श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १/२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
अथातो भक्तिं व्याख्यास्यामः
साधन चतुष्ट्य
भक्त म्हणजे भगवंतापासून जो विभक्त नाही तो. भक्त होण्यासाठी काय पात्रता लागते, तर असे अमुक अमुक सांगता येणं अवघड आहे. पण भक्ताने कसे असावे, किंवा आदर्श भक्त कसा असतो ते सांगता येईल….. ! उत्तम भक्ताची लक्षणे अनेक ग्रंथात आलेली आढळतील.
जेव्हा आपण भक्ति चा शास्त्र म्हणून अभ्यास करतो, तेव्हा त्याला काही सूत्रे जोडावी लागतात, पटतंय ना ?
त्यातील प्रमुख चार सूत्रे खालील प्रमाणे आहेत.
१. नित्यानित्यविवेक म्हणजे जगात नित्य म्हणजे शाश्वत काय आहे आणि अनित्य म्हणजे अशाश्वत काय आहे हे जाणणे.
२. नित्य आणि अनित्य जाणल्यानंतर त्यांचा यथासंभव त्याग करणे.
३. शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान यांचा अंगिकार करणे.
४. मुमुक्षता
कोणत्याही शास्त्राची, विषयाची पदवी घ्यायची असेल तर त्यासाठी किमान पात्रता असणे अनिवार्य ठरते. एखाद्याला वैद्यकीय पदवी घ्यायची असेल तर बारावीला नुसते उत्तीर्ण होऊन चालत नाही तर सर्वोत्तम गुण असावे लागतात. त्या अनुषंगाने भक्तिशास्त्र शिकण्यासाठी, भक्तीचा लाभ होण्यासाठी आंतरिक व्याकुळता खूप महत्वाची ठरते. ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, त्याप्रमाणे मनात जोपर्यंत वासनेचा जोर आहे तो पर्यंत भक्तीचा उगम होणे कठीण आहे. परंतु मनुष्याचे सुकृत उदयास आले आणि त्याचवेळी सद्गुरूकृपा झाली तर मात्र भक्ति देवता त्याच्यावर कृपा करते असे सर्व संत सांगतात. याच सूत्रानुसार ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी साधन चतुष्ट अत्यावश्यक सांगितले गेले आहे.
आपण एकेक मुद्दा पाहू.
१. नित्य आणि अनित्य :~ मी नसताना भगवंत होता, मी असताना भगवंत आहे आणि उद्या कदाचित मी नसेल तेव्हाही भगवंत असेल…, अर्थात तो नित्य आहे. तसेच मी अनित्य आहे, या नश्वर जगातील प्रत्येक गोष्ट अनित्य अर्थात कधीतरी नष्ट होणारी आहे. माउली म्हणतात,
“उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।
हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥”
(ज्ञानेश्वरी २. १५९)
२. ईश्वर सर्व चराचरात भरून राहिला असल्याने तो माझ्यामध्ये ही आहे. त्याला ओळखणे म्हणजेच भगवंताची ओळख करून घेणे असल्याने, येथील अनित्य गोष्टीत न रमता त्यांचा त्याग करायला शिकणे.
३. शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान यांचा अंगिकार करणे. हे सहा गुण आहेत. प्रत्येक साधकाने नव्हे तर प्रत्येक मनुष्याने त्याचा अंगिकार करायला हवा.
शम.
म्हणजे मनाचा निग्रह, अर्थात स्वतःच्या बाबतीत कठोर आणि दुसऱ्याच्या बाबतीत मृदु. सामान्य मनुष्य नेहमी याच्या उलट करीत असतो.
दम.
इंद्रियांचा निग्रह. एखाद्याने शुभ्र पांढरा कपडा परिधान केलेला असेल तर मनुष्य त्या कपड्याकडे न पाहता त्यावर कुठे एखादा डाग दिसतो का ते पाहतो… , त्याची नजर चांगल्या गोष्टींकडे न जाता, वाईट गोष्टीकडे जाते. इथे इंद्रियांचा निग्रह महत्त्वाचा ठरतो.
श्रद्धा
सद्गुरूंवर, त्यांच्या वचनावर दृढ श्रद्धा. आईने घास भरवायला तोंडाशी आणला की बाळ अगदी सहज तोंड उघडते, त्याची त्याच्या आईवर आत्यंतिक श्रद्धा असते. त्याच्या मनात असे कधीही येत नाही की आई या घासात मला विष घालेल…. ! अशी श्रद्धा असलेला कल्याण नावाचा शिष्य समर्थांनी कल्याणा, माझी छाटी… असे म्हटले की क्षणाचाही विलंब न करता थेट कड्यावरून उडी मारतो…
उपरम
सर्व कर्माचा त्याग करणे, अर्थात इथे मनाने त्याग अभिप्रेत आहे. कारण कर्म केल्याशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही….
तितिक्षा
मनुष्याच्या आयुष्यात सुख दुःखाचे प्रसंग येत जात असतात. सुख आले की मनुष्य खुश असतो पण दुःख येऊच नये असे त्याला वाटत असते. जो मनुष्य सुखदुःखात समतोल रहातो, तोच खरा अधिकारी ठरतो. त्याची कसलीच तक्रार नसते. “तू ठेवशील तसा राहीन….. !” इतकेच त्याला कळते…
समाधान
मनुष्य अनेक इच्छा मनात धरून असतो. कधी त्या पूर्ण होतात तर कधी अपूर्ण राहतात. समाधानी व्हायचे असेल तर पुढील सूत्र उपयोगी पडू शकेल.
इच्छा पूर्ण झाली तर देवाची कृपा समजावी आणि इच्छा अपूर्ण राहिली तर देवाची इच्छा समजावी. आपण आनंदात असावे.
४. मुमुक्षता
जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणे हे प्रत्येक मानव देह प्राप्त केलेल्या जीवाचे आद्य कर्तव्य आहे. हे मनुष्याचे प्रमुख दीर्घकालीन ध्येय असले पाहिजे. त्यासाठी अन्य छोटी छोटी ध्येय जरूर असावीत, पण त्यामुळे आपल्या दीर्घ कालीन ध्येयाकडे डोळेझाक होऊ देऊ नये.
देवर्षी नारद महाराज की जय!!
– क्रमशः सूत्र १ / २
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈