच्या लेखनासाठी बंधनकारक आहेत असे मला वाटतच नाही.
स्त्रियांचे लेखन संकुचित असायला कारण स्त्री स्वतःच आहे. कारण बऱ्याच वेळा ती स्वतःच उंबरठे ओलांडायला, चौकटी मोडायला, व्यक्त व्हायला,
स्वतःच्या जीवनावर मोकळेपणाने भाष्य करायला तयारच नसते. परिणामी संसार, मुलंबाळं, कौटुंबिक नाती, सासु सुना, नातवंड, नवरा, जावई, सासरे, माहेर, अंगण याच्या पलीकडे स्त्री लेखन वाचायला मिळतच नाही. तिचं लेखन तिच्यापुरतं, तिच्या विश्वापुरतच मर्यादित असलेलं अनुभवायला येतं. फारफार तर नोकरी करणारी एखादी स्त्री लेखिका असेल तर थोडा वेगळा विषय ती हाताळताना जाणवतं परंतु तो विषय हाताळतानाही तिची मुळातली संसारिक सूत्रं वेगळी झालेली जाणवत नाहीत.
तिने लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या, कविता, ललित यातही चौकटीतलंच स्त्री जीवनाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. काही प्रमाणात विनोदी लेखन करणाऱ्या स्त्रिया आहेत पण त्यातही वाढलेलं वजन, माझे डाएट, शेजारीण, नाचगाण्यासारखे छंद, फसलेली पाककला, अवास्तव खरेदी, दुकानातले सेल, नवऱ्याचं बिच्चारेपण, अचानक येणारे पाहुणे या घरगुती विषयांव्यतिरिक्त फारसं काही वाचायला मिळत नाही. अभिरुची संपन्न, समाजाभिमुख असे पुल, सुभाष भेंडे, द. मा. शंकर पाटील, चिं वि. जोशी, दिवाकर वगैरे पुरुष लेखकांसारखं विनोदी लेखन सामर्थ्य स्त्री लेखिकांमध्ये अभावानेच आढळते. साहित्य क्षेत्रात स्त्री लेखिका आणि पुरुष लेखक असे दोन वेगळे विभाग नकळतच होतात. त्याला एक प्रमुख कारण म्हणजे स्त्री आणि पुरुषांच्या वैचारिकतेतील भिन्नता, निरीक्षण शक्ती आणि अभ्यासही. एका ठराविक परिघातच जगत असताना तिचे जीवनातले अनुभवही मर्यादित, चौकटीतलेच असतात. त्या पलिकडच्या जीवनाचा ती विचारही करू शकत नाही. परिघापलीकडे खूप मोठे मानवी जीवन आहे आणि ते टिपण्याचा किंवा त्याही जीवन प्रवाहाचा दूरस्थपणे भाग होऊन निरीक्षणात्मक वैचारिकतेचा प्रभाव तिच्या लेखनावर पडलेला दिसत नाही. ही वास्तविकता असताना समाजाने तिच्या लेखनावर मर्यादा टाकल्या आहेत किंवा ती बोल्ड लिहूच शकत नाही या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. ठीक आहे! एक स्त्री. . “स्त्री विषयकच” लिहिणार परंतु त्यातही बहुतांशी स्त्री लेखिकांचे विचार, अनुभव, निरीक्षण, कल्पनांची व्याप्ती तोकडीच वाटते. तोच तोच पणा जाणवतो. याचं समर्थन “ती बंधनात असते म्हणून. . ” हे होऊच शकत नाही. माझ्या मते स्त्री जेव्हा एखादी कथा, कादंबरी किंवा लेख लिहिते तेव्हा त्यातूनही ती स्वतःला पाहत असते. स्वतःच्या प्रतिमेला जपत असते. “एक स्त्री असूनही तिने असं का लिहिलं?” या समाजाच्या टिकेचं भय तिनेच तिच्यावर पांघरलेलं असतं. आपल्या लेखनातून आपल्यावर “संस्कृती, नीती मूल्याचे पतन झाले” असे ओरखडे ओढले जाऊ नयेत हा प्रचंड मानसिक अडथळा तिच्या मनात तिनेच निर्माण केलेला असतो म्हणून ती मुक्त होऊ शकत नाही आणि मुक्तपणे लिहू शकत नाही.
अर्थात असेही अनुभव स्त्री लेखिकांना आलेले आहेत. कविता महाजन, मेघना पेठे, गौरी देशपांडे यांनी स्त्रियांचेच प्रश्न अतिशय धैर्याने आणि मुक्तपणे हाताळलेत. काही ना त्यांचे लेखन फार आवडलं तर काहींनी नाके मुरडली मात्र वेगवेगळ्या अभिरुचीचे, जडणघडणीचे वाचक हे असणारच पण लेखकाने (स्त्री अथवा पुरुष कुणीही) समाजाचा आरसा बनून वास्तवतेचे दर्शन(सुंदर ते ओंगळ) मुक्तपणे घडवून देऊ नये असा अर्थ होऊ शकत नाही. सखाराम बाईंडर, पुरुष, गिधाडे, बॅरिस्टर या गाजलेल्या नाटकांसारखी, ज्वलंत तडफडणारे विषय असलेली निर्मिती एखादी स्त्री लेखिका करू शकेल का? वास्तविक या टोकाच्या बोल्ड लेखनातही स्त्रियांच्या समस्या आहेत पण त्या पुरुष मनाच्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत म्हणजेच इथे महत्त्वाचा भाग येतो तो दृष्टिकोनाचा. स्त्री लेखिका स्वतःचे दृष्टिकोन विस्तारित का करू शकत नाही? तसलीमा नसरीन, इस्मत चुगताई, मन्नु भंडारी, कमला दास अरुंधती रॉय सारख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लेखिका. समाजाचा प्रचंड विरोध आणि मानहानीला सामोरे जाऊनही त्यांनी लिहिलं. ते चांगलं वाईट याची मीमांसा न करता मुक्तपणे त्यांनी लिहिलं आणि समाजाची एक बाजू उघडी करण्याचं धाडस दाखवलं यात गैर काय??
स्त्री लेखनात विषयाची व्यापकताही कमी दिसते. अश्लीलता टाळूनही शृंगारिक लेखन करता येतं. प्रेमकथा आणि प्रणय कथा यात फरक आहे पण भावनांचा अविष्कार उलगडणारं स्पष्ट लेखन स्त्री लेखिकांकडून होताना दिसत नाही हे सत्य आहे.
“न राहवून त्याने तिचा पटकन् मुकाच घेतला” किंवा “तिच्या भरदार वक्षस्थळांवर त्याची नजर खिळून राहिली. ” अशा तर्हेची भाषा किंवा वाक्यरचना स्त्री लेखिका सहजपणे करू शकेल का? का करू नये? का हरकत असावी? शब्द खेचून धरावेत की मुक्तपणे त्यांची प्रासंगिक उधळण करावी हा चर्चेचा विषय आहे.
कवी कालीदासांच्या मेघदूतातलं यक्षाच्या प्रेयसीचं वर्णन जर सुंदरच वाटू शकतं तर एखाद्या स्त्रीलेखिकेने केलेलं, त्यातलं सौंदर्य जाणून केलेलं रसभरित वर्णन “बोल्ड” का ठरावं? तेव्हा सरळ, सात्विक, मसालेदार किंवा बोल्ड असं काही नसतंच. त्या प्रसंगाची तीच मागणी असते असा विचार का करू नये?
लेखक किंवा लेखिका जेव्हा काही लेखनकृती करते तेव्हा त्यात स्वत:ची गुंतवणूक आणि अलिप्तता दोन्हीची गरज असते. आपण निर्माण केलेल्या पात्रांशी बंध जुळणे आणि प्रत्यक्षात ती पात्रं अलिप्तपणे पाहणे या दोघांचा समतोल साधला गेला तरच उत्कृष्ट आणि मुक्त विचारांचे लेखन होऊ शकतं हे एक लेखनतत्व आहे. त्यात समाज, स्व प्रतिमा, बंधने, मर्यादा याचा प्रश्नच येत नाही. माझ्या मते लेखकाची जबाबदारी ही आहे की भोवतालच्या समाज जीवनाचा सखोल अभ्यास करून त्यावरचे वास्तविक दर्शन देणारे लेखन करतानाही समाजाला चांगला सकारात्मक संदेश देणं ही लेखकाची जबाबदारी आहे. स्त्री लेखकाची आणि पुरुष लेखकाची ही.
काळाबरोबर जीवन पद्धती बदलतात. संस्कृती, नीतीच्याही व्याख्या बदलतात आणि बदलत्या जीवनपद्धतीवर सहअनुभूतीने विचार करून लिहिण्याचे सामर्थ्य स्त्रीलेखिकेकडूनही नक्कीच अपेक्षित आहे. आणखी एक मुद्दाही मला महत्त्वाचा वाटतो “मी एक स्त्री लेखिका म्हणून जेव्हा विचार करते” तेव्हा मला एक जाणवतं की मी रत्नाकर मतकरीं सारखी सुसूत्र गूढकथा नाही लिहू शकत. किंवा आगाथा ख्रिस्ती सारख्या रहस्यकथा लिहितानाही मी कमी पडते. माझ्याच मनाला मी बजावते की हा माझा जॉनर नाही पण हे कितपत स्वीकारार्ह आहे? खरं म्हणजे याला एकच कारण गूढकथा, रहस्यकथा लिहिण्यासाठी लागणारी अफाट कल्पनाशक्ती याचा अभाव. बहुतेक स्त्री लेखिकांबाबत हेच घडत असावं. कल्पनाविश्व किंवा कल्पनाशक्तीचे अपुरेपण यामुळेही स्त्री लेखिका त्याच त्या लेखन वर्तुळात फिरत राहते म्हणून याही गुणांना जाणीवपूर्वक विकसित करण्याची स्त्री लेखिकांना फार गरज आहे असे म्हटले तर ते गैर ठरू नये. ”घरात असता तारे हसरे मी पाहू कशाला नभाकडे” असा वैचारिक कल नसावा. माथ्यावरच्या विशाल नभाकडे जाणीवपूर्वक पाहण्याची दृष्टी मिळवावी आणि मुक्त लेखन बिनधास्त करावे याच मताची मी आहे. मेलोड्रामा किंवा गिमीक्समध्ये अडकू नये. एखाद्या घटनेकडे ती जशी आहे तशी बघण्याची आणि शब्दातून व्यक्त करण्याची गरज ओळखावी. असे लेखन यापूर्वीही स्त्री लेखिकांकडून झालेले आहे. पद्मजा फाटकची हसरी किडनी सुनीता देशपांडे यांचं आहे मनोहर तरी माधवी देसाई यांचं नाच गं घुमा किंवा कांचन घाणेकर यांचे “नाथ हा माझा” स्नेहप्रभा प्रधान यांचं स्नेहांकिता अगदी लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे ही बोल्ड लेखन प्रकारातलीच नव्हे का? अगदी अलीकडेच मी मृदुला भाटकर यांचं “हे सांगायलाच हवं” हे आत्मवृत्त वाचलं. असं लिहायला स्वातंत्र्यापेक्षा धाडसाची गरज असते. म्हणजेच स्त्रिया बोल्ड लिहू शकत नाहीत या विचार प्रवाहाला का वाहू द्यायचे?
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈