सुश्री प्रभा हर्षे
☆ केव्हा शिकू आपण हे ??— मूळ हिन्दी लेखिका – सुश्री सुधा मूर्ती ☆ अनुवाद व प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
काही दिवसांपूर्वीची गोष्ट !
त्यावेळी मी रशियातील मॉस्को इथे होते. एका रविवारी मी बागेत गेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते पण हलका रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. हवेत सुखद गारवा आला होता. बाग अतिशय सुंदर होती. एका चबुतऱ्याखाली बसून मी त्या सुंदर वातावरणाचा आस्वाद घेत होते.
अचानक माझी नजर एका युवक युवतीच्या जोडीवर पडली. अगदी थोड्या वेळापूर्वीच लग्न झाले असावे त्यांचे !
ती नववधू अगदी सुंदर होती ! पंचवीस एक वर्षांची, सोनेरी केसांची आणि निळ्या चमकत्या डोळ्यांची ! जणू बाहुलीच ! नवरा मुलगाही साधारण त्याच वयाचा वाटत होता ! तडफदार आणि आकर्षक ! त्याने सैन्याचा पोशाख घातला होता. नववधूच्या अंगावर सॅटिनचा पांढराशुभ्र, मोती आणि नाजूक लेसने सजवलेला पोशाख होता. तिच्या दोन मैत्रिणीही तिच्यामागे उभ्या होत्या. नववधूचा पोशाख मळू नये म्हणून त्यांनी तो हातांनी उचलून धरला होता. एका मुलाने त्यांच्या डोक्यावर छत्री धरली होती. पाऊस पडत होता ना ! नववधूच्या हातात फुलांचा सुंदर गुच्छ होता. दोघांची जोडी अगदी साजेशी आणि सुरेख दिसत होती.
मी विचार करु लागले, ‘ बाहेर पाऊस पडत असताना इतके छान कपडे घालून हे दोघं लगेच असे बागेत का बरं आले असावेत ? लग्न लागल्यावर त्यांच्याकडेही एखादा काही समारंभ वगैरे असेलच की !’
मी आता त्यांच्याकडे लक्षपूर्वक पहात होते. ते दोघेही बागेत असलेल्या युद्ध-स्मारकाकडे गेले. हातातला गुच्छ त्यांनी त्या स्मारकावर अर्पण केला. तिथे दोन मिनिटे शांत उभे राहून त्यांनी मनोमन श्रद्धांजली वाहिली व ते हळूहळू परत फिरले.
आता मात्र माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना !
या जोडीबरोबर एक वृद्ध गृहस्थही आलेले होते. मी त्यांच्या जवळ जाताच त्यांनी माझी साडी पाहून विचारलं
“ आपण भारतीय आहात का ?”
“ हो, मी भारतीय आहे. “
मग नकळत आमच्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. मी त्यांना विचारलं, “ आपल्याला इंग्रजी कसं येतं ?”
“ मी काही दिवस परदेशात काम करत होतो.”
“ मला एक गोष्ट सांगता का ? हे नवविवाहित जोडपं लग्नानंतर लगेचच या युध्दस्मारकाला भेट द्यायला का आलं आहे ? “ न राहवून मी लगेच माझी शंका एकदाची विचारून टाकली.
ते म्हणाले, “ ही रशियातली परंपरा आहे. इथे कोणाचाही विवाह नेहमी रविवारीच होतो, मग ऋतू कोणताही असू दे ! विवाह-नोंदणीच्या रजिस्टरवर सह्या केल्यानंतर त्या जोडप्याने तिथल्या जवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन तिथे श्रध्दांजली अर्पण करणं बंधनकारकच आहे असं म्हणता येईल. काय आहे.. ह्या देशात प्रत्येक युवकाला कमीत कमी दोन वर्षे सैन्यात नोकरी करावीच लागते. लग्नाच्या दिवशी आपला सैनिकी पोशाख घालूनच लग्नाला उभं रहावं लागतं.. मग तो कोणत्याही पदावर वा कुठल्याही खात्यात असू दे.”
“ आणि याचं कारण काय ? “ मी विचारलं.
ते जरासे सरसावून बसले आणि सांगू लागले……
– – “ हे कृतज्ञतेचं प्रतीक समजलं जातं. आपल्या कितीतरी पूर्वजांनी आपल्या देशासाठी कितीतरी युद्धांमध्ये भाग घेतला होता. किती जणांनी प्राणांची आहुती दिली होती.. काही युद्धं जिंकली, काही हरली ! पण त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं ते फक्त आमच्या या देशासाठी… त्यांच्या त्यागाचं मोल फार मोठं आहे. आणि प्रत्येक नवविवाहित जोडप्याला ह्याची जाणीव असणं फार आवश्यक आहे. ज्या शांत स्वतंत्र राष्ट्रात ते दोघं आता आनंदाने राहणार आहेत ते राष्ट्र आज ह्या लोकांच्या बलिदानावर उभं आहे… ही जाणीव. आम्ही वयस्कर लोक ही परंपरा जपण्याचा आग्रह धरतो. विवाहाच्या दिवशी युद्ध-स्मारकावर जाऊन श्रद्धांजली वाहणं ही गोष्ट प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी जणू अनिवार्यच आहे. मग लग्न कुठेही असो, मॉस्को, पिटर्सबर्ग अथवा रशियातल्या कोणत्याही शहरात !”
मी विचारात पडले… ‘आता हे दोघं लग्न करताहेत’ म्हणून काय शिकवतो आपण आपल्या मुलांना ? महाग महाग साड्या आणि उंची कपडे, किंमती दागदागिने, महागडे जेवणाचे मेनू, अनावश्यक डेकोरेशन, आणि डिस्को पार्टी.. बस्.. फक्त एवढंच तर शिकवतो. एक भारतीय म्हणून आनंदाने आणि शांतपणे जगण्यास आतुर झालेल्या त्या जोडप्याला.. त्यांच्या आयुष्यातल्या त्या महत्वाच्या दिवशी आपल्या शहिदांची आठवण ठेवायला का शिकवत नाही आपण ? का त्यांचे महत्त्व आपण पटवून देऊ शकत नाही आपल्या पुढच्या पिढीला…. आणि खरं तर स्वत:लाही ?
माझे डोळे भरून आले ! मन दाटून आले !
खरंच !आपण भारतीयांनी रशियाकडून ही महान परंपरा आणि ही कृतज्ञतेची जाणीव शिकलीच पाहिजे. देशासाठी आणि पर्यायाने आपणा सर्वांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले आहे त्यांचा योग्य तो सन्मान आपणही केलाच पाहिजे… आपल्या आनंदाच्या प्रत्येक क्षणी त्यांचे स्मरण तर केलेच पाहिजे.
– – पण केव्हा शिकू आपण हे ????
मूळ हिन्दी लेखिका : सुश्री सुधा मूर्ती
अनुवाद व प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे
पुणे, भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈